सर्व्हिस इंडस्ट्रीतील भविष्याची चाहूल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा 'सकाळ पुणे टुडे'मधील 'Edu' या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून...

वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर
घेतलेली पदवी व मिळणारी नोकरी यामध्ये घेतलेले शिक्षण फारतर ४०/५० टक्के उपयोगी पडते, असे म्हटले तर फारशी चूक होणार नाही. काहींना ती अतिशयोक्ती वाटू शकेल. पण विविध क्षेत्रांत सध्या चालणारी कामे व पदवीदरम्यानचे शिक्षण यामध्ये साम्य शोधणे हाच एखाद्या डॉक्‍टरेटचा खासा विषय ठरू शकावा. 

स्वाभाविकपणे जेव्हा हाती आलेली एखादी पदवी तीही सहसा फर्स्ट क्‍लासमध्ये असताना पदवीधराला नोकरी मिळत नाही, तेव्हा त्याच्या मनातील खदखद शब्दांत व्यक्त करणे कठीण होत जाते. अशांची संख्या एकूण पदवीधरात फार मोठी भरते. टक्केवारी सांगणे अशक्‍य आहे. कारण अन्य जास्तीचे शिक्षण घेण्याकडे त्यातील अनेक वळत राहतात. या जास्तीच्या शिक्षणाऐवजी नेमक्‍या शिक्षणाचा, नेमक्‍या कौशल्याचा विचार केला गेला तर? अनेक पटींनी उपयुक्त व खात्रीशीर उत्पन्नाची हमी देणारे अनेकदा नाकारले जातात. कारण एकच, व्हाइट कॉलर जॉब मनात, स्वप्नात पक्का रुजलेला आहे. माझी खुर्ची, माझे टेबल, माझ्या डोक्‍यावरचा पंखा (शक्‍य असल्यास एसी) व याद्वारे एक तारखेचा मिळणारा पगार यासाठी कितीही प्रयत्न केला तरी उपलब्ध नोकऱ्या व पदवीधरांची संख्या यामध्ये काही पटींची तफावत कशी दूर होणार? 

जगातील साऱ्याच प्रगत देशांमध्ये ब्लू कलर जॉब्ज त्यातून मिळणारा पगार, त्याबद्दलचा राखला जाणारा आदर याचा इतिहास आता पन्नास वर्षांचा होत आहे. आपला शेजारी चीन वा बदलाचा एक यशस्वी निदर्शक आहे. जीवनशैलीतील सुबत्ता भारतातील मोजक्‍या ब्लू कॉलर कामांना मिळाली आहे. मात्र त्यांच्याबद्दलचा आदरभाव अजून कोसो दूर आहे. एका छोट्या उदाहरणातून हे वाचकांपुढे मुद्दाम मांडू इच्छितो आहे. 

नवीन नोकरी लागलेला कॉल सेंटर वा बीपीओमध्ये काम करणारा पदवीधर (खरे तर बारावी पास नंतरसुद्धा तीच नोकरी तो मिळवू शकत असतो, पण...) अवेळी ओला करून घरी येऊ लागतो. त्याच्याकडे अभिमानाने पाहणारे त्याचे आई-वडील त्याच वेळी ओलाचा मालक असलेल्या महिना  साठ सत्तर हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्तीकडे ड्रायव्हर म्हणून पाहत असतात. त्यांच्या मुलाचा पगार असतो फारतर वीस हजार रुपये. हेच आई-वडील ट्रिपला युरोपला जातात तेव्हा त्यांच्या कोचचा ड्रायव्हर कम गाइड कम मालक यांच्याशी मात्र त्यांची वागणूक अत्यंत आदबीची व सौजन्यपूर्ण तसेच कौतुकभरल्या नजरेची असते, असो. 

मात्र, हा अघटित बदल प्रचंड वेगाने वाढणाऱ्या साऱ्या सर्व्हिस इंडस्ट्रीच्या सुनामीतून आपल्या देशात येऊ घातला आहे. ज्या पालकांना, पदवीधरांना या सर्व्हिस इंडस्ट्रीतील विविध कौटील्यांची कामाची, त्यातील इंटर्नशिपची ओळख होईल त्यांचे भवितव्य उज्ज्वल असणार आहे. ही आहे येत्या दशकाची चाहूल! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Shriram Git edu supplement sakal pune today