विशेष : मिलाफ संस्कृतीच्या वारशाचा!

संतोष शाळिग्राम 
Friday, 4 December 2020

आपल्यातील प्रत्येक जण स्वत:मध्ये दडलेल्या चांगुलपणाचा शोध घेत असतो. आपलं, आपल्या कुटुंबाचं मूळ शोधण्याचा हा प्रयत्न असतो. त्यातून नव्या युगाचं जुन्या युगाशी असलेलं नातंही सापडतं. असंच काहीसं संस्कृतीच्या पाऊलखुणा शोधण्याचा आणि त्याचं नव्या युगाशी नातं पुनर्प्रस्थापित करण्याचा एक अभिनव उपक्रम गुजरातमध्ये सुरू आहे.

आपल्यातील प्रत्येक जण स्वत:मध्ये दडलेल्या चांगुलपणाचा शोध घेत असतो. आपलं, आपल्या कुटुंबाचं मूळ शोधण्याचा हा प्रयत्न असतो. त्यातून नव्या युगाचं जुन्या युगाशी असलेलं नातंही सापडतं. असंच काहीसं संस्कृतीच्या पाऊलखुणा शोधण्याचा आणि त्याचं नव्या युगाशी नातं पुनर्प्रस्थापित करण्याचा एक अभिनव उपक्रम गुजरातमध्ये सुरू आहे. बिरवा कुरेशी या प्रसिद्ध नृत्यांगना त्यासाठी ‘क्राफ्ट ऑफ आर्ट’च्या माध्यमातून प्रयत्नशील असून, पती उस्ताद फजल कुरेशी यांचीही साथ त्यांना लाभली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या आजूबाजूला ऐतिहासिक वारसा असलेली अनेक स्थळं, इमारती आढळतात. त्या प्रदेशाची ओळखही त्यात दडलेली असते, मात्र त्याकडं कलात्मक आणि सांस्कृतिक वारशाच्या नजरेनं क्वचित पाहिलं जातं. बिरवा यांनी हा प्रयत्न केला आहे. या जागा आणि वास्तू भारतीय संस्कृतीच्या दूत आहेत. त्यात वास्तुकला, त्या काळातील तंत्रज्ञान व काळाचा स्वभावही दडलेला आहे, असं त्या मानतात. हा ऐतिहासिक वारसा संस्कृतीचा भाग असल्यास त्यात संगीत अविभाज्य आहे, असा विचार करून त्यांनी हा उपक्रम सुरू केला. गुजरातमधील ऐतिहासिक वारसा असलेल्या स्थळांमध्ये त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यास सुरवात केली.

संस्कृतीच्या वारशाचा हा मिलाफच आहे. याबद्दल त्या सांगतात, ‘‘हा वारसा आपण जपला आणि संवर्धन केला, तरच पुढील पिढ्यांचा त्याबरोबर ऋणानुबंध कायम राहील आणि तो दृढ होईल. म्हणून हा उपक्रम सुरू केला. त्याअंतर्गत जुन्या काळातील पाण्याचे स्रोत समोर आले, म्हणून ‘वॉटर फेस्टिव्हल’ सुरू झाला. प्रत्येक राज्यात, प्रदेशात संस्कृतीच्या खाणाखुणा आहेत. त्याला पुन्हा समाजाशी जोडणं, तरुणाईला या स्थळांपर्यंत घेऊन जाणं, हा आमचा उद्देश आहे.’’ 

त्यासाठी संगीतच का, या प्रश्‍नावर त्या म्हणतात, ‘‘संगीत हेच प्रत्येकाला जोडणारा दुवा आहे आणि संस्कृतीचा दूतही आहे. म्हणूनच या वारसा स्थळांची ओळख पुनर्स्थापित करण्यासाठी संगीताचा उपयोग करीत आहे.’’ त्यांनी २०१०पासून आत्तापर्यंत अहमदाबादसह गुजरातमधील ‘सरखेज रोजा’, ‘अडालज नी वाव (विहिर)'', ‘भद्र फोर्ट’, ‘तीन दरवाजा’, ‘राणी की वाव’, ‘खान मशीद’, अहमदाबाद नी गुफा’ या ठिकाणी सुफी संगीत, शास्त्रीय संगीत, फ्युजन आदी सांगीतिक कार्यक्रम केले आहेत. भारतामध्ये अशी अनेक वारसास्थळं आहेत. त्या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे. संस्कृतीचा वारसा जपताना या ऐतिहासिक वारसा स्थळांना संस्कृतीचे दूत बनवून पुढील पिढ्यांमध्ये ही संस्कृती रुजविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ‘वर्ल्ड हेरिटेज वीक’ १९ ते २५ नोव्हेंबर याच काळात दरवर्षी साजरा केला जातो.

‘वॉटर फेस्टिव्हल’चा आनंद घेण्यासाठी...
अहमदाबादपासून वीस किलोमीटर असलेल्या ‘अडालज नी वाव’ इथं येत्या सहा डिसेंबरला बिरवा कुरेशी यांनी ‘वॉटर फेस्टिव्हल’चे आयोजन केले आहे. हा एक सांगीतिक महोत्सव आहे. यात तबलावादक उस्ताद फजल कुरेशी, बासरीवादक राकेश चौरासिया, गायक कुटले खॉं, सारंगीवादक दिलशाद खॉं, ढोलक वादक नवीन शर्मा आपली कला सादर करणार आहे. हा कार्यक्रम ‘बुक माय शो’वर मोफत ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. त्यासाठी ‘बुक माय शो’वर नोंदणी मात्र आवश्‍यक आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Santosh Shaligram on heritage of Milaf culture