भावशा (ऐश्वर्य पाटेकर)

Aishwary-Patekar
Aishwary-Patekar

भावशा बोलायला जरी वाचाळ असला तरी मनानं तो निर्मळ होता. काचेगत निर्मळ काळजाचा. मनात एक अन् बाहेर एक असा त्याचा स्वभावच नव्हता. अपंग असल्यामुळे त्याचा एक पाय वाकडा होता; पण तो कधी चुकीच्या रस्त्याला घसरला नाही, म्हणूनच त्याच्या बोलण्याचं कुणी वाईट वाटून घेत नसे अन् मनालाही लावून घेत नसे.

पाटेगावातल्या हौसाबाई भर्तार शंकर चव्हाण या दांपत्याचा मुलगा ‘भाऊसाहेब शंकर चव्हाण’ एवढीच सात-बाऱ्यापुरती ओळख घेऊन ‘भावशा’ पैदा झाला नव्हता. तो अपंग होता. मात्र, अपंग असण्याची सहानुभूतीही त्यानं कधी कुणाकडून मिळवली नाही. त्याच्या व्यंग्याविषयी त्याला कुणी तोंडावर कधी काही म्हणायची हिंमत केली नाही. त्याचा मानमतराब त्याला कुणाच्या मेहरबानीनं प्राप्त झालेला नव्हता. तो त्यानं त्याच्या हिमतीवर मिळवला होता. त्या भावशाची ही गोष्ट...
भावशा एका पायानं अपंग असला तरी त्याच्या त्या पायालाच भिंगरी बसवलेली आहे की काय असं वाटायचं. सतत हिंडत-फिरत असायचा भावशा. त्याच्याकडे पोतडी भरभरून अनुभव. पोतडी हा शब्दही कमीच ठरावा!

एकाच जन्मात किती तरी जन्म घेऊन तो जगत होता जणू काही! हा देश, तो देश हिंडून येणाऱ्या माणसाला त्याच्या शेजारचा माणूसही ओळखत नाही. मात्र, अपंग भावशाचा पत्ता आमच्या गावाबरोबरच शेजारच्या दोन-चार गावांनाही ठाऊक होता. कुणालाही पत्ता विचारला तरी तो संबंधित माणूस पत्ता विचारणाऱ्याला भावशाच्या घरापुढं नेमका आणून उभा करणार!

भावशानं मुंबईला जाऊन ‘गेट वे ऑफ इंडिया’ पाहिलं होतं, म्हणजे त्याच्याआधीही कितीतरी जणांनी ते पाहिलं असावंच; पण आम्हाला त्याविषयी कुणी काही सांगितलं नव्हतं. सांगितलं ते एकदम भावशानंच. त्यामुळे ‘गेट वे ऑफ इंडिया’ पाहणारी पहिली व्यक्ती आमच्या दृष्टीनं भावशा हीच! 
‘पोराय हो, तुमी गेट वे इंडिया पाह्यलाया का?’
‘न्हाई बा.’
‘मंग तुमचं आयुक्ष फेल गेलं.’
‘आसं काये त्येच्यात?’
‘आरं, खेड्यातले येडे ते येडेच राह्यल्ये गड्या तुमी.’
‘काय त्ये?’
‘आरं, भारताचं प्रवेशदारंय त्ये.’
‘ऐ बाबो, म्हंजी आपल्या देशाचं दार? घरावानी दार?’ नित्या तोंडावर हात ठेवत म्हणाला.
‘ कुनाचंय रं ह्ये गबरू!’ नित्याकडं तुच्छतेनं पाहत भावशानं विचारलं.
संतूनं नित्याचं पूर्ण नाव सांगितलं. 
‘तुमी तं म्हनले की दारंय त्ये. दारं त घरालाच आस्तंय ना, म्हून म्हन्लो म्या तसं. माहं
काय चुकलं का?’ नित्यानं गोरंमोरं होत विचारलं. 
‘तुहं न्हाई चुकलं बाबा. तुह कसं चुकंन? आमचंच चुकलं की रं!’
भावशाच्या या तिरकस वाक्यावर पोरं नित्याला फिदीफिदी हसली. 
मग पोरांना गप्प करत भावशा म्हणाला : ‘आरं, देशाचं दार हाय त्ये!’
‘केवढंय त्ये?’
‘अबब! नाव कहाढू नगा! भयान मोठंय!’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर किती तरी दिवस आम्ही पोरं त्या दाराची कडी केवढी मोठी असेल, त्याचं कुलूप केवढं असेल अन् किल्ली कशी असेल असे अंदाज बांधत राहिलो. भावशाच्या पोतडीतून दर दिवशी नवं काहीतरी आमच्यासमोर भसकन् यायचं अन् आम्ही विलक्षण चकित होऊन जायचो. भावशाच्या पोतडीत अनंत गोष्टी असायच्या. कधी कधी तो आमच्या डोक्यात भुंगाही सोडून द्यायचा. एखादं कोडंच म्हणा ना! ते सुटता सुटायचं नाही. त्या काळात ना धड रस्ते होते, ना जग आजच्याइतकं जोडलं गेलेलं होतं. तरी भावशा एवढ्या वेगानं कसा काय फिरला असावा? एक ना अनेक उद्योग त्यानं केले. गावात मात्र मला तो कधी काम करताना दिसला नाही. हेही खरं की त्यानं पैशासाठी कुणापुढं हातही पसरला नाही. भाकरीची तजवीज तो कशी करायचा हा यक्षप्रश्न मला अजूनही सुटला नाही. इतर माणसं भाकरीच्या ओढीनं वणवण भटकूनही त्यांची भळभळ सुटत नाही!

