‘दलदल टाळू पाहणारी’ वात्सल्यमूर्ती (संदीप काळे)

Sandip-Kale
Sandip-Kale

माझ्या डोळ्यासमोर दोन चित्र होती. एक चित्र होतं बुधवार पेठेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खूश करणारी फराह आणि इथे घरी आपल्या आईला खूश करणारी फराहची सगळी मुलं. एकाच समाजातील दोन घटना, मन हेलावून सोडणाऱ्या होत्या. काय बोलावं आणि काय विचार करावा, या तंद्रीत मी अगदी शांत झालो. मी अनेक ठिकाणी जात असताना अशा हेलावून टाकणाऱ्या प्रसंगांना सामोरं जात असतो; पण हा प्रसंग खूप वेदनादायी होता. आम्ही बोलताना मुलं यायची आणि मध्येच फराहच्या गालवरून हाथ फिरवून परत आपल्या कामाला लागायची. जेवढा जीव त्यांचा आपल्या आईवर होता तेव्हढाच जीव आपल्या कामातही होता...

पुण्यात ‘सकाळ’च्या बुधवार पेठेतल्या कार्यालयाच्यासमोर एका चहाच्या टपरीवर मी आणि माझे दोन सहकारी गप्पा मारत होतो. वेगवेगळ्या विषयांवर आमच्या गप्पा सुरू होत्या. तितक्‍यात पाठीमागून एका महिलेनं विचारलं, ‘’दादा कसे आहात?’’ आमच्या एका सहकाऱ्याच्या ओळखीच्या महिला होत्या त्या. माझ्या सहकाऱ्यानं लगेच हात जोडत त्या महिलेला ‘‘ठीक आहे ’’ असा हसून प्रतिसाद दिला. चहावाल्याला इशारा करत चहा मागवला. त्या महिलेच्या दोन्ही हातांमध्ये दोन बॅगा होत्या. त्या तिनं खाली ठेवल्या. आलेला चहा घेत ती महिला माझ्या सहकाऱ्याला म्हणाली, " दादा, या कोरोनानं सगळ्यांचंच पार कंबरडं मोडलं हो. मी ज्या ज्या क्षेत्रात काम करते, तिथं असणाऱ्या महिलांना जगणं नकोसं झालंय. असे एक एक करून ते दोघे जण वेगवेगळ्या विषयांवर बोलत होते. मी गप्पच होतो, हे माझ्या सहकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या महिलेला माझी ओळख करून दिली. माझा सहकारी म्हणाला, ‘‘ या अलका गुजनाळ (९६३७१०५८९९). पुणे महापालिकेच्या समाजविकास विभागात समूह संघटिका या पदावर काम करतात. देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी त्या खूप काम करतात.’’ 

