कामाची आवड आणि निकड

Career
Career

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर
तुम्हाला केलेल्या कामाचा मिळतो तो पगार समजावा, मात्र ते काम कसे करायचे हे शिकवावे लागते ना? त्या शिकवण्याच्या कालावधीत सहसा कंपन्या ट्रेनी इंजिनिअर, ट्रेनी मॅनेजर, ट्रेनी सुपरवायझर अशी नावे देतात. अगदी उत्तम संस्थेतून उत्तम मार्कांनी घेतलेली पदवी असली, तरी हा काळ कोणालाच कधी चुकत नसतो. दुर्दैवाने, सध्याचे बहुसंख्य विद्यार्थी असा काही काळ असतो हेच विसरत चालले आहेत. परिणाम साधा सरळ होत जातो. 

कामाबद्दल मनात नावड सुरू होते. काम करताना, सहकाऱ्यांशी वागताना व वरिष्ठांशी बोलताना या साऱ्या गोष्टी नकळत व्यक्त होऊ लागतात. हळूहळू या साऱ्याचे रूपांतर चिडचिडीत होत जाते. हीच चिडचिड नकळत प्रत्येक बाबतीत व्यक्त होऊ लागते, अन्य लोकांना याचे कारण उमजत नसल्याने ते दूर होऊ लागतात. याच कारणांनी घरच्यांशी संवाद तुटक होतो. 

हा सारा प्रश्‍न मुख्यतः आयटी कंपन्यांमध्ये गेली दोन दशके जाणवत होता. ‘ॲट्रिशन प्रॉब्लेम’ या नावाने त्यावर खूप चर्चा, संशोधन, उपाय शोधायचे प्रयत्न झाले, आजही सुरू आहेत. मात्र, आता साऱ्याच क्षेत्रांत या अस्वस्थेतेने शिरकाव केला आहे. आयटीपेक्षा अन्य साऱ्याच क्षेत्रातील पगार हे अक्षरशः निम्म्या रकमेचे आहेत, हे प्रखर वास्तव लक्षात न घेता हा अस्वस्थपणा वाढत आहे. याचे दृश्‍य परिणाम म्हणजे हातचे सोडून पळत्याच्या मागे जाण्याची एक चढाओढच अनेक क्षेत्रांत दिसून येते. 

बी.कॉम. झाल्यावर मिळालेली नोकरी अकौंटसमधली आहे, ती आवडत नाही, हे मला करायचेच नव्हते, हे वाक्‍य तर मी कायम ऐकत आलो आहे. पूर्ण पाच वर्षे हा विषय शिकवला असल्याने किमान ७० टक्के विद्यार्थी त्यातूनच शिकत कामाचा विस्तार करत जातात, हे पटवून घेणे अशा विद्यार्थ्यांना शक्‍य होत नाही. त्यांना आयटीत जावेसे वाटते वा कुवत नसताना फक्त ‘एमबीए’ हा उपाय आहे याची त्यांची खात्री पटलेली असते. 

कोअर इंजिनिअरिंग पूर्ण करून स्पर्धा परीक्षांकडे वळणे हा तर सध्याचा एक ट्रेंडच बनत चालला आहे. याउलट उमेदवारी, नोकरी, अनुभव व प्रगती हा अनेक दशकांची मळलेली वाट खात्रीची आहे, असे त्यांना वाटत नाही. सहसा जे यशस्वी होतात त्यांनीसुद्धा दोन-तीन वर्षे इंजिनिअरिंगमध्ये काम केलेले असते, त्यादरम्यान स्पर्धा परीक्षांची माहिती जमवलेली असते हे सांगूनसुद्धा त्यांना पटत नाही. प्रश्‍न उभा ठाकतो तो ५-६ वर्षांनंतर स्पर्धा परीक्षा दमवतात, थकवतात तेव्हा. त्या वेळी इंजिनिअरिंग पार विसरून गेलेले असते. वयाची अठ्ठावीशी समोर आलेली असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com