आग्र्याला गेला अन् ताजमहाल पाहून आला हे मात्र भावशानं कधी कुणाला सांगितलं नाही. आम्ही खोदून खोदून विचारलं तरी त्यानं त्याविषयी काहीच सांगितलं नाही. त्यानं खूळ घेतलं होतं ताजमहालाचं. 
‘मीही गावात ताजमहाल बांधणार,’ असं त्यानं आग्र्याहून आल्या आल्या जाहीरच करून टाकलं! ताजमहाल नेमका कसा आहे याची आम्हाला महामूर उत्सुकता लागली होती. या पोरांना ताजमहालाचं वर्णन ऐकवण्यापेक्षा प्रत्यक्ष बांधूनच दाखवू या कसा आहे ते, असं भावशानं ठरवलं असावं असं आम्हाला वाटलं.
लोक नंतर तर हसायचेही त्याला.
‘काय रं भाऊसाहेब, ताजमहालाचं काम कुडलोक आलं?’
‘पाया खोदालाया, व्हईलच आता काम सुरू!’ भावशाही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता.
‘लवकरच कर गड्या, म्हंजी माहं डोळं धड हायेत तवरूक तरी मला पाह्यला भेटंन,’ विचारणाराही त्याला विनवत असल्याचा आव आणायचा!
‘तसं तू तुह्या लग्नाच्या दिशीच डोळं मिटून घ्याया पाह्यजे व्हते रं, तुह्या ‘मुमताज’ला बघून!’
‘म्हंजी रं?’’ विचारणारा आणखीच गोंधळून जायचा...

भावशा असा बोलायला कुणाला न आवरणारा होता. कधी असं काही खवचट बोलायचा की समोरच्याच्या नाकातले केसच जळून जावेत. तसा तो दादा कोंडकेंचा जबरी फॅन! म्हणजे त्या काळात आम्हाला असंही वाटायचं की दादा कोंडके या भावशासाठीच सिनेमे काढतात की काय! दादा कोंडकेंची भाषाशैली भावशानं आत्मसात केली होती अगदी. गल्लीतून एखादं वयस्क जोडपं जात असेल तर हा विचारणार :
‘काय वैनी, हनीमूनला निंगाल्या काय?’
‘काय बोलताय भावजी काहीच्या बाही!’
‘यात काय काहीच्या बाही? काय रं केदूभाऊ? पाह्य काय म्हनती वैनी?’
‘तू आन् तुही वैनी! मला नगा मधी वढू...’’ केदूभाऊ विषय झटकायचा. 
भावशा असा बोलायला जरी वाचाळ असला तरी मनानं तो निर्मळ होता. काचेगत निर्मळ काळजाचा. मनात एक अन् बाहेर एक असा त्याचा स्वभावच नव्हता. अपंग असल्यामुळे त्याचा एक पाय वाकडा होता; पण तो कधी चुकीच्या रस्त्याला घसरला नाही, म्हणूनच त्याच्या बोलण्याचं कुणी वाईट वाटून घेत नसे अन् मनालाही लावून घेत नसे. 

मधल्या काळात तो पिवर खंडेरावाचा गोंधळी झाला अन् त्यानं खंजिरी हातात घेतली. त्याचं लग्नही झालं होतं; पण बायको सतत आजारी असायची. तिची साथ त्याला कितीशी लाभणार? तरी तो कधी दु:खी दिसला नाही. त्याचा गमत्या स्वभाव जराही कमी झाला नाही. उलट, असं वाटायचं की याला सुखी माणसाचा सदरा गवसला असावा की काय. तो जर का एवढं फिरून आला होता तर तो सदराही त्याला कुठं ना कुठं मिळालाच असावा असं आम्हाला वाटायचं. तो चिंतेत कधीच दिसला नाही. एक मुलगी मागं ठेवून त्याची बायको तरुणपणातच वारली, तरी त्यानं दुसरं लग्न नाही. तो खंजिरी अतिशय मन लावून वाजवायचा. खंडेरावानं त्याची केलेली निवड सार्थ ठरवायचा. बाकीचे गोंधळी जेव्हा खंजिरी वाजवायचे तेव्हा असं वाटायचं की खंजिरी वाजवावी ती आपल्या भावशानंच. माझ्या कथा-कविता तो वाचायचा. त्याला अप्रूप होतं माझ्या लिहिण्याचं! माझ्या लिहिण्यात तसंही गावाचं प्रतिबिंब होतंच.
एक दिवस भावशा मला म्हणाला :‘‘सोयरे, माझ्यावर लिव्हा यखांदा लेख!’’
‘तुमच्यावर लिहायचं तं फटके बसतील नं बाबा!’
‘काम्हून मी फटके दिईन?’
‘म्या लिहीन तं त्यात तुमच्या अपंग असण्यावरच लिहीन नं!’
‘हायेच मी अपंग. हायेच मी लंगडा. त्यात काय? आन् सोयरे, इथं कोन लंगडं न्हाई? सारं जगच कशाच्या ना कशाच्या अभावी लंगडंच हाये! कुनी मानुसकीशिवाय लंगडं, कुनी नात्यागोत्याशिवाय लंगडं! सोयरे, पैशाच्या मोहानं जग लंगडं झालंय. आई नगं, बाप नगं, भाऊ नगं, बहीन नगं, फकस्त पैका पाह्यजेल. मग व्हनार न्हाई का जग लंगडं?’