त्या महिलेनं आणलेल्या दोन्ही बॅगांकडे बघत मी तिला म्हणालो, ‘‘ या बॅगेमध्ये काय आहे.’’ ती म्हणाली, ‘‘ माझ्या एका मैत्रिणीकडं पुस्तकं आणि वह्या देण्यासाठी जात आहे. ती महिला दोन-चार मुलांचं संगोपन करत असते.’’
मी म्हणालो, ‘‘ काय करतात त्या ’’ आपला आवाज लहान करत अलकाताई  म्हणाल्या, ‘‘ ती देहविक्री करते.’’ मी जरासा शांत बसलो. मी म्हणालो, ‘‘ज्या मुलींचे ती संगोपन करते. त्या मुली कुणाच्या आहेत?’’ ती म्हणाली, ‘‘ तिच्यासोबत देहविक्री करणाऱ्या तिच्या दोन मैत्रिणी, ज्यामधली एक जण एड्‌सनं दगावली आणि दुसरी कर्करोगानं. या दोन्ही महिलांच्या मुलींचा सांभाळ आता ही करते.’’
मी म्हटलं, ‘‘सांभाळ करते म्हणजे?’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘या मुलींना शिकवते. त्यांना माता-पित्याच्या सगळ्या गोष्टी मिळवून देण्याचं काम करते.’
मला हे सगळंच वेगळं वाटायला लागलं. हल्ली आपल्या मुलांना सांभाळायला पालकांना वेळ नाही. त्यात असा एखादा प्रकार पाहिला की नवल वाटणं अगदी साहजिक आहे. मी म्हटलं, "मी त्या महिलेला भेटू शकतो का?''
माझा सहकारी भुवया उंच करत म्हणाला, ‘‘मला निघावं लागेल. मी अजून कामाला सुरुवात केलेली नाही.’’ मी म्हणालो, ‘ठीक आहे. तुम्ही निघा. अलकाताईंची जर काही हरकत नसेल, तर मी यांच्यासोबत जाऊन त्या महिलेला भेटून येतो.’’ अलकाताईंनी होकार दिल्यावर आम्ही दोघं जण बुधवार पेठमध्ये जिथं ती महिला होती, त्या दिशेनं निघालो. त्यांच्या हातामधली एक बॅग मी माझ्या हातामध्ये घेतली. गप्पा मारत-मारत आम्ही त्या महिलेच्या घराच्या दिशेनं निघालो. आम्ही त्या घरापर्यंत पोहोचणार तितक्‍यात समोरून एक महिला धावत अलकाच्या हातचं ओझं उचलण्यासाठी पुढे आली. अलकानं त्या महिलेची ओळख करून देत ‘हीच "ती'' महिला आहे- फराह हिचं नाव- जिच्याविषयी मी तुम्हाला सांगत होते.’
अलका फराहला म्हणाली, ‘यह संदीप भय्या है. किताबें देखके ये आपको मिलने आये.’ ती एकदम लाजली.

तिनं नमस्कार म्हणत, मला आपल्या घरात नेलं. घर कसलं ते छोट्या छोट्या खोल्या आणि कोंदट येणारा वास. जिथं माणसं आपल्या शरीराची आग विझवायला येतात, तिथल्या किळसवाण्या प्रकाराच्या सीमा कधीच पार झाल्या होत्या. माणसं येत होती आणि भाजीपाल्याचा सौदा करावा, तसा महिलांच्या अब्रूचा सौदा करत होती. कशाचे स्त्रीत्व आणि कशाचा स्वाभिमान. ते अलकासाठी नवीन नव्हतं, ना फराहसाठी नवीन होतं; मात्र माझ्यासाठी ते नवीन होतं.

फराह माझ्याकडे बघत म्हणाली, ‘‘चहा घेणार की कॉफी.’’ मी म्हणालो, ‘‘मी काही नाही घेणार.’’ मी ‘‘पाणी आणा’’ असं म्हटल्यावर फराह आतमध्ये पाणी आणायला गेली. माझ्या हातात पाण्याचा ग्लास ठेवत, तिनं त्या पुस्तकाच्या बॅगकडे धाव घेतली. फराह त्या बॅगमधले पुस्तक काढत अलकाला म्हणाली, ‘‘मागच्या वेळेस तू आणलेली सर्व पुस्तकं माझ्या मुलींनी पूर्ण वाचून काढली. वह्यासुद्धा आता संपत आल्यात.’ मी पाण्याचा ग्लास खाली ठेवत फराहला म्हणालो. ‘कितवीत शिकत आहेत तुमची मुलं.’ ती म्हणाली, ‘शबिना आठवीला आहे. नेहा आणि आशा पाचवीला आहे. सीमा चौथीला आहे. आणि मुलगा जुबेर दुसरीला आहे.’ अलका म्हणाली, ‘हिची एकच मुलगी आहे. बाकी सगळ्या हिच्या मैत्रिणीच्या मुली आहेत.’
मी म्हणालो, ‘‘तुम्हाला का वाटलं, तुमच्या मैत्रिणींच्यामागे मुलींना सांभाळावं, शिकवावं?’

