जबाबदारीची ‘योग’ जाणीव

Yog
Yog

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
पातंजली मुनींनी योगशास्त्राचा हेतू स्पष्ट करताना म्हटलेय की, ‘दुःख येण्यापूर्वीच ते थांबविणे हा योगशास्त्राचा हेतू आहे.’ दुःख मग ते कोणत्याही प्रकारचे असो. लोभ, राग, मत्सर, निराशा आदी सर्व प्रकारच्या नकारात्मक भावना योगाभ्यासाच्या माध्यमातून भरून येतात. आपण आनंदी असतो तेव्हा आपल्यामध्ये विस्ताराची एक प्रकारची भावना येते, याचे तुम्ही कधी निरीक्षण केलेय का? याउलट आपण अपयशी होतो किंवा कुणीतरी आपला अपमान करतो, तेव्हा आपल्यामध्ये कशाचे तरी आकुंचन होते. योग म्हणजे आपण आनंदी असताना या विस्तारणाऱ्या तसेच दुःखी, निराश असताना संकुचित पावणाऱ्या घटकावर लक्ष केंद्रित करणे होय.

आपल्याला नकारात्मक भावनांबद्दल नेहमीच असाह्य वाटते. आपल्याला घर, शाळा, महाविद्यालय कोठेही, कोणीही नकारात्मक भावना कशा हाताळायच्या, हे शिकवत नाही. आपण एखाद्या कारणाने निराश झालो, तर बराच काळ निराश राहतो किंवा ही मनःस्थिती आपोआप भरून येण्याची वाट पाहतो. ही मनःस्थिती बदलण्याचे गुपित योगशास्त्रामध्ये दडलेय. योग तुम्हाला स्वतंत्र बनवतो. तो तुम्हाला स्वतःच्या नकारात्मक भावनांना बळी पडण्यापासून रोखतो. त्याऐवजी कोणत्याही तुम्हाला हव्या असलेल्या भावनेत किंवा मनःस्थितीत राहण्याच्या दृष्टीने सशक्त करतो. योग एखाद्याला आयुष्यात अधिक जबाबदार बनविण्यासाठी मदत करतो. यालाच कर्मयोग असे म्हणतात. आपण सर्वजण आयुष्यात अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या निभावतो. त्या योगी किंवा विनायोगी म्हणून पार पाडण्याचा पर्याय आपल्याकडे असतो. योगी जबाबदार तर विनायोगी बेजबाबदार असतो.

योगाभ्यासामुळे तुमच्यामध्ये अधिक ऊर्जा, उत्साह निर्माण होतो. त्यामुळे योगच्या माध्यमातून तुम्ही निश्‍चितपणे एक जबाबदार शिक्षक, डॉक्टर, उद्योगपती बनू शकता. योग आपल्यामध्ये जबाबदारीच्या जाणिवेबरोबरच काळजी घेण्याची, देवाणघेवाण करण्याची वृत्तीही वाढवतो. आपल्या सर्वांमध्ये या गुणांचे सुप्त बीज दडलेय. योग त्याला खतपाणी घालतो.

तुम्हाला जबाबदारी घेणे कधी आवडत नाही. तुम्ही तणावात आणि थकलेले असता तेव्हाच, होय ना? तुमच्यात अधिक उत्साह असेल तेव्हा तुम्ही नक्कीच या हलकेफुलकेपणाच्या भावनेतून अधिक जबाबदारी घ्याल. तुम्ही नीट निरीक्षण केले; तर ताण, अविश्वास आणि इतरांबद्दलची भीती सर्व संघर्षाच्या मुळाशी असल्याचे तुमच्या लक्षात येईल. योग तुम्हाला या तिन्हीवर मात करण्यास मदत करतो. तुमची जाणीव व्यापक झाल्यामुळे इतरांबद्दलची भीती नष्ट होते. प्रत्येक जण तुमचा आणि तुम्ही प्रत्येकाचे भाग असल्याचे तुम्हाला वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com