‘युद्धाच्या छाये’तील निसर्गसौदर्य (जयप्रकाश प्रधान )

Jayprakash-Pradhan
Jayprakash-Pradhan

केवळ रस्त्यावरील वाहतुकीद्वारे आर्तसाखचा जगाशी संपर्क राहतो. आम्ही सीमा ओलांडली आणि डोंगरांच्या कुशीत दडलेल्या नागोर्नो काराबाखच्या हिरव्यागार सौंदर्याने एकदम मोहून टाकले. हा वळणावळणाचा रस्ता संपूच नये असे वाटते. आम्ही ऑक्टोबर महिन्याच्या मध्यास तेथे होतो. तेव्हा झाडांचे बदलते रंग कमालीचे मोहक वाटत होते. आर्तसाखचा एक तृतीयांश भाग घनदाट जंगलांनी व्यापला आहे. तेथे प्रामुख्याने ओक, बीच व विविध फळझाडे आढळून येतात...

अर्मेनिया व अझरबैजान या दोन राष्ट्रांच्या दरम्यान ज्या नागोर्नो काराबाख किंवा आर्तसाख या छोट्या, स्वयंघोषित प्रजासत्ताक राष्ट्रावरून सध्या घनघोर युद्ध सुरु आहे, त्या सर्व प्रदेशांत बरोबर वर्षांपूर्वी, ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१९ मध्ये मी व पत्नी जयंती मनसोक्त भटकंती करीत होतो. आणि संघर्षाचे मुख्य केन्द्र असलेल्या राजधानीच्या ''स्टेपनकर्ट '' या चिमुकल्या शहरात चांगला दोन दिवसांचा मुक्कामही केला. तेथील युद्धाच्या, भयंकर बॉम्ब हल्ल्यांच्या, रशियाच्या मध्यस्थीच्या, तह कराराच्या वगैरे बातम्या सध्या वाचताना आणि विविध चॅनेल्सवर त्याची छायाचित्रे पाहताना, हिरव्यागार झाडींत, डोंगरांच्या कुशीत लपलेल्या व निसर्ग सौंदर्याने अक्षरश नटलेल्या पण दुर्दैवी अशा ''नागोर्नो काराबाख '' च्या  आमच्या भेटीच्या आठवणी जागृत न झाल्या तरच नवल !

सुमारे बारा - पंधरा हजार चौरस किलोमीटर क्ष्रेत्रफळाच्या या आर्तसाख प्रदेशावरून, युरोप व आशिया खंडांच्या सीमांवर असलेल्या अर्मेनिया व अझरबैजान या दोन देशांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून मोठा संघर्ष सुरु आहे. अर्मेनिया हे ख्रिश्चन तर अझरबैजान हे मुस्लीम राष्ट्र. या दोन देशांमधील आर्तसाखचा वाद एकदम उफाळून येतो व त्याचे रूपांतर हिंसक,लष्करी कारवायांमध्ये होते. अर्मेनिया व  अझरबैजान हे दोन्ही देश पूर्वीच्या सोव्हिएत रशियाच्या अंमलाखाली होते. पण १९९१ मध्ये सोव्हिएत युनियनचे साम्राज्य कोसळल्यानंतर अन्य राष्ट्रांप्रमाणे हे दोन देशही स्वतंत्र झाले. त्यावेळी नागोर्नो काराबाख प्रदेशावर अर्मेनिया व अझरबैजान या दोन्ही राष्ट्रांतर्फे दावा करण्यात आला. तेथे अर्मेनिअन लोकांची वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. पण अगदी पूर्वीपासून तो अझरबैजानचाच भाग असल्याचे या देशाकडून सांगण्यात येते. या प्रश्नात कोण बरोबर व कोण चूक याचे उत्तर तुम्ही तो प्रश्न कोणत्या देशाच्या नागरिकाला विचारत आहात, त्यानुसार मिळते. अझरबैजानच्या मुक्कामात काही स्थानिक ज्येष्ठ नागरिकांशी बोलण्याची संधी मिळाली. ''नागोर्नो काराबाख '' हा अझरबैजानचाच भाग असल्याचा इतिहास असून, अर्मेनिअन सैन्याने आमच्यावर कसे अनन्वित अत्याचार केले, याची टेपच त्या सर्वांनी लावली. तर अझरबैजान सातत्याने हिंसक, दहशतवादी कारवाया करून तो प्रदेश बळकावण्याचा प्रयत्न करीत असल्याची अर्मेनियाची तक्रार राहते. दुर्दैवाने या अत्यंत निसर्गरम्य, कमालीच्या सुंदर प्रदेशाची, तेथील नागरिकांची या संघर्षात अत्यंत हानी होत असून, त्याचा शेवट कधी व कसा होणार याचे उत्तर आजतरी सापडत नाही. एक पर्यटक म्हणून याचे कमालीचे वाईट वाटते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशा या म्हटले तर स्वतंत्र पण अर्मेनियाच्या पंखाखाली सर्वार्थाने असलेल्या चिमुकल्या राष्ट्राला प्रत्यक्ष भेट देण्याचा योग अर्मेनियाच्या दौऱ्यात आला. अर्थात तेथे हिंसक कारवाया अचानक सुरू होतात. त्यामुळे थोडी भीतीही वाटत होती. पण आर्मेनियन स्थानिक कंपनीची एक छोटी सहल घेतली. त्यात आमच्याखेरीज तीन - चार, रशियात स्थायिक झालेले आर्मेनियन स्त्री पुरुषही होते. लोकल गाइडही चांगला अभ्यासू होता. भारतातून अर्मेनियात गेलेले फारसे कोणी त्या भागात जात नाहीत. पण ऑफबीट ठिकाणे पाहण्याची आम्हाला आवड असल्याने आर्तसाख भागांत चांगली दोन दिवसांची भटकंती केली.

