जसे पालक तसे बालक !

Edu
Edu

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
‘खोटं बोलू नकोस!’ हे वाक्‍य पालकांच्या विशेषतः आयांच्या तोंडी हमखास ऐकू येतं. 

मुलं ‘कधीकधी’ खोटं का बोलत असताना? आपल्या मुलानं खोटं बोलू नये अशी प्रामाणिक इच्छा असणाऱ्या पालकांनी यासंदर्भात नेमकं काय करावं? 
या संदर्भात ए. ए. नीलचा अनुभव काय आहे? 

‘माझ्या विद्यार्थ्यांमध्ये अगदी पक्का किंवा सवयीनं कायम खोटं बोलणारा कुणीही नाही,’’ असं म्हणणारा नील हेही स्पष्ट करतो, ‘‘मी गेल्या चाळीस वर्षांत कधीही माझ्या विद्यार्थ्यांशी खोटं बोललो नाही. मला तशी कधी इच्छाही झाली नाही.’’ 

खरंच का असं इतकं खरंखरं वागता येतं? 
अर्थात नील हेही स्पष्ट करतो, ‘‘नेहमीच खरं बोलणं कठीण आहे, हे मला मान्य आहे. पण मुलाशी आणि मुलांसमोर खोटं न बोलण्याचा निश्‍चय एखाद्यानं केला तर तो अमलात आणणं आपल्या अपेक्षेपेक्षा सोपंच असतं.’’ 

अप्रामाणिकपणा आणि खोटं बोलणं, यात नील फरक करतो. तो म्हणतो, ‘आयुष्यातल्या मोठ्या/महत्त्वाच्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रामाणिकच असलं पाहिजे. काही कमी महत्त्वाच्या बाबींबद्दल कधी कधी खोटं बोलावं लागलं तर हरकत नाही. कित्येकदा इतरांना न दुखावण्याच्या हेतूनं आपण खोटं बोलत असतो. ते तर क्षम्यच नव्हे, योग्यही ठरतं. त्यापुढं जाऊन नील म्हणतो, ‘‘खोटं बोलणं हा एक छोटासा दोष आहे. पण खोटं जगणं ही कमालीची दुःखद गोष्ट आहे. खोटं जगणारा पालक हा बालकांसाठी घातकच ठरतो.’’ 

मुलं खोटं बोलत असतील तर त्याला पालक जबाबदार असतात. कारण एकतर ती पालकांना घाबरून खोटं बोलत असतात किंवा पालकांचं अनुकरण करून खोटं बोलत असतात. 

पालकांना (मुलांशी तरी) खोटं बोलण्याची गरज नसते. निदान मुलांच्या प्रश्‍नांची उत्तरं तरी पालकांनी खरी द्यायला हवीत. अर्थात, मुलांना प्रश्‍न विचारण्याची मोकळीकही हवी. मुलं ‘मोकळी’ असतात तेव्हा सहसा खोटं बोलत नाहीत. बहुतेक वेळा खरं बोलण्याच्या भीतीमुळं ती खोटं बोलत असतात. भीतीला कारणच न उरल्यास मुलांचं खोटं बोलण्याचं प्रमाण नक्कीच कमी होतं. अखेर तेवढंच तर अपेक्षित असतं. मुलांनी सदासर्वदा सत्यवचनी असावं, ही अपेक्षा तर अवास्तवच म्हणावी लागंल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com