उमेदवारीचा काळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर
शिकतानाच्या उमेदवारीबद्दल, कामाबद्दल हे सारे वाचताना अनेक पालकांच्या मनात प्रश्‍नांचे मोहोळ तयार होताना मला स्पष्ट दिसत आहे. या मोहोळावरच्या मधमाश्‍या मोहोळातील मध काढणाऱ्या व्यक्तींना फारच क्वचित चावतात, म्हणून तर मधुमक्षिकापालन हा एक चांगला व्यवसाय बनला आहे. या प्रश्‍नांच्या संदर्भातील उत्तरे देतदेतच आपण विविध उदाहरणे पाहू यात का? वडिलांचा व्यवसाय आहे. मुलगी चुणचुणीत आहे.

मात्र अभ्यासात कसाबसा पहिला वर्ग मिळतो. मग तिने कोणत्याही शाखेतील पदवीचा अभ्यास करताना आठवड्यातील किमान दहा तास व्यवसायाचे स्वरूप समजून घेण्यात घालवले तर? पदवीनंतर काय करायचे याच अल्पसे भान तिला त्यातून नक्की येणार आहे. मुलगी हा उल्लेख अशासाठी, की पदवी झाली, पुढे काय, हा यक्षप्रश्‍न घेऊन अनेक घरांत घनघोर चर्चा होत राहतात. शहरामध्ये पदवी घेतानाचे वय २१ तर लग्नाचे वय २६/२७ या दरम्यान. हा प्रश्‍न न भेडसावणारे घर अजून माझ्या पाहण्यात नाही. 

आई बॅंकेत आहे. वडील आयटीमध्ये आहेत आणि चिरंजीवही आयटीमध्ये इंजिनिअरिंग करत आहेत. चिरंजीवांना आईच्या बॅंकेत वापरले जाणारे सॉफ्टवेअर वा वडील आयटीमध्ये काम करतात याविषयी गाढ अज्ञान असते. त्याला ‘अभ्यास करू देत’ यावर आईवडिलांचे एकमत असते. मुलाला पॅकेजची मोठी स्वप्ने पडत असतात. अर्थातच, शिक्षण व करिअर या सांध्यावरचा खडखडाट न संपणारा असतो. वडील जाहिरात क्षेत्रातील मार्केटिंगच्या नोकरीत, तर आई प्राध्यापक असलेल्या मुलाला ‘एमबीए’ करायचे असते. मार्क पडले, प्रवेश मिळाला म्हणून त्याने इंजिनिअरिंग संपवत आणलेले असते. मात्र ‘एमबीए’ करू इच्छिणाऱ्या मुलाला वडिलांच्या मार्केटिंगच्या कामाबद्दल तेही अत्यंत महत्त्वाच्या जाहिरात क्षेत्राबद्दल कसलीही उत्सुकता नसते. माहिती तर नसतेच नसते. आईची उत्सुकता फक्त मुलाला उत्तम संस्थेत ‘एमबीए’ला प्रवेश कसा मिळेल एवढ्या पुरतीच असते. कारण नंतर छानसे पॅकेज घेऊन मुलगा साहेब बनू शकणार असतो ना?

उमेदवारी खरंतर घर सोडून अन्य कोठे केली तर फारच उत्तम, मात्र ते नसल्यास प्रथम आईवडिलांचे काम चौकसपणे समजावून घेणाराही ‘उमेदवारी’ करत असतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Shriram Git edu supplement sakal pune today