तुम्ही थकला आहात का? (श्री श्री रविशंकर)

srisri Ravishankar
srisri Ravishankar

इनर इंजिनिअरिंग

प्रत्येक गोष्टीचा थकवा येऊ शकतो. इतरांना आराम देताना, खूष करताना किंवा त्यांना काही पटवून देताना तुम्ही थकून जाता. खरे तर, थकवा ही मजा घेण्याची सावलीच आहे.

आनंद आणि मजा शोधण्याच्या तुमच्या प्रयत्नांत तुम्ही सतत एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे जात असता. तुम्हाला आनंद दिसतो, पण तुम्ही त्याच्यापर्यंत पोचता, तेव्हा तो आणखी पुढे जातो. मग तुम्ही आणखी त्याच्यामागे जाता. हे पुढे जाणे थकविणारे असते. मुलांना खेळण्याचा कंटाळा आला, की त्यांना खेळणेही नकोसे असते. मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजा बदलतात. एकटे असणाऱ्यांना लग्न झालेली माणसे जास्त खूष वाटतात. लग्न झालेल्यांना वाटते, की एकटे असणे जास्त चांगले. हे एका प्रकारच्या थकव्याकडून दुसऱ्या प्रकारच्या थकव्याकडे जाण्यासारखे आहे. जीवनात असेच सगळे थकविणारे सुरू असते. तुम्ही एका आध्यात्मिक मार्गावरून दुसऱ्या आध्यात्मिक मार्गावरसुद्धा जाता. एका साधनेकडून दुसऱ्या साधनेकडे जाता आणि त्याने सुद्धा थकवा येऊ शकतो.

मनोकामना, इच्छा तुम्हाला थकवितात. मनातली हाव तुम्हाला शरीरापेक्षा जास्त थकविते. पंधरा तास काम करायची तुमची इच्छा असल्यास ठीक आहे, पण तुमची इच्छा नसल्यास चार तासांच्या कामानेही तुम्हाला थकवा येईल. तुम्ही काहीही काम न करता नुसते बसून विचार करत राहिल्यास त्यानेही थकायला होते. शारीरिक थकवा हा कामापेक्षा विचाराने जास्त येतो. तुम्हाला हवी असणारी विश्रांती, समाधान आणि प्रेम खूप आराम देणारे, दैवी आणि चिरंतन असते. पण ते कुठे मिळणार? असे एक ठिकाण आहे, जिथे तुम्ही दिव्यत्वासोबत विश्राम करू शकता. आणि ते अगदी परिपूर्ण आणि समर्पणमय आहे. पण तुम्ही पूर्णपणे थकेपर्यंत हे करू शकत नाही.

एखादी गोष्ट टाकून दिल्यावर त्याला समर्पण म्हणतात. आतापर्यंतच्या सर्व सद्‌गुरूंनी म्हटले आहे, की तुम्ही स्वतःहून आपली साधना करा, पण तुम्ही थकल्यावर विश्रांती घ्यायला या. म्हणूनच सर्व सद्‌गुरूंच्या ठिकाणाला आश्रम म्हटले जाते. तुमचा थकवा घालवणारा आश्रम. "आ' म्हणजे शरीर, "श्रम' म्हणजे मेहनत, असा हा आश्रम. आश्रमात शारीरिक आणि मानसिक थकवा निघून जातो. तुम्हाला त्याच्यासाठी झगडावे लागत नाही. फक्त तुमची तार जुळायला हवी. स्वस्थ बसून त्याचे अस्तित्व जाणून घ्या. त्या दैवी अस्तित्वाचाच एक भाग बनून जा. मग तुमच्या लक्षात येईल की जगात काहीच थकवू शकणार नाही. जीवन असेच जगावे, देवाने दिलेय ते मान्य, त्या प्रत्येक क्षणाबरोबर वाऱ्यावर उडणाऱ्या पानाप्रमाणे तरंगत जावे. भूतकाळाबद्दल पश्‍चात्ताप न करता, भविष्याबदल अपेक्षा न बाळगता सुकलेल्या पानासारखे होऊन जावे. हे साध्य केलेल्यालाच ज्ञानप्राप्ती होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com