जीवनकौशल्याचं शिक्षण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
मुलांनी शाळेत जाऊन फक्त ‘विषय’ शिकायचे नसतात. उत्तरे पाठ करून ती परीक्षेत लिहून पास व्हायचं नसतं, तर मुलांनी सर्वांगांनी फुलायचं असतं... व्यक्तिमत्त्वाचा विकास साधायचा असतो.. जीवनाशी जोडणारं शिक्षण घ्यायचं असतं, उद्याचा उत्तम, सुजाण नागरिक म्हणून ‘घडायचं’ असतं, हे आता पालकांनी पक्कं ध्यानात घ्यायला हवं. 

पूर्वी शाळांमध्ये इतिहास, भूगोलाबरोबरच नागरिकशास्त्र हा ‘विषय’ म्हणून तर शिकवला जायचाच, मात्र ‘सांस्कृतिक’चा वेगळा तास आठवड्यातून एकदा असायचा. यातून मुलांना थोडं पुस्तकांबाहेरचं, जीवनाशी जोडलेलं असं काही शिकवलं/दाखवलं जात असे. आता ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीत हे असं वेगळं शिक्षण घ्यायचं नसतं... कुठलाही विषय कृती, अनुभव, गटातून शिकत असताना मुलं आपोआपच हे सारं आत्मसात करत असतात. या नव्या पद्धतीमुळे मुलांच्या ‘जीवनकौशल्यांचा विकास’ कसा होत असतो, ते सचिन यादव यांनी उलगडलं आहे. ते सारांशानं असं आहे. 

    मूल स्वतः अनुभवातून शिकताना सवंगड्यासोबत, मुलं-मुली एकत्र अशा गटातून शिकत असतात, त्यामुळं मुलगा-मुलगी भेदभाव न राहता सहानुभूती निर्माण होते. परस्परांची मदत घेऊन शिकताना सहकार्याची भावना वाढीस लागते. आपुलकी, आत्मीयता निर्माण होते. 

    कृतिशील स्वयंशिक्षणामुळं व्यवहारातील अनुभव, पूर्वज्ञानाचा आधार घेत मुलं अनेक गोष्टींबाबत, समस्यांबाबत स्वतः विचार करतात, स्वतःच समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अनेक अमूर्त गोष्टींचा त्यांना उलगडा होतो. विविध संकल्पना स्पष्टपणे समजतात व त्यांच्यात निर्णयक्षमता विकसित होते. 

    ‘असे केले तर काय होईल,’ यांसारखे प्रश्‍न निर्माण करत सखोल चिकित्सक विचार करत शक्याशक्यता ती पडताळून पाहतात. हे सर्व विचार मुलांना सर्जनशीलतेकडं नेतात. तार्किक अनुमान काढण्याची सवय मुलांना लागते. यातूनच पुढं ते नवनवीन शोध लावू शकतात, नव्या संकल्पना समजू शकतात. 

    अनुभवातून नव्या ज्ञानाची निर्मिती होते, त्यामुळं घोकंपट्टीशिवाय ते ज्ञान कायमचं स्मरणात राहतं. असं प्राप्त ज्ञान, मुलं इतरांना परिणामकारकरीत्या व आत्मविश्‍वासानं पटवून देऊ शकतात. स्वतःचे ‘शोध’ ठामपणे मांडू शकतात. 

    मुलं अनेक घटनांबाबत एकमेकांमध्ये भाष्य करतात. त्यांतील कार्यकारण भाव उलगडू शकतात व ते सर्व लिखित स्वरूपात व्यक्त करतात. यातूनच पुढं साहित्यिक निर्माण होऊ शकतात. मुलं भावनांवर नियंत्रण ठेवायला, इतरांच्या भावना जाणायला व सामाजिक कृती करायलाही शिकतात. 

    ‘ज्ञानरचनावादी’ शिक्षणातून अशी विविध जीवनकौशल्यं मुलांमध्ये रुजवून त्यांचं व्यक्तिमत्त्व सूजाण, सक्षम व सर्जनशील असं घडवता येतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today