‘लर्निंग होम’ कसं असेल?

Education
Education

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
‘लर्निंग होम’ ही शिक्षणाची प्रयोगशाळा असेल. ‘घरानंही शिकवावं, शाळेनं घर व्हावं’ या तत्त्वावर चालणाऱ्या या ‘आनंदघरा’त शिक्षक व पालक दोघांचाही स्वयंस्फूर्त सहभाग असेल. 

‘लर्निंग होम’ची संपूर्ण रचना बालकेंद्री असेल. मुलांना आनंद वाटेल, येथे यावेसे वाटेल. 

वेगवेगळ्या घरांतून आलेली मुले इथे कुटुंबासारखी एकत्र असतील. एकमेकांशी प्रेमाने आणि विश्‍वासाने वागतील. त्याचप्रमाणे त्यांची काळजीही इथे घेतली जाईल. मुलांचे स्वातंत्र्य जोपासणारे, स्वयंअध्ययनाचे कौशल्य विकसित होणारे, स्वयंशिस्त अंगी बाणवणारे आणि स्वावलंबी कृती करण्यास अनुकूल वातावरण असेल. 

मुलांचा सहजस्वभाव, गती, क्षमता, शैली यानुसार शिकायला मिळेल. हसणे-खेळणे या मुलांच्या सहजधर्मानुसार शिकणे हा सुद्धा मुलांचा सहजधर्म होईल, त्यामुळे ताणविरहीत शिक्षण मुलांना घेता येईल. 

मुलांच्या भावनिक, बौद्धिक, सामाजिक, संवेदनाकारक व सौंदर्यदृष्टीच्या विकासाकडे लक्ष दिले जाईल. शिक्षकांचे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासाकडे बारकाईने लक्ष असेल. मुलांच्या विविध प्रकारच्या विकासाच्या नोंदी नियमितपणे ठेवल्या जातील. 

दर दोन महिन्यांच्या पालकसभांमधून मुलांची प्रगती पालकांना दिली जाईल. यातील विविध उपक्रमांत पालकांचा सहभाग महत्त्वाचा मानला जाईल. पालक हाही आमचा शिक्षक असेल. 
शिक्षणप्रक्रिया ही व्यक्तिगत असेल. 

विविधांगी शिक्षणाच्या मुलांना अनेक संधी दिल्या जातील. अभ्यासक्रमाला पूरक अशा वैविध्यपूर्ण, कल्पक शैक्षणिक साधनांचा मुलांच्या शिक्षणात वापर केला जाईल. 

एका लहान गटात त्याच क्षमतेतील ८ ते १० मुले असतील. वर्ग, तास, घंटा, परीक्षा... असं या ‘आनंदघरा’चं स्वरूप नसेल. विविध विषयांतील सखोल ज्ञान मिळवण्यासाठी प्रकल्प पद्धतीचा वापर केला जाईल. 

अनेक ‘लर्निंग होम्स’चे हे एक प्रमुख केंद्र म्हणजे ‘द सेंटर ऑफ लर्निंग होम’ एक संशोधक केंद्र असेल. त्यामुळे प्रत्येक मुलांच्या प्रत्येक विकासाच्या नोंदी करून मुलांच्या विकासास आवश्‍यक ती मदत केली जाईल. प्रत्येक मुलाचा विकासालेख ध्यानात घेऊन त्याच्या बुद्धिमत्तेनुसार पुढील शिक्षण दिले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com