फराह म्हणाली, ‘दादा, माझं आणि माझ्या मैत्रिणीचं सगळं आयुष्य या दलदलीमध्ये गेलं. माझ्या मैत्रिणी तर त्यांच्या कर्माने गेल्या. त्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं असतं, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. मरताना त्या दोघींनीही आपल्या मुली माझ्याकडे दिल्या आणि मला सांगितलं, आईसारखा यांचा सांभाळ कर. अलकाताईंसारख्या अनेकांनी आधार दिला. यातून या मुलींना शिकवण्याचं काम, त्यांचे संगोपन करण्याचं काम सुरू आहे.’
अलका म्हणाली, ‘फराह जशा मुलं-मुली सांभाळते, तसे अनेक जण कुणाच्या तरी मुलं-मुली सांभाळत असतात. त्यांना शिकवत असतात.’ फराह आणि अलका या दोन महिलांनी जे पाऊल उचललं होतं, ते माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं. मी फराहला म्हणालो, ‘मुलं राहतात कुठं, इथंच?’

ती म्हणाली, ‘नाही हो. छे...! या भागातून जेव्हा मुलं मी नेली तेव्हापासून आतापर्यंत एकदाही मी त्या मुलांना इथं आणलं नाही आणि भविष्यातही आणणार नाही.’’ फराहच्या कौटुंबिक आणि इकडं येण्याच्या सगळ्या प्रवासाला घेऊन तिच्याशी मी प्रश्न-प्रतिप्रश्न करत होतो. अत्यंत थरारक असा तिचा सगळा प्रवास होता. उच्चशिक्षित आई-वडिलांना दुबईमध्ये नोकरी होती. काकांच्या भरवशावर त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना संगोपनासाठी मिरजला ठेवलं. कुणाच्या तरी नादाला लागून त्या दोन्ही मुली बुधवार पेठेत कशा झाल्या, हे त्यांनाही कळलं नाही. लग्नं झाली; पण ती फार काळ टिकली नाही. फराहला तर सोळाव्या वर्षी मुलगीही झाली होती. आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या.

अलका म्हणाली, ‘‘फराहचं सर्व आनंदात चाललं होतं. हिच्या मोठ्या मुलीसह बाकी सर्व जण गुण्यागोविंदाने राहत होते. एक दिवस दुपारी फराहनं मला फोन केला आणि अर्जंट घरी ये, असा निरोप पाठवला होता. मी फराहच्या घरी जेव्हा गेले, तेव्हा फराहच्या घरी खूप लोकांची गर्दी जमली होती. एका साडीमध्ये फराहच्या मोठ्या मुलीला गुंडाळून ठेवण्यात आलं होतं.’’
मी म्हणालो, ‘‘काय झालं होतं?’’ 

तेव्हा अलका म्हणाली, ‘आपल्याच घरात फाशी घेतली होती तिनं.’ मी एकदम अवाक झालो. या दोघींनाही काय बोलावं हे मला सुचेना; तरीही बोलायची हिंमत करत मी अलकालाच म्हणालो, ‘का आत्महत्या केली तिनं?’ अलका म्हणाली, ‘काय बोलायचं?’ त्यावर फराह आणि अलका हमसून हमसून रडत होत्या. अलका आतमध्ये गेली. पाणी घेऊन आली. फराहला तिनं पाणी दिलं. फराहची समजूत काढत,  तिला ‘शांत बस’ असं ती सांगत होती; पण काही केल्या फराहचं रडणं थांबत नव्हतं. अलकाचं समजावणं सुरूच होतं. त्या घरात अधूनमधून येणारे ग्राहक फराहचा रडका चेहरा पाहून, आल्या पावली तसेच परत जात होते. अलकासह अनेक मुली आणि महिला फराहची समजूत काढत होत्या. बाजूला असलेली एक वयस्कर महिला म्हणाली, ‘फराहचा तिची पहिली मुलगी शम्मीमध्ये फार जीव होता, तिला कुठं ठेवू आणि तिच्यासाठी काय करू, असं फराहला व्हायचं. काय माहीत शम्मीला कशी दुर्बुद्धी सुचली. तिनं स्वत:ला दोराला लटकवून घेतलं.’’ ती बाई बोलायची थांबली आणि सर्व माहोल शांत झाला. कोणीच कोणाशी बोलेना. या शांत, स्तब्ध वातावरणाची कोंडी कशी फोडायची, हा माझ्यासमोरचा प्रश्‍न होता.

