मुलं कृतीमधून शिकतात

Edu
Edu

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मुलांना स्वतः शिकवंसं वाटणं, स्वतःहून शिकता येणं, शिकावं कसं हे कळणं ही नव्या रचनावादी शिक्षणप्रक्रियेची वैशिष्ट्यं आहेत. 

कुठलीही गोष्ट मुलांना पक्की समजायला हवी... ती लक्षात राहायला हवी, तरच ते खरं शिक्षण होतं. हे कसं साध्य होतं? तसं अगदी सोपं आहे ते. ऐकलेलं विसरतं, पाहिलेलं लक्षात राहतं आणि केलेलं पक्कं समजतं. फक्त सांगितलेलं ऐकून मुलं शिकत नाहीत, कारण शिकणं ही कृतिशील अथवा क्रियाशील प्रक्रिया असते. कृतीच्या आधारे झालेली ज्ञानरचना खूप महत्त्वाची असते. अर्थात, या प्रक्रियेत अनुभवाचं योगदान असतंच. शिकणं ही क्रियाशील, तरी अनुभवाधारित प्रक्रिया असते. मुलांना अनेक गोष्टी स्वतः करण्याच्या अनुभवातून जाऊ देणं महत्त्वाचं असतं. अशा अनुभवातूनच मुलांना त्यांच्या क्षमता त्यांना स्वतःला कळत असतात. (आणि आपल्यालाही!) 

थोडक्‍यात, शिकणं ही प्रत्यक्ष वस्तू व कल्पना हाताळल्यानं प्रभावी होणारी अशी रचनात्मक प्रक्रिया असते. मुलांना शिकवण्यापेक्षा त्याचं त्यांना शिकू द्यायचं याचाच अर्थ, त्यांना करता येणं शक्‍य आहे ते करू द्यायचं. जे करता येणं शक्‍य नसेल, तेही करू द्यायचं असतं, फक्त त्यावर देखरेख करायची असते. अर्थात तेव्हाही हे कर... हे करू नकोस, अशा सूचनांचा मोह टाळायचा असतो. शिकताना चुकण्याची मुभा हवीच. स्वतःच्या चुकांमधून मुलं जे शिकतात, जी उत्तरं मिळवतात ती सांगितल्या गेलेल्या उत्तरापेक्षा दीर्घकाळ, खरंतर, कायमची स्मरणात राहू शकतात. कृतिशील शिक्षणातून मुलांना प्रत्यक्षातल्या समस्या सोडविण्याचं शिक्षण मिळत असतं. या क्रियाशील प्रक्रियेत मुलं आनंदानं सहभागी होतात, त्यांचा आत्मविश्‍वास वाढतो. शिकणं हे अनुषंगानं घडत जातं, त्यामुळं अशा शिकण्याचा मुलांना कंटाळा येत नाही. मुलं अक्षरशः रंगून जातात. 

साधारणतः जी मुलं चुळबुळी, दंगेखोर मानली जातात, ती सुद्धा अशा शिकण्यात सहजगत्या सहभागी होतात. एवढंच नव्हे, ज्यांना गतिमंद ठरवलं जातं, अशांनाही कृतिशील प्रक्रियेतून शिकवता येतं. मुख्य म्हणजे शिकवलं तरच मूल शिकतं, हा भ्रम दूर होतो. कृतिशील अनुभवांतून मुलं अर्थाचा शोध घेऊ पाहतात, हे जास्त महत्त्वाचं आहे. इथे निरर्थक, कंटाळवाण्या, क्‍लिष्ट शिक्षणाला वावच नसतो. करत जा, शिकत जाशील हाच इथं मूलमंत्र असतो. कृतिशील शिक्षणातूनच मुलांना मूर्त गोष्टींकडून अमूर्त संकल्पनांकडं नेता येतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com