नागोर्नो म्हणजे डोंगर. हा सारा परिसर डोंगराळ आहे. म्हणूनच त्याला ''माउंटन काराबाख'' असेही म्हणतात. हिरव्यागार डोंगरांत दडलेली निसर्ग संपत्ती असेही त्याचे वर्णन केले जाते. सुरुवातीला ''आर्तसाख प्रदेशात तुमचे स्वागत'' असा बोर्ड दिसला. तेथूनच या स्वतंत्र राष्ट्राची सीमा सुरू होते. येथून दोन-तीन किलोमीटर अंतरावर, आर्तसाखचा व्हिसा घेण्यासाठी आमची गाडी थांबली. आमचा व्हिसा आधीच घेऊन ठेवण्यात आला होता. पण पासपोर्ट व व्हिसाचा कागद दाखविण्यासाठी खाली उतरावे लागले. दोन - तीन अधिकारी तेथे बसले होते. पासपोर्ट व व्हिसा कागद त्यांना दाखविला. भारतातून कोणीतरी आपला देश बघायला आले आहे, याचे त्यांना खूपच आश्चर्य वाटले. त्याने त्या कागदावर स्टॅम्प मारून कागद काढून ठेवला. आमच्या पासपोर्टवर मात्र कोणतेही स्टॅम्पिंग करण्यात आले नाही. आर्मेनियन नागरिकांना आर्तसाखमध्ये प्रवेश करण्यासाठी केवळ ओळखपत्र दाखवावे  लागते. रशियन्सना वेगळा फॉर्म भरावा लागतो.

अर्मेनियाची राजधानी येरेव्हान ते आर्तसाखची राजधानी स्टेपनकर्ट  हा सुमारे ३२० किलोमीटरचा बहुतेक प्रवास डोंगरांतून अगदी वळणावळणाच्या रस्त्यावरून आहे. पण त्यातील फरक चटकन लक्षात येतो. आर्मेनियाच्या भागात निरनिराळ्या डोंगरांत सोने, चांदी, अल्युमिनियमच्या खाणी आहेत. पण आर्तसाखच्या हद्दीत प्रवेश केल्यापासून, हिरव्यागार घनदाट झाडीला सुरुवात होते. हा संपूर्ण अगदी ''शार्प ''वळणावळणांचा रस्ता डोंगरांतून व झाडीतून काढण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तो अतिशय उत्तम अवस्थेत ठेवण्यात आला होता. आर्तसाखच्या तिन्ही बाजूंना अझरबैजानची सीमा व एका  बाजूला अर्मेनिया आहे. त्यांनी हल्ला केला तर आर्तसाखमधील सर्वच अर्मेनियनांच्या जीवाला धोका असल्याने सर्व प्रकारची काळजी घेण्यात येते. वस्तुतः अर्मेनियातून दोन बाजूंनी आर्तसाखमध्ये प्रवेश करता येतो. पूर्वी येरेव्हान ते स्टेपनकर्ट अशी छोटी विमानसेवा होती. पण अझरबैजानचे सैनिक ते विमान पाडतील या भीतीने ती विमानसेवा बंद करण्यात आली. आता केवळ रस्त्यावरील वाहतुकीद्वारे आर्तसाखचा जगाशी संपर्क राहतो.

