मुलांचा मान राखा! (शिवराज गोर्ले)

मुलांचा मान राखा! (शिवराज गोर्ले)

बालक-पालक
पालकांनी मुलांचा मान राखायचा असतो की काय? होय. एक तर निश्‍चित शिस्त लावताना त्यांचा अपमान होणार नाही, त्याची काळजी घ्यावी लागते. शिस्त लावताना पालकांची भाषाच फार महत्त्वाची ठरते. अन्यथा शिस्त नको, पण भाषा आवर, अशी वेळ येते.

खुर्चीवर उभं राहू नकोस, हे मुलाला सांगणं गैर नाही. त्यात मुलाला अपमान वाटावं असंही काही नाही. पण तेच ‘अहो महाराज, खुर्ची बसण्यासाठी असते, उभं 

राहण्यासाठी नाही!’ असं सांगितलं तर? निदान पहिल्या वेळी...एखाद्या वेळी? फरक छोटाच आहे, पण या शब्दांमुळं, अशा सुरांमुळं मुलांना नियमाचा जाच, शिस्तीचा जाच कमी जाणवतो हे निश्‍चित. एकदा असं सांगून पाहा. पुन्हा दुसऱ्यांदा एवढंच म्हणा. ‘सॉरी, सॉरी...खुर्ची बसण्यासाठी असते, उभं राहण्यासाठी नव्हे,’ शिस्त अशी लागली तरी तीही शिस्तच असते. होय, मुलं नियम तोडतात, त्यावर पालकांनी ठाम राहावं. पण कठोर व्हायला हवं असं नाही. लगेच राग, नाराजी व्यक्त करायला हवी, असंही नाही. मुख्य म्हणजे त्यानिमित्तानं मुलांना शिस्तीचं महत्त्व यावर लेक्‍चर देण्याची गरज नाही. मुलांना हे तर अजिबात आवडत नाही. म्हणूनच पालकांनी बोलण्याचा मोह टाळायला हवा. खरं म्हणजे मुलांना शिस्त लागण्यासाठी त्यांच्याभोवती चांगलं वातावरण असण्याची गरज असते. 

एकूण घरचं वळणच तसं असावं लागतं. ते निर्माण करायला आपण कमी पडलो की उपदेशाच्या, तंबीच्या, धमकीच्या शॉर्टकट्‌सवर निभावून न्यायला बघतो. पण हे शॉर्टकट्‌स वापरताना आपण मुलांच्या भावना दुखावत असतो, याचं आपल्याला भान राहत नाही. शाळेत आपल्या मुलाला अपमानित केलं जाऊ नये, अशी पालकांचीही अपेक्षा असतेच. मात्र घरातही आपण मुलांचा मान राखला पाहिजे, हे पालकांच्या ध्यानातही नसतं, मात्र आजच्या काळात ते अपेक्षित आहे. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याबाबत एकमत आहे. ‘युनो’तर्फे जगभरातील मुलांसाठी बालहक्काची संहिता तयार केली गेली आहे. त्यात म्हटलं आहे की, शाळेमध्ये शिस्त राबविताना मुलांचा मान राखला जाईल, त्यांच्या हक्काचं उल्लंघन होणार नाही, अशी दक्षता सर्व राष्ट्रांनी घेणं आवश्‍यक आहे. पालक म्हणून निदान स्वतःच्या मुलांबाबत तुम्ही तशी दक्षता घेणार की नाही...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com