मूल लाडकं असावं, लाडावलेलं नाही!

Edu
Edu

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
लाडामुळं, खरं तर फाजील लाडामुळं मुलं बिघडतात, हे तर सर्वश्रुत आहे. तरीही पालक मुलाचे फाजील लाड का करतात? 

नील म्हणतो, ‘‘बहुतेक वेळा लाडावलेली मुलं एकुलती असतात.’’ हे निरीक्षण निश्‍चितच पाहण्यासारखं आहे. पालकांचं सगळं ‘प्रेम’ त्याच्यात वाट्याला येत असतं. हे तर नैसर्गिकच आहे, पण प्रेम आणि लाड, तेही अतिलाड यातला फरक पालक विसरून जातात. त्यांच्या सगळ्या आशा त्या ‘एकुलत्या’भोवतीच केंद्रित झालेल्या असतात. त्याला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणणं पालकांच्या जिवावर येतं. कुठल्याही परिस्थितीत ते आपल्यावर रागावू नये, याचीच मुख्यतः पालक काळजी घेत असतात.

परिणामी, ते मूल आगाऊ झालं, उर्मट झालं तरी पालक तिकडं दुर्लक्ष करतात. मागेल ती प्रत्येक वस्तू त्याला देतात. अर्थात, यात ते मुलाचं भलं करत नसतात. उलट त्याचं नुकसानच करत असतात. ‘मी काहीही करू शकतो-मला कोण काय बोलणार आहे?’, ‘मला हवं ते सगळं मिळालंच पाहिजे.’ अशा त्या लाडावलेल्या मुलाची वृत्ती होते. ती समाजासाठीच नव्हे, त्याच्या स्वतःसाठीही तापदायकच ठरते. हे सगळं इतर लोक कसं आणि का सहन करतील? काही काळ त्याच्या वयाकडं पाहून ‘जाऊ दे लहान आहे अजून,’ अशी सवलत मिळेलही. पण मोठं झाल्यावरही त्यांचे लाड करणार कोण? 

नीलचं दुसरं निरीक्षण असं की, बहुतेक वेळा पालकांच्या चुकीच्या धारणेमुळं मुलांचे फाजील लाड केले जातात. पालक जणू त्या मुलाच्या रूपानं पुन्हा ‘छान’ जगू पाहत असतात. ‘मला जे आयुष्यात मिळालं नाही ते सर्व माझ्या मुलाला मिळालं पाहिजे,’ हा त्यांचा प्रयत्न असतो. हेही सर्वश्रुत आहे की, आपल्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा, अपुरी स्वप्नं पालक मुलाच्या मिषानं पुरी करू पाहतात. 

काही पालकांना आपल्या प्रेमाचं प्रदर्शन करायची उबळ असते. मुलाला सतत काही घेऊन देणं, हेच त्यांचं प्रेम असतं - दुर्दैवाने इतकं मिळत गेलं की मुलाला त्या गोष्टींची किंमत वाटत नसते. आणखी मौज म्हणजे मुलाच्या आईला आपलं मूल छोटंच राहावं म्हणजे मला त्याचे खूप खूप लाड करता येतील असंही वाटतं असतं! म्हणूनच तर नील म्हणतो, ‘मुलं बिघडली तर पालकच जबाबदार असतात.’ त्यांना ‘प्रेम आणि लाड’ यातला व ‘स्वातंत्र्य आणि फाजील मुभा’ या दोन्हीतला फरक समजत नसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com