जेईई मेन २०२० अर्ज भरण्यासाठीची पूर्वतयारी

Career
Career

वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया, करिअर मार्गदर्शक
देशभरातील आयआयटी प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा, अभियांत्रिकीच्या एनआयटी, आयआयआयटी व देशभरातील अनेक नामांकित संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई मेन जानेवारी २०२० परीक्षा ‘एनटीए’तर्फे घेण्यात येत असून, परीक्षेचे ऑनलाइन अर्ज ३ ते ३० सप्टेंबरपर्यंत एनटीएच्या www.nta.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आजही सुमारे ८० टक्के विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफेवर अवलंबून असल्यामुळे संकेतस्थळावरून थेट अर्ज भरण्यापूर्वी प्रथम पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. 

प्रथम निर्णय घ्या 
       परीक्षा कोणत्या कोर्ससाठी म्हणजेच बीई, बीटेकसाठी अथवा बीआर्च, बी प्लॅनिंगसाठी याचा निर्णय घ्यावा. फक्त एका अथवा दोन्ही अथवा सर्व कोर्ससाठी एकच ऑनलाइन अर्ज करू शकता. 

   आपला प्रवेशाचा प्रवर्ग व आपण निवडत असलेले कोर्स यावर परीक्षा शुल्क अवलंबून असून, ते आपण कोणत्या पद्धतीने म्हणजेच नेटबॅंकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, पेटीएमद्वारे भरणार आहोत, याचा फॉर्म भरण्यापूर्वी निर्णय घ्या. 

   आपण जनरल, ईडब्ल्यू एस, एससी, एसटी, ओबीसी-एनसीएल या आरक्षणातून नोंदणी करणार असाल तर आपणाकडे आवश्यक कागदपत्रे, दाखले जून २०२०मध्ये उपलब्ध होणार आहेत का ते पाहावे. ओबीसीमधून प्रवेशासाठी एनसीएल (आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेला गट); तसेच राज्यात ओबीसीमध्ये असलात तरीही ओबीसी सेंट्रल लिस्टमध्ये आपला समावेश आहे का ते पाहावे. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस (www.ncbc.nic.in) यांच्या यादीत नाव असेल त्यांनाच सेंट्रल ओबीसी दाखला मिळतो. 

       फॉर्म भरताना कोणता आयडेंटिटी टाइप (पॅनकार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, फोटोसहित असणारे बॅंक पासबुक, वाहन परवाना अथवा इतर ओळखपत्रे) देणारा यांचा निर्णय घ्यावा. 

फोटो, स्वाक्षरीसंदर्भात थोडेसे 
       पासपोर्ट आकाराचा फोटो, रंगीत अथवा कृष्णधवल परंतु अत्यंत स्पष्ट, समोरून घेतलेला, चष्मा वापरत असल्यास चष्म्यासह, गॉगल मात्र नको. फोटोमध्ये चेहऱ्याचा भाग सुमारे ६० टक्क्यांहून अधिक मोठा असावा. फोटोखाली नाव, जन्मदिनांक अथवा फोटो काढल्याचा दिनांक टाकण्याची आवश्यकता नाही. जेपीईजी फॉर्मेटमध्ये १० ते २०० केबी आकारात स्कॅन कॉपी अपलोडिंगसाठी तयार ठेवावी. स्टुडिओमध्ये फोटो काढताना मात्र पूर्ण मेगापिक्सलचा काढावा व त्याच्या भरपूर प्रती अनेक परीक्षा व पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी काढून ठेवाव्यात. 
       एका स्वच्छ पांढऱ्या, कोऱ्या कागदावर वेगवेगळ्या पेनने तीन ते चार स्वाक्षऱ्या कराव्यात व त्यापैकी मध्यम जाडीच्या आकाराची सही निवडावी व स्कॅन करून ठेवावी. आकार चार केबी ते तीस केबीमध्ये असावा. स्वाक्षरी स्पष्ट असावी. 
       आवश्यकतेपेक्षा आकार कमी केबी असल्यास ईमेजेस स्पष्ट येत नाहीत; तसेच मर्यादेपेक्षा आकार जास्त असल्यास इमेज अपलोड होत नाही. फोटो व स्वाक्षरीसाठी करेक्शन संधी नाही याची नोंद घ्यावी. 

पासवर्डबाबत महत्त्वाचे... 
लाखो विद्यार्थ्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड महत्त्वाचा असून तो भक्कम असावा. म्हणजेच कमीत कमी ८ ते १३ अक्षरे, कमीत कमी एक कॅपिटल, एक लोअर केस, एका अंकाचा समावेश, संगणकावरील विशिष्ट बटण-स्पेशल की (%$&#@*) यापैकी कमीत कमी एकाचा वापर करून आपला पासवर्ड मजबूत करावा. सर्वसाधारणपणे सायबर कॅफेवाले ‘आडनाव अॅट १२३’ असा पासवर्ड वापरतात. हे चुकीचे असून आपण आपला पासवर्ड विविध पर्याय, कॉम्बिनेशन वापरून स्वतः तयार करून ठेवावा व तो वापरावा. पासवर्ड मित्रांना अथवा इतरांना देऊ नका, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. 

परीक्षा केंद्राची निवड 
राज्यात नगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे आणि वर्धा यांपैकी आपल्या पसंतीनुसार चार शहरांची निवड करून ठेवावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com