खरे पालक होऊया...

Edu
Edu

बालक-पालक
देवाने, निसर्गाने माणसाच्या मुलाला दोन डोळे, दोन हात, दोन पाय, इंद्रिये, अवयव दिले. प्रत्येकाचे निश्‍चित काम आहे, मात्र त्यात समन्वय लागतो. या सर्वानुपरे माणसाला मिळालेली मोठी देणगी म्हणजे बुद्धी. बुद्धीने निरीक्षण करत करत माणसाचे बाळ अनेक गोष्टी स्वतः शिकते. ही सगळी देणगी देवाने दिली. पालकांचे काम आपल्या मुलातील गुण ओळखणे व त्याच्या विकासाच्या टप्प्यानुसार संधी उपलब्ध करून देत, त्याची सर्जनशीलता फुलवणे. मात्र आम्ही देवापेक्षा मोठे असा गंड पालकांना झाला आहे की काय, असे आजच्या मुलांच्या समस्या पाहताना वाटते. हे परखड विचार मांडले आहेत समस्याग्रस्त मुलांसोबतच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांनी. ‘आमचं ऐकताय ना?’ या लेखमालेत उन्मार्गी मुलांवर लिहिताना त्यांनी मुख्यतः पालकांनाच जबाबदार धरले आहे. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत.

चिंटूसारख्या तीन वर्षांच्या मुलाच्या गोबऱ्या गालांवर जेवत नाही म्हणून उदबत्तीचे चटके देणारे, शिस्तीपोटी बंड्याला उलटे टांगून नाजूक जागी डागणारे पालक त्यांनी पाहिले आहेत. बालपण आहे, पण बाल्य हरवलेली असंख्य मुलं त्यांनी पाहिली आहेत. म्हणूनच त्या लिहितात, ‘‘पालक आहेत ते मालक बनून, लेकराला मातीचा गोळा मानत थापटून थोपटून स्वतःच्या आकांक्षांच्या भट्टीत भाजत, आकारहीन, रूपहीन जगायला निरुपयोगी, अकाली बाद होणारी मडकी घडवीत आहेत. वेळेच्या गणितात बसत नाही म्हणून फास्ट फुडवर वेळीअवेळी पोषण (?) होत आहे.

स्वतःच्या अहमच्या लढाईत मुलाला शस्त्रासारखे वापरले जात आहे. मूल ना खेळणे आहे, ना तुमचे वैफल्य बाहेर काढण्यासाठी पंचिंग बॅग. ते देवाची अनमोल देणगी आहेत. ही देणगी मिळाल्यावर राखायचे, वाढवायचे, फुलवायचे, हसवायचे व्रत घ्यावेच लागते. देवाच्या या देणगीचे आपण मालक नाही, राखणदार आहोत ही पालकत्वाची भूमिका. पण ‘आम्ही तुम्हाला इतके देतो..’ असा हिशेब आला, पालकत्वाची भूमिका आल्यावर मुलांवरील अत्याचारांना सुरवात होते. या सगळ्यात ‘मी’च अधिक असतो. ते बाळही एक व्यक्ती आहे, त्याच्या वयानुसार, कुवतीनुसार, आकांक्षासानुसार फुलू दिले तरच देवाच्या देणगीचा आपण आदर केला. मुलांना त्यांचे बालपण उपभोगू द्या, आनंद घेऊ द्या. खरे पालक होऊ या. आपणही त्यांचे फुलणे पाहण्याचा अवर्णनीय आनंद घेऊ या. देवाच्या या देणगीचा आदर करू या.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com