असं असलं तरीही या माणसावर माझं लिहिणं टळतच राहिलं. एका पायानं लंगडा असलेला हा माणूस या पांगळ्या जगात खरोखरच धडधाकट होता!
माझी थोरली बहीण माई  हिचा नवरा दारू पिऊन तिचा अतोनात छळ करायचा. मध्ये जो कुणी कैवार घ्यायला जाईल त्याचाही बेत तो पाहायचा. त्यामुळे त्याच्या वाट्याला कुणी जात नसे. एक दिवस असाच तो दारू पिऊन आला. माईला मारू लागला. मी तेव्हा असेन बारा-तेरा वर्षांचा. मी गेलो मध्ये तर त्यानं त्याच्या राक्षसी पंजात माझा गळाच धरला. माई मध्ये पडू लागली तर त्यानं तिचाही गळा धरला. आसपासच्या घरांचे दरवाजे बंद झाले. मदतीला बोलवायचं तरी कुणाला? असतंही समजा कुणी, तरी आमच्या नरड्यातून आवाज तरी कसा निघावा? तेवढ्यात भावशा आला. माईच्या नवऱ्याचे पाय त्यानं ओढले. त्यासरशी तिचा नवरा जमिनीवर पडला. त्यामुळे तर तो आणखीच रस्ताळला. तो उठला. भावशाची न् त्याची गुद्दागुद्दी झाली अन् तो त्याला रागानं म्हणाला : ‘‘तू हिचा कैवार घेनारा कोन?’’
‘तू कोन हायेस?’
‘म्या नवराय तिचा!’
‘मंग ध्यानावं ऱ्हा! का बिथरल्यावानी करून ऱ्हायला?’
‘तू कोन मला सांगनारा? माझी बायकूय ती. म्या काही बी करीन!’
‘आरं वा...तुही बायकू हाय ह्ये बराबर; पर गावाची लेक बी हाय ती. तिच्या अंगावं हात टाकशीन तं तोडून टाकीन खांद्यापून! तू दम, आता म्या पोलीस ठेसनातच फोन करीतो. तुही चागली मोट बांधून घिऊन जायाला सांगतो,’’ असा दम भरून भावशा निघाला.

माईच्या नवऱ्याला वाटलं, भावशा खरंच फोन करायला चाललाय; पण तेव्हा कुठं एवढे फोन होते! भावशाची ही मात्रा माईच्या नवऱ्याला त्या दिवशी तरी लागू पडली असावी. त्याला घाम फुटला अन् अर्वाच्य शिव्या बडबडत त्यानं गावातून काढता पाय घेतला. त्या दिवसानंतर माईच्या नवऱ्यानं तिला पुन्हा त्रास दिला नाही असं नाही. मात्र, तो दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा ठरला. त्या दिवशी लंगडा भावशा नसता तर आमचं पाय असलेलं जगही जागच्या जागी राहून गेलं असतं! भावशाची वडिलोपार्जित शेती किती होती हे त्यालाही ठाऊक होत की नाही कोण जाणे. तशीही त्या काळी ती शेती कोरडवाहू. तीत पिकत कुठं काय होतं? थोडक्यात सांगायचं तर, त्याला शेतीभातीचा लळा असल्याचं माझ्या तरी नजरेत आलं नाही. मात्र, त्याच्या मनाच्या मशागतीची, माणुसकीची शेती जोरदार होती. एकरभर वावरात विक्रमी पीक घेणाऱ्या शेतकऱ्याची नोंद आपण घेतो, मात्र खाकसाच्या दाण्याएवढ्या मनात आभाळभर जिव्हाळ्याचं पीक घेणाऱ्या या माणसाची नोंद कशी घेतली जाणार?

जग फिरून येऊनही काही लोकांमध्ये कवडीचाही बदल होत नाही हे आपण पाहतो; पण आमचा अपंग भावशा तर एक नव्हे, दोन नव्हे, जगाच्या साऱ्याच पायऱ्या मोजून आलाय...! अन् त्याची खंजिरीही जेजुरीगड चढून आलीय...!

(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com