आनंद, दुःख, तुम्हीच निवडता...

आनंद, दुःख, तुम्हीच निवडता...

चेतना तरंग
संस्कृतमध्ये एक सुंदर म्हण आहे, ‘तुम्हाला आनंद किंवा दुःख कुणीही देऊ शकत नाही. दोन्हींची निर्मिती तुमच्याच मनाकडून होत असते.’ त्यामुळे येथे कोणीही दाता नाही. तुम्ही इतरांकडून दुःख घेता आणि त्यांनाच विचारता, ‘तुम्ही असे का वागला? माझा अपमान का केला?’ खरंतर हे निरर्थक आहे. त्यांनी तुमचा अपमान केला असल्यास त्यांच्या मेंदूत काहीतरी चुकीचे आहे. त्यामुळे, तर तुम्हाला त्यांची दयाच वाटायला हवी. ‘ओह...या व्यक्तीने माझा अपमान केला. तो योगी नाही. त्याच्यामध्ये जाणिवेची शुद्ध पातळी नाही,’ असे तुम्ही समजा. एखादी गिटार चांगल्या पद्धतीने वाजत नसल्यास तिच्या ताराच बरोबर नाहीत, असे नव्हे. त्या तारांमध्ये योग्य समतोल साधण्याची गरज असते. त्यामुळेच तुम्हाला तुमचा अपमान करून घ्यायचा नसल्यास तो कोणीही करू शकत नाही. तुम्ही तुमचे जीवन वरील प्रकारच्या भावनांवर आधारित ठेवल्यास त्याचा नाश होईल, कारण भावना स्थिर नसतात.

एखाद्या दिवशी तुम्हाला चांगले वाटेल तर दुसऱ्या दिवशी तसे वाटणार नाही. मग केवळ तुम्हालाच या क्षणिक भावनांचा त्रास होईल असे नव्हे, तर इतरांनाही तो होईल. मन नेहमी इकडेतिकडे भटकत असते. तुम्हाला बौद्धिक सजगता वापरून त्याला जागेवर आणायला हवे आणि स्वतःमध्ये त्याला स्थिर करायला हवे. त्यामुळेच निसर्गाने मन शांत करणे इतके अवघड केले आहे. ते मोठेच आव्हान आहे. योगशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही अंतर्गत आनंद मिळवू शकता. त्याचे कोणावरही ओझे नसेल. अध्यात्माच्या मार्गावरील पहिली गोष्ट म्हणजे, स्वतःला आणि इतरांना दोष देणे थांबवून एकमेकांचे कौतुक करणे होय. भगवान कृष्णाने अर्जुनाला म्हटले होते, ‘‘तू खूपच चांगला आहेस. तुझ्यामध्ये आधीपासूनच सर्व चांगले गुण आहेत. मी केवळ ते पुन्हा जागृत करीत आहे, त्यामुळे काळजी करू नको.’’ कृष्णाने अर्जुनाला कधीही मूर्ख, निरुपयोगी, रडका असे म्हटले नाही. एखाद्याची प्रगती घडविण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला चांगुलपणाचे बीज विकसित करावेच लागते. सशक्त मनाला प्रगतीमध्ये रस असतो. एखादा चांगला शिक्षक विद्यार्थ्याला ‘तू चांगला नाहीस,’ असे कधीच म्हणत नाही. तो विद्यार्थ्याला मित्राप्रमाणे वागवतो. मात्र, एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याला सतत मारहाण केली तर काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे विद्यार्थी जणू मृतच होतात. त्यांच्यामधील स्वआदर नष्ट होतो. तुम्ही स्वआदर आणि स्वत:ची किंमत गमावल्यास आध्यात्मिक मार्गावर कधीही प्रगती करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही इंद्रियांवर सक्ती करू नका. त्यांना हळुवारपणे ध्यानधारणेकडे वळवा. तुम्ही विचलित असाल, त्या प्रत्येक वेळी आयुष्यातील सर्व घटक काही मार्गाने योगदान देतात आणि हळुवारपणे तुमच्या मनाला ‘स्व’कडे वळवतात. हे एखाद्या इशाऱ्याप्रमाणे असते. बुद्धिमान व्यक्तीला मूर्खपणा सर्वांत असह्य होतो. त्यामुळेच तो सहन करण्यातून सहनशक्तीचा कस लागतो. त्यातूनच तुमचे मोठेपण दिसते. कधीकधी मूर्खांच्या चुकांमधूनही काहीतरी चांगले घडते. त्यामुळे, मूर्ख व्यक्तीही तुम्हाला अधिक शहाण्या, संयमी बनवू शकतात! 

श्री श्री रविशंकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com