तुम्ही ‘मुलांच्या बाजूने’ आहात का?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
सर्वच आईबाबांचं आपल्या मुलावर प्रेम असतं. पण, मुलावर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय, याबद्दल त्यांचा संभ्रम असतो. 

‘प्रेम हाच सर्व समस्यांवरचा रामबाण उपाय आहे,’ असं आग्रहानं प्रतिपादन करणाऱ्या नीलनं प्रेम करणं म्हणजे नेमकं काय यासंदर्भातही अगदी मूलभूत चिंतन केलं आहे आणि त्याला प्रदीर्घ अनुभवाची जोडही दिली आहे. 

सगळेच पालक मुलानं शिकून मोठं व्हावं यासाठी धडपडत असतात. पण नील प्रारंभीच स्पष्ट करतो, ‘‘मुलांना प्रेमाची आणि समजून घेण्याची जितकी गरज आहे तितकी शिकवण्याची नाही.’’ 

नील प्रेमामध्ये स्वीकृतीला फार मोठं स्थान देतो. तो म्हणतो, ‘‘आपलं प्रेम आणि स्वीकृती मुलांपर्यंत किती प्रमाणात पोचते यावर मुलांचा आनंद आणि स्वास्थ्य अवलंबून असतं. आपण नेहमी मुलाच्या बाजूनं असलं पाहिजे. मुलाच्या बाजूनं असणं म्हणजेच मुलांवर प्रेम करणं. मुलावर प्रेम आणि स्वीकृती मुलांपर्यंत पोचेल असं वागणं म्हणजे प्रेम.’’ 

असं प्रेम करणाऱ्या पालकांचा मुलांवर विश्‍वास असतो. त्यांच्या मुलांकडून काही विशिष्ट ‘मागण्या’ नसतात. ते मुलांशी कुठल्याही विषयावर अगदी मोकळेपणानं बोलू शकतात. मुख्य म्हणजे ते मुलांशी वागताना अधिकार आणि नैतिकता या दोन ‘पोलिसांना’ बाजूला ठेवतात. त्यांचा धाक दाखवीत नाहीत. अर्थात, ते मुलांचं तोंडदेखलं, अवाजवी कौतुकही करत नाहीत. तसेच त्यांच्या चुका दाखवताना योग्य ती काळजी घेतात. असे पालक रागावले तरी मुलांना त्या रागावण्यामागची भावना समजते. त्यांना खात्री असते, की पालक त्यांच्या बाजूनं आहेत. पालकांना नीलनं एक मजेशीर सल्ला दिला आहे. तो म्हणतो, ‘‘मुलांशी बोलताना ‘मी जेव्हा तुझ्याएवढा होतो..’ हे शब्द 
कटाक्षानं टाळा.’’ 

थोडक्‍यात, तुमचं मूल जसं आहे तसं स्वीकारा. त्याला तुमच्या मनासारखं ‘घडविण्या’च्या फंदात पडू नका. शेवटी एका विलक्षण वास्तवाकडं नीलनं लक्ष वेधलं आहे. तो म्हणतो, ‘‘पालकांनी हे लक्षात ठेवावं - मुलांना स्वतःवर प्रेम करवून घेण्यात जितका रस असतो, तितका इतरांवर प्रेम 
करण्यात नसतो!’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today