पाच प्रकारचे प्रश्‍न (श्री श्री रविशंकर)

पाच प्रकारचे प्रश्‍न (श्री श्री रविशंकर)

चेतना तरंग 
पृथ्वीवरच्या प्रत्येक महान शोधाच्या मागील स्फुल्लिंग म्हणजे जिज्ञासा किंवा जाणून घेण्याची मनीषा. ही जिज्ञासा बहिर्मुख असते.  म्हणजे, हे काय आहे, हे कसे झाले, असे विचारले जाते तेव्हा ते विज्ञान असते. तीच अंतर्मुख होते म्हणजे, ‘मी कोण आहे, मी इथे कशासाठी आहे, मला नेमके काय पाहिजे आहे,’ आदी प्रश्‍न निर्माण होतात तेव्हा ते अध्यात्म असते. गेल्या अनेक वर्षांमध्ये मला अनेकविध विषयांवर कोट्यवधी प्रश्न विचारले गेले असतील. तरी प्रत्यक्षात फक्त पाच प्रकारचे प्रश्न असतात. 

शोकाकुल : लोक बहुतेक वेळा शोकाकुल असताना प्रश्न विचारतात. त्यांचे स्वरूप असे असते, की हे माझ्या बाबतीत का घडले? मी असे काय केले म्हणून हे माझ्या वाट्याला आले? कुणी दु:खाने प्रश्न विचारत असलेले दिसले तर फक्त ऐकून घ्या. त्यांना फक्त कुणीतरी ऐकून घ्यायला हवे असते. त्यांना खरे तर उत्तर वगैरे नको असते.  

रागयुक्त : मी बरोबर होतो, मग माझ्यावर का आरोप केला जातोय? असे का होतेय? आदी प्रश्न रागाच्या भरात निर्माण होतात. इथे देखील ते त्यांच्या भावभावनांच्या भोवऱ्यात अडकलेले असतात आणि असे प्रश्न विचारून ते स्वतःचे समर्थन करत असतात. अशा वेळी तुम्ही काहीही उत्तर दिले, तरी ते त्यांना पटत नाही. याउलट त्यातून आणखी प्रश्न आणि समर्थने निर्माण होतात. 

लक्ष वेधून घेणारे : काही लोक प्रश्न विचारतात ते केवळ त्यांचे अस्तित्व इतरांना जाणवून देण्यासाठी. उत्तर मिळवण्यापेक्षा, प्रश्न विचारून इतरांचे लक्ष वेधून घेण्यातच त्यांना समाधान असते.

परीक्षा घेणारे : काही जण समोरच्याला खरेच माहिती आहे की नाही, याची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न विचारतात. त्यांना उत्तर मनोमन आधीच माहीत असते. त्यांच्या उत्तराशी ते त्यांना ताडून पाहायचे असते. 

मनापासून विचारणारे : मनापासून काहीतरी जाणून घ्यायचे असते, अशाच लोकांकडून अशा प्रकारचे प्रश्‍न विचारले जातात. त्यांचा मिळणाऱ्या उत्तरावर विश्‍वास असतो. फक्त अशा प्रकारच्या प्रश्नांनाच उत्तरे द्यावीत. 
बहुतेक सर्व पौराणिक ग्रंथांची सुरवात प्रश्नाने होते. हे प्रश्न केवळ उत्सुकता म्हणून विचारले गेलेले नाहीत, तर अतिशय जवळकीच्या भावनेतून विचारले  गेलेले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com