शब्दांच्या पलीकडे...

श्री श्री रविशंकर
शनिवार, 13 एप्रिल 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग
आपण एकदा शब्दांची निरर्थकता ओळखल्यास आपले जीवन सखोल होऊ लागते आणि आपण ‘जगणं’ सुरू करतो. आपण सकाळपासून रात्रीपर्यंत शब्दांमध्ये जगत असतो. या उद्देश आणि उद्देशपूर्तीच्या शोधात आपण सर्व उद्देशच हरवून बसतो. त्यामुळे आपण शांतपणे झोपूही शकत नाही. आपण रात्रीही शब्दांमुळे चिंताग्रस्त होतो. अनेक जण रात्री झोपेत बोलतात. त्यामुळे शब्दांपासून त्यांची सुटका होत नाही. चिंतांचे मूळ कारण शब्द आहे. तुम्ही शब्दांशिवाय चिंताग्रस्त होऊ शकत नाही. तुमची मैत्रीही शब्दांवर आधारित असते. कोणीतरी म्हणते, ‘‘ओह, तू खूप चांगला, सुंदर आणि दयाळू आहेस, मी माझ्या आयुष्यात कधीही तुझ्यासारखी व्यक्ती पाहिली नाही. मी तुझ्यासारख्या व्यक्तीचाच शोध घेत होतो.’’ त्यानंतर तुम्ही अचानक प्रेमात पडता. त्याचप्रमाणे, कोणीतरी शिवीगाळ करते तेव्हा दु:खी होता, मात्र ते फक्त शब्द असतात. आपले जीवन केवळ शब्दांवर आधारित असल्यास ते खूप उथळ होईल. जीवनातील सखोल किंवा अर्थपूर्ण गोष्टी शब्दांमध्ये व्यक्त करता येऊ शकत नाहीत. प्रेमाचा अनुभव किंवा खरेखुरे समाधान शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाहीत. खऱ्या मैत्रीलाही शब्द नसतात.

आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर आपण एकही शब्द न बोलता कधी शांतपणे बसतो का? शांतपणे कार चालवताना आपण सोबत असलेल्या व्यक्तीसह आसपासचे सौंदर्य, सूर्योदय, टेकड्या पाहिल्याचे तुम्हाला आठवते का? नाही.

या वेळी आपण गप्पा सुरू करतो आणि हे सौंदर्य एकप्रकारे नष्टच करतो. आपण आपले मन आवाजाने भरून टाकलेय. आपली अंतर्गत चिंता मोठी असल्यास तितका बाहेरचा आवाजही मोठा असेल. कारण तो थोडासा सुखकारक वाटतो. आपल्या जाणिवेची पातळी उच्च असेल, तितके आपण तणावमुक्त असू. आपले अस्तित्वच आपल्याबद्दल बोलत असते. एखादा महान तत्त्ववेत्ता तुम्हाला प्रेमावर व्याख्यान देईल, मात्र प्रेम अनुभवता येणार नाही. कधीतरी एकटे बसा, ध्यान करा, शांत वातावरणात प्रेमाचा अनुभव घ्या. आपल्या अस्तित्वाचे सार प्रेमच आहे. त्यामुळेच शब्दांच्या पलीकडे जा, त्यानंतर, प्रेम प्रकट होईल. साधे व्हा, निरागस व्हा. हे सर्व प्रेमातून शक्‍य आहे. तुम्ही सौंदर्याला शरण जा. आपण अशी शरणागती न पत्करल्यास सौंदर्याच्या मालकीची इच्छा बाळगता. शरणागती पत्करल्यावर मालकीची भावना संपूर्णपणे नष्ट होते. आपण शांततेत एकमेकांशी चांगला संवाद साधू शकतो. एकमेकांच्या हृदयातूनही आपण तो करू शकतो. आपण पक्षी आणि त्यांच्या गाण्यामधील वेळही मग ऐकू शकू, ती खूपच मंजुळ असते. त्यामुळेच स्वत:मध्ये थोडेसे खोलवर जा. तुम्हाला स्वतःमधील हरवलेले संगीत ऐकू येईल. हे दैवी संगीत आपल्या स्वतःच्या शरीरातच असते, आपल्याला फक्त त्याची जाणीव नसते. आपण स्वतःबरोबरच शांततेत न राहिल्यास जीवनातील अनेक प्रकारच्या सौंदर्य गमावून बसू.

तुम्ही चंद्र, गुलाब पाहा; पण तो सुंदर आहे, असे म्हणू नका, तो तेथे आहे इतकेच. जीवनात खूप गोष्टी असतात. आपण शब्दांचा अपुरेपणा ओळखू तेव्हा जीवनाची काहीशी सखोलता मिळवू.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sri sri ravishankar all is well sakal pune today