महाविद्यालयाची योग्य निवड

डॉ. श्रीराम गीत
गुरुवार, 18 एप्रिल 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या
याआधीच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे सीईटीद्वारे प्रवेश घेणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी २०० पैकी १५० मार्क असतील तर, उत्तम कॉलेज, हवेहवेसे वाटणारे कॉलेज व मनातली, स्वप्नातली शाखा मिळण्याची शक्‍यता असते. दरवर्षी शाखा/कॉलेज यात प्राधान्यक्रम बदलू शकतो म्हणून ‘शक्‍यता’ असा शब्द वापरत आहे. जे विद्यार्थी उत्तम कॉलेजला प्राधान्य देतात त्यांचे नेहमीच भले होते. कारण सध्या या व अशाच कॉलेजात कॅंपस इंटरव्ह्यूसाठी चांगल्या कंपन्या येतात. फक्त पुण्यामध्ये अशा कॉलेजची संख्या एका हाताच्या बोटांइतकीच आहे, तर एकूण कॉलेजेस पन्नासतरी आहेत. प्रत्यक्ष कॅंपसची नोटीस लागते त्या वेळी त्यामध्ये शाखेचा उल्लेखसुद्धा नसतो. हा सारा उलगडा त्या वेळी होण्याऐवजी प्रवेशाच्या वेळी जरा समजून घेतले तर?

मग होते काय? कॉम्प्युटरचा हट्ट धरून सामान्य कॉलेज निवडणारा विद्यार्थी बेकार राहतो. मात्र इन्स्ट्रुमेंटेशन, आयटी इलेक्‍ट्रॉनिक्‍स, प्रॉडक्‍शन अशा शाखेवर तडजोड करून उत्तम कॉलेज निवडलेला विद्यार्थी कॅंपसद्वारा हवे तिथे नक्की पोचू शकतो. इंजिनिअरिंग शाखांमधल्या दऱ्या मिटून पाच-सहा वर्षे झाली आहेत. सारेच कॉम्प्युटरवर कामे करतात एवढे लक्षात घ्यावे.
मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल, इ अँड टीसी, सिव्हिल, मेटॅलर्जी, पेट्रोकेमिकल, पॉलिमर या शाखातील विद्यार्थ्यांना इंजिनिअर झाल्यावर त्याच क्षेत्रात काम करण्यासाठी सामान्य पगारावर किमान दोन वर्षे काम करावे लागते.

मात्र नंतर त्यांची छान प्रगती होत जाते. कारण हा सामान्य पगार नसतो, तर काम शिकण्यासाठीचा दिलेला पगार असतो हे प्रखर वास्तव आहे. नुकत्याच पास झालेल्या इंजिनिअरांचे करायचे काय हा भारतीय इंडस्ट्रीपुढचा यक्ष प्रश्‍न गेल्या पन्नास वर्षांत सुटणे तर सोडाच; पण तो आता भीतीदायक पातळीवर पोचला आहे. म्हणूनच पदवीधर इंजिनिअरपैकी जेमतेम २५ टक्के एम्प्लॉयेबल (नोकरीवर ठेवण्यालायक) असतात असे वाक्‍य इंडस्ट्रीत रूढ आहे. मात्र काम करण्याची, काम शिकण्याची तयारी असलेल्या, पगाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रत्येकाचे इंडस्ट्री स्वागतच करते असते. त्यांची त्यांनाही गरज असते म्हणून.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Shriram Git edu supplement sakal pune today