प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
अनेक पालकांना नवशिक्षण, ज्ञानरचनावाद हे सारं कशासाठी हा प्रश्‍न पडतो. ‘आम्ही काय ‘चांगलं’ शिकलं नव्हतो का?’  ‘इतकी वर्षं चालू होतं ते शिक्षण काय चुकीचं होतं का,’ ‘त्यातूनही चांगले चांगले डॉक्‍टर्स, इंजिनिअर्स निर्माण झालेच ना?’ इत्यादी... 

हाच दृष्टिकोन असल्यास कुठल्याच क्षेत्रात काहीच सुधारणा, बदल करायच्याच नाहीत का? विविध क्षेत्रांत जे संशोधन सुरू असतं, त्यातून काही नवे निष्कर्ष समोर येत असतात, त्यांचा वापर करायचा नाही का? गेल्या ५०-६० वर्षांत मेंदूसंदर्भातलं संशोधन, आकलनशास्त्र, अध्यापनविषयक सिद्धांत, ‘शिकण्या’विषयीचे निष्कर्ष... अशा अनेक सैद्धांतिक विचारांमुळं अध्ययन आणि अध्यापन या वर्ग शिक्षणातल्या संकल्पांचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. शिकणं-शिकवणं नेमकं कसं असायला हवं, यात अधिक स्पष्टता आणली आहे. 

आजवरच्या शिक्षणपद्धतीत नेमक्‍या काय त्रुटी होत्या? प्रा. रमेश पानसे म्हणतात त्याप्रमाणे. ‘आजवरच्या पठडीबद्ध शिक्षणकेंद्री शिक्षणात सर्वांत मोठी उणीव होती, ती शिक्षकांच्या जबाबदारीबाबतची. म्हणजे काय, तर आजवर शिक्षकांवर केवळ ‘विषय’ शिकवण्याची जबाबदारी होती. मुलांच्या ‘शिकण्याची’ जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. त्यामुळं विद्यार्थ्यांचं शिकणं ही सर्वस्वी विद्यार्थ्यांचीच जबाबदारी मानली गेली होती. ‘मी माझा विषय व्यवस्थित शिकवला आहे. आता काही मुलं तो नीट शिकली नाहीत, तर तो त्यांचा प्रश्‍न आहे,’ अशी भूमिका (न कळत का होईना) शिक्षक घेऊ शकत होते. यातून काही विद्यार्थीच ‘नीट’ शिकत होते. महत्त्वाचा मुद्दा हा आहे, शाळांमध्ये येणारे सर्वच विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. सर्वांचच शिकणं महत्त्वाचं असते. तेव्हा त्यांचं शिकणं योग्य पद्धतीनं (सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत) घडेल हे पाहण्याची, ते घडवून आणण्याची अंतिम जबाबदारी शिक्षकांचीच असते.’ 

शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे ‘योग्य शिकणं’ घडवून आणतात, की नाही, हे पाहण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व्यवस्थापन किंवा मग केंद्र प्रमुख, शिक्षणाधिकारी यांची असते, असली पाहिजे. हे असतं विद्यार्थिकेंद्री शिक्षण. ते योग्य रीतीनं होतंय, की नाही हे कळण्याचा अतिशय सोपा निकष आहे, सर्व विद्यार्थी एकाग्रतेनं, आनंदानं ‘शिकण्या’च्या प्रक्रियेत भाग घेत आहेत की नाही, हा! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today