शाळेत कधीच न येणारे वडील...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
बालक-पालक नातं कसं असावं हे आपण पाहतो आहोत. जाणकार मंडळी सुजाण पालकत्वासाठी काही मार्गदर्शन करत असतात. काही सूत्रं सांगत असतात, ती आपण समजून घेतो आहोत. मात्र, पालकत्व समजून-उमजून निभावायचं असतं, तसं ते आतून येणारं, उत्स्फूर्तही असतं... असायला हवं. ज्ञानदा नाईक या प्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांच्या कन्या. खरं तर स्वतःच्याच विश्‍वात रममाण असणारे, प्रवासाला, चित्रे काढायला, शिकारीसाठी सतत हिंडणारे ज्ञानदाचे तात्या हे पालक म्हणून तिच्यासाठी असा कितीसा वेळ देणार? कुणी ज्ञानदा कितवीत आहे, असं विचारलं तर ते तिच्या आईला विचारणार, ‘बाबी कितवीत आहे गं?’ 

साहजिकच तात्या कधी शाळेत पालक म्हणून जात नसत. शाळेत बक्षीस समारंभ असे, अभ्यासात, अभिनयात, नृत्यात बक्षीस मिळायचं तेव्हा ज्ञानदाला अगदी तीव्रतेनं वाटायचं- तात्यांनी आपलं कौतुक पाहायला यावं. ती वाट पाहत असे, पण तात्या येत नसत. ते आले नाहीत की ज्ञानदा आईवरच चिडून बसत असे. आणखीही एक होतं. निबंधात १० पैकी ९ गुण पडले की बाई म्हणत, ‘तुला वडिलांनी मदत केलेली दिसते!’ वडील प्रसिद्ध लेखक असल्यानंच बाईंकडून तसं ज्ञानदाला ऐकून घ्यावं लागत असे. त्या वेळीही वडील लेखक आहेत म्हणून आपण स्वतः लिहिलेल्या निबंधाचं कौतुक होऊ नये, याचं ज्ञानदाला वाईट वाटायचं. पण हे सारं असलं तरी एखाद्याच प्रसंगानं सारीच भरपाई होऊन जात असे. सहावीत असताना सकाळी सकाळी कशामुळं तरी आईवर रागावून ज्ञानदा न जेवता, डबा न घेता शाळेत निघून गेली होती. शाळेत गेल्यावरही मनात राग धुमसत होताच.

मधली सुटी झाली. मुली सगळ्या डबे खाऊ लागल्या. भयंकर भूक लागलेली ज्ञानदा मात्र संतापून तशीच बसून होती. तेवढ्यात मैत्रिणी म्हणाल्या, ‘तुझे वडील आलेत.’ ज्ञानदा वर्गाबाहेर धावली. शाळेतच्या गेटपाशी तात्या तिचा डबा हातात घेऊन उभे होते. ज्ञानदाला रडू फुटलं. तिला जवळ घेऊन त्यांनी म्हटले, ‘आई म्हणाली तू आज रागावून न जेवताच गेलीस. अगं, अन्नावर असा राग काढू नये. आता पटकन डबा खाऊन घे बरं!’ ज्ञानदा लिहिते, ‘त्या वेळी मला पहिल्यांदा जाणवलं, हे मोठे लेखक वगैरे असले तरी आधी माझे वडील आहेत.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivraj gorle edu supplement sakal pune today