थॉट ऑफ द वीक : चक्रव्यूह तुलनेचा

Thought-of-the-week
Thought-of-the-week

गेल्या आठवड्यातल्या लेखामध्ये आपण अपेक्षापूर्तीच्या संघर्षाबद्दल अधिक माहिती घेतली. अपेक्षांचे अनेक उगम आहेत. पहिला उगम आहे ‘तुलना.’ ‘लोकांकडे जे आहे ते आपल्यापेक्षा चांगलेच आहे व ते मलाही हवे’, ‘मी आधीसारखी का नाही राहिले?’, ‘मला याच व्यक्तीएवढे यश का नाही मिळत?’ अशा अनेक अपेक्षा घेऊन आपण जगत असतो. ध्येय आत्मबळ वाढवते; पण तुलना अपेक्षा वाढवते. तुलना आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे. तुलना केल्यामुळे अपेक्षा वाढतात व त्यातूनच संघर्ष निर्माण होतो. ही तुलना लहानांपासून मोठ्यापर्यंत पाहायला मिळते. सोशल मीडियामुळे अनेक मुले तुलनेच्या सापळ्यामध्ये अडकताना दिसत आहेत.

इन्स्टाग्राम, फेसबुक इत्यादी माध्यमांवर तुम्हाला कोणासारखे व किती ‘लाईक्स’ मिळायला हवेत ही अपेक्षा कोणाच्यातरी तुलनेतूनच येते. बऱ्याचदा मोठ्यांनी लहानांची तुलना केल्यामुळे लहानपणापासूनच एक संघर्ष चालू होतो. अशा तुलनांमुळे आयुष्यावर होणारे परिणाम पाहू.  

असमाधान  
‘दुसऱ्याचं ते चांगलं’ ही भावना कायम मनाशी बाळगल्यामुळे एक ‘असमाधानी वृत्ती’ निर्माण होते. जे आयुष्यात करायला जमलं/मिळाले नाही, त्यावर दीर्घकाळ विचार केल्याने चांगल्यावर लक्ष केंद्रित करता येत नाही, परिणामी सतत तक्रारी स्वभाव बनतो व त्यामुळे आत्मबळ व वर्तमान चांगला करण्याची मानसिकता व इच्छा नष्ट होते. हेच असमाधान संघर्ष निर्माण करते. आजकाल वयाने लहान व मोठेसुद्धा एकमेकांबरोबर तुलना करताना दिसतात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुलना व आदर्श यांत गफलत
कुणा व्यक्तीचा किंवा ध्येयाचा आदर्श असणे कायमच प्रेरणा देते; पण त्याबरोबर तुलना करून आपण गफलत करतो. आदर्श ठेवणे व त्यानुसार स्वतःवर काम करणे प्रगतीच्या दिशेने नेते; पण तुलना केली, की आपणच आपली क्षमता कमकुवत करतो. कारण यशाच्या व्याख्येचे, मार्गाचे, विचारांचे नकळत अंधानुकरणच होते. तुलना करून आदर्श बनवला, तर तो अपेक्षापूर्तीचा संघर्ष देतो सोबत निराशाही निर्माण करतो.

ईर्षा
एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा एक भाग पाहणे आणि त्याची तुलना करणे व्यर्थ आहे. तुलना ईर्षा निर्माण करते व स्वतःचेच नुकसान करते. तसेच आपल्यात किती गुण आहेत व ते आपण कसे सत्कारणी लावू शकतो याचा विसर पडतो. तुलनेतून आलेली ईर्षा आपल्यातील वेगळेपण हिरावून घेते. थोड्या प्रमाणात आलेली ईर्षा प्रगतीसाठी उपयुक्तही ठरते; पण अधिक प्रमाणात तुलना व ईर्षा तुमच्यातील चांगल्या गुणांचा तर नाश करतेच; पण प्रगतीही थांबवते.

अवास्तव अपेक्षांचा भ्रम
आपण जितकी जास्त तुलना करतो, तितके आपण स्वजागरूकतेपासून दूर राहतो. सारासार विचार न करता स्वतःकडून व इतरांकडून अवास्तव अपेक्षा बाळगत राहतो व काही प्रमाणात त्या पूर्ण करण्याचा भ्रमही बाळगतो. हाच भ्रम तुम्हाला तुमच्यापासून दूर ठेवतो व त्यामुळे आयुष्याचे वास्तव रूप दिसत नाही. बऱ्याचदा हा भ्रम इतरांना कमी लेखायला भाग पाडतो- कारण आपण अवास्तव अपेक्षांची परिभाषा बनवितो व तीच सर्वानी पूर्ण करावी हा अट्टाहासदेखील नकळत बाळगतो.

स्वतःला सिद्ध करायची धडपड
एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून (खासगी व व्यावसायिक आयुष्यतील) दुसऱ्याचे कौतुक झाले, तर ‘माझे कौतुक का होत नाही?’ हा संघर्ष निर्माण होतो. त्या व्यक्तीला अवास्तव महत्त्व दिल्याने त्याच्यासमोर आपली क्षमता सिद्ध करायची धडपड चालू होते. ती इतकी होते, की आपण इतर गोष्टींमध्ये चांगले असू शकतो याचा विसर पडतो. आपण आपल्या आत्मविश्वासाची किल्ली त्या व्यक्तीच्या हातात देतो. स्वतःवरील अविश्वास तुम्हाला तुलना करायला भाग पाडतो.

या सर्व परिणामांचा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल, की तुलना किती घातक आहे. आगामी लेखात आपण यावरचे उपाय पाहू! लक्षात ठेवा, ‘तुलना’ आपल्यातील अद्वितीय गुणांचा नाश करते. आता वेळ आहे  स्वतःला आनंदाने स्वीकारण्याची व आपल्यातील चांगले गुण सत्कारणी लावायची.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com