थॉट ऑफ द वीक : एकटेपणाची भीती

Loneliness
Loneliness

लहानपणीचे फोटो पाहत असताना रियाच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. त्यातील नववीतील एक ग्रुप फोटो आला. त्यामध्ये ती एका कोपऱ्यात उभी होती. विशेष हसतही नव्हती. रिया एकदम गंभीर झाली, कारण तिला त्यावेळची तिची अवस्था आठवली. त्या घटनेनंतर तिचा ‘मैत्री’ या विषयावरचा विश्वास उडाला व तो अविश्वास बरीच वर्षे तिला त्रास देत होता. घडले असे होते की, रिया खूप अभ्यासू व प्रामाणिक होती. रियाने खूप मैत्रिणी जमवल्या, मात्र काही कारणाने त्या लांब जात. कारण विचारता, तिला कायम ‘तू अभ्यास करतेस, आमच्या बरोबर खेळत नाहीस, सहलीला येत नाहीस,’ अशा तक्रारी मैत्रिणी करायच्या. त्यामुळे तिला सतत एकटेपण यायचे. एक दिवस शाळेत ग्रुप फोटो काढायचे ठरले, ती मैत्रिणीसोबत उभी राहताच इतर मैत्रिणींनी सांगितले, ‘तुझ्या हुशारीमुळे आम्हाला आमचे पालक बोलतात व तुलना करतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आम्हाला नको तुझी मैत्री.’ कोणीही तिच्यासोबत फोटोमध्ये उभे राहिले नाही. आपली हुशारी, प्रामाणिकपणा व खरेपणा हे आपले मैत्रीमध्ये येणारे शत्रूच आहेत, असे तिला वाटू लागले. पूर्ण नववी व दहावी रिया एकटी पडली. याचा परिणाम तिच्या मार्कांवरही झाला. नंतर कॉलेजमध्ये नवीन मैत्रिणी जमल्या, मात्र सतत एक भीती होती, ‘मी एकटी पडले तर?’ त्यामुळे रियाने ठरविले, काहीही झाले तरी मैत्री कायम ठेवायची. परिणामी, एकटे पडण्याच्या भीतीने रिया इतर मैत्रिणी सांगतील तसे वागू लागली, त्या सांगतील तो छंद जोपासला, इच्छा नसूनही. हीच भीती काही वर्षांनी कार्यक्षेत्रात अनुभवायला मिळाली. ऑफिसमधील लोकांमध्ये आपण स्विकारले जावे, एकटे पडू नये म्हणून अनेक मनाविरुद्ध निर्णय घेतले. आज तो नववीतील फोटो पाहून रियाने पूर्ण भूतकाळ परत जगला. आजही रिया एकटेपणाच्या भीतीमध्ये जगत आहे. सर्व कळत आहे पण वळत नाही!

रियासारखे अनेकजण या भीतीमध्ये जगतात. ‘लोक काय म्हणतील’, ‘आपल्याबद्दल काय विचार करतील’ ‘आपण एकटे पडणार नाही ना’ याच विचाराने इतरांचे अंधानुकरण करतात. ‘आपल्या भोवतालच्या जगात आपला स्वीकार व्हावा,’ ही गरज एकटेपणाची भीती निर्माण करते. अगदी लहानमुलेही या भीतीने अनेक निर्णय घेताना दिसतात. उदा. सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचा दबाव, विशिष्ट ब्रँडचे कपडे किंवा फोन नसल्याचा दबाव हीच भीती निर्माण करीत आहे.

ही भीती कशी हाताळावी ते पाहुयात... 
एकटेपणाची नवी व्याख्या शोधुयात...

आपल्याला हव्या त्या लोकांमध्ये आपण स्विकारले जात नाही म्हणून आपण आलेल्या परिस्थितीला ‘एकटेपण’ हे नाव देतो. याची परिभाषा बदलावी लागेल. ज्याला आपण ‘एकटेपण’ म्हणतो तो ‘स्वजागरुकतेचा मार्ग’ असू शकतो. स्वतःला ओळखण्याची संधी असू शकते. आपल्यासारखे अनेक लोक एकटे असूनही आनंदी असतात हा विचार आपल्याला प्रेरणा देतो.

स्वतःला ओळखा
स्वीकारले जावे म्हणून मनाविरुद्ध वागण्यापेक्षा स्वतःला ओळखणे गरजेचे आहे. प्रत्येकाचे आयुष्य, प्रवास व मानसिक गरजा वेगवेगळ्या आहेत. आपल्याही त्या वेगळ्या आहेत यामुळे, माणसे निवडताना आपले वेगळेपण स्विकारणारी माणसे निवडा.

मनाविरुद्ध वागण्याची किंमत
एकटेपणाच्या भीतीमुळे घेतलेले निर्णय तात्पुरते एकटेपण दूर करतात. मात्र त्याची दीर्घ काळात मोठी किंमत मोजावी लागते. ती म्हणजे ‘स्वतःला ओळखायची व स्वीकारायची.’ त्यामुळे भीतीच्या तुलनेत ही किंमत आपण मोजायला तयार आहोत का, याचा अवश्य विचार करावा.

भविष्याचा अतिविचार टाळा
‘उद्या किंवा भविष्यात आपण एकटे पडू’ या विचाराने मन अधिक भीती निर्माण करते. त्यापेक्षा आज तुमच्या सोबत जे लोक तुम्हाला, तुमच्या वेगळेपणासहित स्वीकारत आहेत त्यांच्यासोबत परिपूर्ण जीवन जगा व वर्तमानकाळाचा सन्मान करा. लक्षात ठेवा, एकटेपणाची भीती एकट्यानेच काढायची असते. जेवढे जाणीवपूर्वक वर्तमानात जगाल, तेवढे एकटेपणाच्या भीतीला पळवून लावाल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com