शिक्षणात संपूर्ण मेंदूचा विचार हवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक
मेंदू हा शिकण्याचा अवयव. मेंदू म्हणजे संपूर्ण मेंदू. फक्त डावा मेंदू नव्हे, तर उजवा मेंदूसुद्धा! होय, संशोधनातून हे सिद्ध झालेलं आहे की मेंदूचे दोन भाग, डावा आणि उजवा हे परस्परांपेक्षा वेगळे असतात व ते वेगवेगळ्या शैलीनं कार्य करीत असतात. त्यामुळं शिक्षणामध्ये या दोन्ही भागांच्या क्षमतेचा वापर व्हायला हवा. नेमका काय फरक असतो या दोन्ही मेंदूच्या कार्यशैलीमध्ये? आपला डावा मेंदू हा अतिशय शिस्तबद्ध, पद्धतशीर काम करणारा, तर्कसंगत विचार करणारा असतो. ज्या गोष्टी त्याला माहिती असतात, तेवढ्याच तो वापरतो. मिळेल त्या माहितीची छाननी करणं, चिकित्सा व विश्‍लेषण करणं आणि गणिती व तर्कशुद्ध निष्कर्ष काढणं हे डाव्या मेंदूचं काम असतं. 

याउलट उजवा मेंदू गणिती, तर्कशुद्ध पद्धतीनं नव्हे, तर भाषिक, चिन्हात्मक पद्धतीनं विचार करतो. डावा मेंदू एक एक करत ज्ञानकण गोळा करतो, तर उजवा मेंदू दृक्‌श्राव्य प्रतिमांच्या संवेदनांच्या स्वरूपात ज्ञान ग्रहण करतो. डावा विश्‍लेषक असतो, तर उजवा संश्‍लेषक. डावा मेंदू एकावेळी एकाच गोष्टीचा विचार करू शकतो, उजवा मात्र एकाच वेळी अनेक गोष्टींचा साकल्यानं विचार करून, त्यातील परस्परसंबंधाचा विचार करून नवे आकृतिबंध निर्माण करतो. डावा मेंदू स्मरणशील असतो, तर उजवा मेंदू सर्जनशील. मुख्यतः भाषा, गणित, विज्ञान हे विषय समजण्याची क्षेत्रं डाव्या मेंदूत असतात. ज्यांना उजवा मेंदू अधिक सक्षम असतो ते चित्रकला, संगीत, खेळ या क्षेत्रात इतरांपेक्षा अधिक प्रवीण असतात. आजच्या शिक्षण पद्धतीत सगळा भर आहे तो डाव्या मेंदूच्या वापरावर. त्यामुळं आपण उजव्या मेंदूचा खूपच कमी वापर करतो. उजव्या मेंदूत असलेली अफाट सर्जनशीलता, निर्मितिक्षमता वाया जाते. 

वास्तविक दोन्ही मेंदू महत्त्वाचे असतात. म्हणूनच शिक्षणात ‘संपूर्ण मेंदू’चा विचार व्हायला हवा. यालाच ‘होल ब्रेन थिंकिंग’ म्हटलं जातं. प्रत्यक्षात मात्र ज्यांचा उजवा मेंदू अधिक सक्षम असतो त्यांच्यावर अनेकदा अन्यायच होतो. भाषा, गणित, विज्ञानातील गुणांच्या आधारे त्यांना ‘थेट’ अध्ययन अक्षम’ ही ठरवलं जातं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today