सीमा ओलांडली आणि डोंगरांच्या कुशीत दडलेल्या नागोर्नो काराबाखच्या हिरव्यागार सौंदर्याने एकदम मोहून टाकले. हा वळणावळणाचा रस्ता संपूच नये असे वाटते. आम्ही ऑक्टोबर महिन्याच्या मध्यास तेथे होतो. तेव्हा झाडांचे बदलते रंग कमालीचे मोहक वाटत होते. आर्तसाखचा एक तृतीयांश भाग घनदाट जंगलांनी व्यापला आहे. तेथे प्रामुख्याने ओक, बीच व विविध फळझाडे आढळून येतात आणि जंगलांत जंगली बोकड, हरिण आणि जंगली डुकरांचा वावर असतो. आमच्यासमोर हरणांच्या एका छोट्या कळपाने रस्ता ओलांडला. तेव्हा आमची मोटार  चढावावरच थांबवावी लागली. सर्वत्र डोंगरचडोंगर आणि ‘ग्यामिश’ हे सर्वोच्च शिखर ३७२४ मीटर्स उंचीवर आहे. 

राजधानीच्या स्टेपनकर्ट शहरात उत्तरेकडून प्रवेश करताना, सर्वप्रथम दर्शन होते ते ‘वी आर अवर माउंटन्स’ या भव्यदिव्य शिल्पाचे. १९६७ मध्ये त्या शिल्पाचे काम पूर्ण झाले. नागोर्नो काराबाखच्या आर्मेनियन वारसाचे प्रतीक म्हणून ते प्रामुख्याने ओळखले जाते. ज्वालामुखीच्या खडबडीत दगडापासून ते बनविण्यात आले आहे. त्याच्यावर वृद्ध पुरुष व स्र्त्री यांची चित्र काढण्यात आली असून, डोंगराळ भागांतील लोकांचे ते चिन्ह समजले जाते. ‘ग्रँडमा व ग्रँडपा’ या नावानेही ते परिचित आहे. काही पायऱ्या चढून या स्मारकाच्या पायथ्याशी जावे लागते. आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा दिवेलागण झाली होती. पण फोटो मात्र व्यवस्थित काढता आले.

आर्तसाखची लोकसंख्या १४-१५ लाखांच्या घरात. स्टेपनकर्ट हे अतिशय सुंदर राजधानीचे छोटेखानी शहर. आम्ही शुक्रवारी रात्री तेथे पोहोचलो. सप्ताहाचा शेवट असल्यानं तेथील देखणे स्त्री- पुरुष नटूनथटून एकमेकांच्या घरी जाताना दिसत होते. रेस्तारंट्सची संख्या मोजकीच पण तीही स्थानिक नागरिक व पर्यटकांनी चांगली भरली होती. अर्मेनियातील व येथील खाद्यपदार्थ जवळजवळ सारखेच. येथेही आर्मेनियन भाषाच बोलली जात असली तरी येथील मूळ प्राचीन आर्मेनियन भाषेत व आधुनिक आर्मेनियन भाषेत विशेषतः व्याकरणात बराच फरक जाणवतो. त्यामुळे नव्या पिढीतील अनेक अर्मेनियनन्सना ती समजतही नाही. येथे अर्मेनियातील ड्रॅम हेच चलन व्यवहारात आहे. काराबाखचा कारभार स्वतंत्र सरकारतर्फे चालविला जातो. ते अध्यक्षीय संसदीय प्रजासत्ताक असून अध्यक्ष हा पंतप्रधानांची नेमणूक करतो व त्याला काढूनही टाकू शकतो. नागोर्नो काराबाख राष्ट्रीय असेम्ब्लीचे ३३ सदस्य असतात. विविध युद्धांमुळे काराबाखची अर्थव्यवस्था पूर्णतः खिळखिळी झाली असून, ज्या अर्मेनियावर तो अवलंबून आहे, त्या देशाची आर्थिक स्थितीही गंभीरच आहे. काराबाख येथे लाकडाचा उद्द्योग मोठया प्रमाणात चालतो. येथील ओक वृक्षांपासून वाइन ठेवण्याचे बॅरल्स बनविण्यात येतात व त्याना प्रचंड मागणी असते. तसेच बांधकामासाठी लागणारा कच्चा मालही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. खाणींतील विविध उद्द्योग, ऊर्जानिर्मिती हा अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे.

