श्रद्धेच्या अंतरंगात...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!|
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर,प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
विश्वास हा बुद्धीचा, तर भक्ती हृदयाचा विषय आहे. ध्यान बुद्धी (मेंदू) आणि हृदय दोन्हींना जोडते. विकसित बुद्धी ही श्रद्धापूर्ण असते. विकसित हृदय ज्ञानाने परिपूर्ण असते. आपली बुद्धी आणि हृदय व्यक्तीमध्ये, भावांमध्ये विश्वास ठेवते. कोणत्याही व्यक्तीमध्ये लेशमात्रही श्रद्धा नसेल, भक्ती नसेल हे अशक्यच आहे. प्रश्न आहे तो केवळ संतुलनाचा. विज्ञानात आधी ज्ञान व नंतर श्रद्धा येते. अध्यात्मात आधी श्रद्धा आणि मग ज्ञान येते. उदा. कीटकनाशके आणि रासायनिक खते यांची माहिती आपल्याला विज्ञानाद्वारे मिळाली. त्यानंतर लोकांचा त्यावर विश्वास बसला आणि जगभर त्याचा वापर होऊ लागला. यानंतर माहिती झाले की, ती चांगली नाहीत व श्रद्धा सेंद्रिय खताकडे वळली. अँटीबायोटिक्सच्या बाबतीतही तसेच घडले. विशिष्ट ज्ञानावर श्रद्धा बसते; पण ते ज्ञान बदलताच श्रद्धासुद्धा बदलते. ज्ञान आणि विज्ञानावरची श्रद्धा ही जीवनाच्या पूर्ण बहरलेल्या अनुभूतीपूर्ण ज्ञानाऐवजी एखाद्या वेगळ्या घटनेद्वारे आलेली असते.

अध्यात्मात श्रद्धा आधी आणि ज्ञान नंतर येते. जसे की, सुदर्शन क्रिया, प्राणायाम, योगासने आणि ज्ञान- प्रथम तुम्हाला श्रद्धा आणि ज्ञान पाठोपाठ येते. उदा. तुम्ही प्राणायाम श्रद्धापूर्वक केले तर प्राणाचे ज्ञान मिळेल. ध्यानधारणा श्रद्धेने केलीत तर चेतनेचे ज्ञान पाठोपाठ येईल. निरक्षर माणूसदेखील श्रद्धेच्या जोरावर सखोल ज्ञान मिळवू शकतो. विज्ञान मनुष्य प्राण्यालासुद्धा पदार्थ मानते, तर अध्यात्म पृथ्वीलाही जिवंत माता मानते. इतकेच नव्हे, नद्या आणि पर्वतांनाही ते जिवंत व्यक्ती मानते. विज्ञान जीवनाला पदार्थ मानते.

अध्यात्म पदार्थाला जीवन मानते. तुम्हाला वाटत असेल की, तुमची देवावर असलेली श्रद्धा हे त्याच्यावर उपकार आहेत; तर तुम्ही चुकता आहात. तुमची गुरू आणि परमेश्वरावरची श्रद्धा याने देव आणि गुरू यांना काही फरक पडत नाही. श्रद्धा हे तुमचे धन आहे. श्रद्धा तुम्हाला क्षणात शक्ती देते. ती तुमच्यामध्ये स्थैर्य, एकात्मता, शांती आणि प्रेम निर्माण करते. हा तुम्हाला लाभलेला आशीर्वाद आहे. तुम्ही श्रद्धाहीन असल्यास ती मिळविण्यासाठी प्रार्थना करावी लागेल; पण प्रार्थना करण्यावरही श्रद्धा हवी, हाचतर विरोधाभास आहे. लोक जगावर श्रद्धा ठेवतात; पण सारे जग साबणाच्या पाण्याचा बुडबुडा आहे. लोकांची स्वतःवर श्रद्धा असते; पण त्यांना हेही ठाऊक नसते की आपण कोण आहोत. लोकांना वाटते, त्यांची देवावर श्रद्धा आहे; पण त्यांना खरे माहीतच नसते की परमेश्वर कोण आहे!

श्रद्धेचे तीन प्रकार
    स्वतःवर श्रद्धा : स्वतःवर श्रद्धा नसल्यामुळे तुम्हाला वाटते की, मी अमुक करू शकत नाही. तमुक माझ्यासाठी नाही. मी या जन्मात कधीच मुक्त होऊ शकणार नाही.
    जगावर श्रद्धा : तुमची जगावर श्रद्धा हवी, नाहीतर तुम्ही तसूभरही हलू शकणार नाही. तुम्ही बँकेत पैसे ठेवता कारण ते परत मिळण्याची श्रद्धा असते. तुम्ही प्रत्येक गोष्टीविषयी शंका घेतलीत तर तुमच्यासाठी काही घडणार नाही.
    ईश्वरावर श्रद्धा : ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि विकसित व्हा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Sri Sri Ravishankar all is well sakal pune today