मी अगदी शांतपणे म्हणालो, ‘का आत्महत्या केली फराहच्या मुलीने?’ बऱ्याच वेळानं स्वत:ला सावरत फराह म्हणाली, ‘ती ज्या शाळेमध्ये होती त्या शाळेमधल्या मैत्रिणी दोन-चार दिवसांपासून तिला तुझी आई धंदेवाईक आहे,’ असं म्हणून चिडवत होत्या. तिनं मला घरी येऊन विचारलंही. ‘आई, या मुली मला असं का म्हणतात. तू नेमकं काय काम करतेस?’ त्यावर मी नेहमीप्रमाणे तिला काही तरी खोटंनाटं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी माझी मुलगी माझा पाठलाग करत इथपर्यंत आली. तिनं इथलं सर्व काही पाहिलं. ती आल्या पावलांनी घरी निघून गेली. तिनं घरी जाऊन आत्महत्या केली,’ असं सांगताना परत फराहला रडणं आवरत नव्हतं.
अलका म्हणाली, ‘चल, तू आता दिवसभर रडत बसणार. आपण मुलांकडे जाऊ आणि त्यांच्याशी बोलू. म्हणजे तुला बरं वाटेल.’

फराह म्हणाली, ‘अहो, आताच तर आलीये मी.’ मीच थोडा आग्रह करत म्हणालो, ‘चला ना, मलाही मुलांना भेटता येईल.’ आम्ही फराहच्या बुधवार पेठच्या घरून ती जिथं राहते तिथं निघालो. वाहतुकीच्या धबडग्यातून मुंगीच्या पावलानं रस्ता काढत, काढत आम्ही फराहच्या घरी पोहोचलो. आज आई इतक्‍या लवकर आली. याचा आनंद मुलांना इतका झाला, की विचारू नका. आई काय असते आणि तिला किती महत्त्व आहे, हे तो फराह आणि तिच्या मुलींच्या भेटीचा प्रसंग पाहिला तर आपल्या लक्षात येईल.

आम्ही तिच्या घरी बसलो. मुलं आपापल्या कामांमध्ये गुंग होती. कुणी ऑनलाइन होतं, कुणी लिहीत बसलं होतं, कुणी वाचत बसलं होतं. फराहनं सगळ्या मुलांना बोलवलं. माझी ओळख करून दिली. अलकानं सोबत आणलेला खाऊ मुलांना दिला. मी त्या सगळ्या मुलांशी बोललो. ही सगळी मुलं प्रचंड हुशार होती. त्यांना काही तरी बनायचं, काही तरी करायचं, असं सतत त्यांच्या हालचालीतून जाणवतं होतं आणि त्या त्यांच्या इच्छेतूनच रोजचं काम ती मुलं अगदी चोखपणे बजावत होती. फराह ज्या दलदलीमध्ये फसली. तिथून आता ती निघू शकत नाही, अशी परिस्थिती असताना, तिनं आपल्या जगण्याचा एक वेगळा आनंदमार्ग शोधला होता. तो मार्ग या मुलांच्या भविष्यातून निघणारा होता. मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुलं पटापट देत होती. घरात जेमतेम सगळं. उद्याच्या खाण्याचीही व्यवस्था घरात नाही. आपल्याला काही तरी वेगळं करून दाखवायचं आहे. आपल्या आईला खूश करायचं आहे, या एका उद्देशानं त्या मुलांची धडपड सुरू होती.