आर्तसाखच्या संपूर्ण परिसरात पाहण्यासारखे खूप काही आहे. अर्थात त्यात प्रामुख्याने कॅथेड्रल, चर्चेस यांचा समावेश आहे. गंझासार मठ हा अगदी प्राचीन काळातील असून तो व्हॅनक खेड्याच्या समोरील डोंगरावर आहे. त्या डोंगरावरून त्याला हे नाव पडले. या डोंगरात चांदी वगैरेचा मोठा साठा आहे. ट्रिगरांकट हे गाव काचनागेट नदीच्या किनाऱ्यावर इ.स पूर्व ९५-५५ मध्ये स्थापन झाले. त्याचे अवशेष २००५ मध्ये सर्वप्रथम आढळले. सुशी किल्ला अगदी प्राचीन आहे. त्याच्या सभोवतालच्या भिंतींची लांबी जवळजवळ अडीच किलोमीटर आहे. सुशी शहरातच आठ-नऊ मे १९९२ मध्ये काराबाखचे भयंकर युद्ध झाले. त्यावेळी हे सुशी शहर अझरबैजानच्या ताब्यात होते. पण ८ मे रोजी आर्मेनियन सैन्याने त्याला वेढा दिला आणि अझर  सैन्याला तेथून हुसकावून लावण्यात आले. आम्ही तेथे गेलो तेव्हा तेथे बरेच डागडुजीचे काम सुरु होते.

नागोर्नो काराबाख या अगदी चिमुकल्या राष्ट्राला दिलेली भेट खरोखरच आगळीवेगळी ठरली. या प्रदेशावरून अर्मेनिया-अझरबैजान यांच्यात नेहमीच संघर्ष सुरू असतो. त्यांच्यात सुरू असलेल्या  युद्धात रशियाने नुकतीच मध्यस्थी करून काही तह केले. या करारांत काराबाखचा काही भाग अझरबैजानला देण्याचे ठरले. त्या गावांतील लोकांनी आपली घरे सोडून आर्तसाखच्या भागात जाण्याचे ठरविले. पण घरातून जाताना,त्यांनी आपली घरे जाळून टाकल्याची दृश्य दूरचित्रवाणीवर पाहावयास मिळाली. खूप वाईट वाटले. सत्ता, धर्म यांच्या पायी इतक्या सुंदर, हिरव्यागार प्रदेशाची, तेथील लोकांची जी ससेहोलपट होत आहे ते खरोखरच दुर्दैवी म्हणावे लागेल.

ओम नमः शिवाय...
आर्तसाखमधील सुशीचे मुख्य वैभव म्हणजे १८८६ मध्ये बांधण्यात आलेले ''Ghazanchetsots ‘  हे चर्च. चुनखडीच्या दगडात त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. त्या चर्चला आम्ही दिलेली भेट कायमची लक्ष्यात राहिली. आर्तसाखचा महान ऐतिहासिक, सांस्कृतिक  वारसा म्हणून त्याची ओळख आहे. चर्चचे मुख्य सभागृह ३४.७x२३x३५ मीटर्स क्षेत्रफळाचे असून, त्याचा ११५ फूट व्यासाचा मध्यवर्ती घुमट चार मुख्य खांबांवर उभा आहे. जगातील सर्वांत भव्य आर्मेनियन चर्च अशी त्याची खाती आहे. 

या चर्चमध्ये आवाज चांगला घुमतो व त्याचे प्रतिध्वनी ऐकावयास मिळतात. बरोबरच्या टुर गाइडने जयंतीला काहीतरी बोलावयास सांगितले. तिने ओम  हा शब्द मोठ्याने उच्चारला. त्यावर शेजारीच उभी असलेली आर्मेनियन तरुणी म्हणाली ''नमः शिवाय''आणि ''ओम नमः शिवाय'' चा आवाज त्या चर्च मध्ये चांगलाच घुमला.आम्हाला कमालीचे आश्चर्य वाटले. ती आर्मेनियन तरुणी रशियात प्राध्यापिका होती आणि  रामायण, महाभारताचा तिचा चांगला अभ्यास होता. गेल्याच आठवड्यात गुगलवरून समजले कि ऑक्टोबर २०२० म्हणजे बरोबर वर्षानंतर अझरबैजानी  सैनिकांनी क्षेपणास्त्र सोडून या चर्चवर हल्ला केला आणि त्यात त्या घुमटाचा बराच भाग कोसळला...

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com