पालकांसाठी आचार-विचारसंहिता

शिवराज गोर्ले
शनिवार, 27 एप्रिल 2019

"शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा "सकाळ पुणे टुडे"मधील "EDU" या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून..."

बालक-पालक
महाराष्ट्रातील काही शाळांमधून मुलांना शिस्तीबद्दल नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी विशेष पाहणी करण्यात आली होती. घरात आणि शाळेत कायमच शिस्तीच्या बडग्याखाली राहावं लागतं...म्हणूनच शिस्तीचा आम्हा राग येतो, असं मुलांनी एकमुखानं म्हटलं होतं. पाहणीचे हे निष्कर्षही निश्‍चितच विचार कराला लावणारे आहेत, ते असे आहेत.

मुलांचा शिस्तीला मुद्दलातच विरोध नाही.

त्यांचा विरोध आहे तो दाबून, दडपून केल्या जाणाऱ्या शिस्तीला. त्याचबरोबर आपण स्वतःला शिस्त लावू शकतो याचा त्यांना विश्‍वास वाटतो. हा मुद्दा तर सर्वांत महत्त्वाचा आहे. फक्त त्यासाठी गरज आहे ती मुलांविषयी पालकांना विश्‍वास वाटण्याची. मात्र, अशी स्वतःच स्वतःला शिस्त लावण्याची संधी पालकांनी मुलांना दिलीच नाही तर? हाच तर शिस्तीतला तिढा आहे. पालकांनी मुलांवर विश्‍वास ठेवला...त्यांना चुकू, शिकू, बदलू दिल्यास खूप काही साध्य होऊ शकतं. त्यासाठी लीला पाटील यांनी पालकांसाठी आचार किंवा विचारसंहिता सुचवलीय, ती अशी...

मुलांना विचार करता येतो, त्यांना त्यांची मतं असतात, याचं भान ठेवावं.
मुलांच्या चांगुलपणावर मनःपूर्वक विश्‍वास ठेवावा.
शारीरिक मारहाण पूर्णतः वर्ज्य करावी.
उपाशी ठेवणं, कोंडून ठेवणं अशा शिक्षा करू नयेत.
घराबाहेर काढीन, शाळा बंद करीन अशा मुलांची मानसिक उलघाल वाढवणाऱ्या धमक्‍या देऊ नयेत.
मुलांच्या चुका पुन्हा पुन्हा उगाळू नयेत.
चुकीच्या कृत्याची भरपाई चांगल्या कृतीनं करण्याची संधी द्यावी.
केवळ सॉरी, थॅंक्‍स यापुरतं न थांबता वर्तन बदलायला हवं, याची मुलांना जाणीव द्यावी.
अनुकूल बदलाला आवर्जून दाद द्यावी.
चांगल्या कृत्याची/वर्तनाची प्रशंसा करावी...मात्र मुलांची व्यक्तिगत स्तुती प्रयत्नपूर्वक, हेतुतः टाळावी.

मुलांच्या अडचणी समजून घेऊन, त्याबाबत त्यांच्याशी पुरेसा संवाद साधून त्या सोडविण्यासाठी मदत करावी.

पालकांनीही स्वतःच्या हातून घडणाऱ्या चुकांची खुलेपणानं कबुली द्यावी आणि त्या पुन्हा घडू नयेत, याची खबरदारी घ्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Shivraj Gorle Edu Supplement Sakal Pune Today