माझ्या डोळ्यासमोर दोन चित्र होती. एक चित्र होतं बुधवार पेठमध्ये येणाऱ्या त्या प्रत्येक ग्राहकाला खूश करणारी फराह आणि इथे घरी आपल्या आईला खूश करणारी फराहची सगळी मुलं. एकाच समाजातील दोन घटना, मन हेलावून सोडणाऱ्या होत्या. काय बोलावं आणि काय विचार करावा, या तंद्रीत मी अगदी शांत झालो. मी अनेक ठिकाणी जात असताना अशा हेलावून टाकणाऱ्या प्रसंगांना सामोरं जात असतो; पण हा प्रसंग खूप वेदनादायी होता. आम्ही बोलताना मुलं यायची आणि मध्येच फराहच्या गालवरून हाथ फिरवून परत आपल्या कामाला लागायची. जेवढा जीव त्यांचा आपल्या आईवर होता तेव्हढाच जीव आपल्या कामातही होता. यापैकी एकाही मुलाला माहीत नाही, की आपली आई काय करते आणि त्या आईलाही माहीत नाही, इतका लळा लावल्यानंतर ही सर्व मुलं आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतील की नाही; तरीही त्या मुलांमध्ये आयुष्याची, आत्मिक इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये फराहनं कसलीही कसर सोडली नव्हती. ना आई-वडील, ना नवरा.

अलकासारख्या अनेक मैत्रिणींना सोबत घेऊन आपल्या आयुष्याचा सकारात्मक गाडा ओढण्याचं काम फराह करत होती. खिशामध्ये हात घालून पाकिटामध्ये होते तेवढे पैसे त्या मुलांसाठी फराहच्या हातात ठेवले. अलकाकडे बघत फराहनं ते पैसे घेण्यासाठी साफ नकार दिला. मी हात जोडून विनंती केल्यानंतर अलकाच्या सांगण्यानंतर फराहनं ते पैसे स्वीकारले. सगळं ऑनलाइन असणाऱ्या जमान्यात आपल्याकडे पैसे असणार तरी किती? भविष्यात या मुलांसाठी काही करता येईल का, याचा विचार करत मी फराहच्या बॅंक पास-बुकची डिटेल्स स्वत:कडं घेतली. निघतो म्हणत जायला निघालो. फराहच्या मुलींनी एक पेंटिंग माझ्या हातामध्ये ठेवलं. ते माझंच होतं, अगदी हुबेहूब. मी ते पेंटिंग बघून अवाक‌ झालो. निसर्गाला सगळ्याच माणसांना सुखी ठेवणं जमलं नाही; पण निसर्गाला चांगलं निर्माण करता येतं, याची प्रचीतीही पावलोपावली येते, हे चित्र त्याचं उत्तम उदाहरण होतं. अलकाला आपण या मुलांसाठी काही तरी करू, असं म्हणत तिथून मी निघालो.

अलका तिथून निघताना म्हणाली, ‘‘ दादा, अशा फराह खूप आहेत, ज्या आपल्या मुलांना उभं करण्यासाठी धडपड करताहेत. त्यांना आर्थिक अडचण आहेच; पण सामाजिक अडचणीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत.’ मी मान हलवत, सुन्न मनानं ऑफिसकडे निघालो. माझ्या मनात विचार चालला होता. ज्यांच्याकडे सगळं काही असतं, त्यांच्याकडं त्या असण्याची कदर नसते. ज्यांच्याकडे काही असतं  त्यांना आपण काही तरी मिळवलं पाहिजे, यासाठीची धडपड असते. ज्यांच्याकडून चूक झालेली असते, ती चूक सुधारण्यात त्यांचं आयुष्य जातं. त्यामुळे चूक होताच कामा नये, याची खबरदारी घ्यावी लागेल, तरच फराहसारख्या अनेक मुली पस्तिशीच्या आतच आपलं आयुष्य संपल्यासारखं वावरणार नाहीत. जे फराह करते, तिला निसर्ग साथ देतो; पण समाज मात्र तिला सतत धुडकावत राहतो. आपण  चांगुलपणासाठी पुढे येऊ. जगण्यातला चांगूलपणा शोधत आपण पुढे जात राहणं, हे मला फराहच्या चिमुकल्या मुलीच्या पेंटिंगमधून दिसलं. समाजाला ते कितपत दिसेल, हे माहीत नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com