‘जिंकू किंवा मरू’ ची लढाई ... (सुनंदन लेले)

Sunandan-Lele
Sunandan-Lele

भारतीय क्रिकेट संघाकरिता आत्तापासून पुढचा एक महिना संक्रमणाचा काळ असेल. अग्निदिव्यातून पार पडल्याशिवाय सोन्याला झळाळी येत नाही त्याप्रमाणे भारतीय संघाला तीन कसोटी सामन्यात आक्रमक ऑस्ट्रेलियन संघाच्या आव्हानाच्या अग्निदिव्यातून सुखरूप बाहेर पडावे लागणार आहे.

‘सगळे दोर मी कधीच कापून टाकले आहेत ... आता खाली उतरायचे सर्व मार्ग बंद आहेत... दरीत उडी मारून मरायचे का शत्रूशी दोन हात करून इतिहास रचायचा तुम्हीच ठरवा .... फिरा  मागे आणि प्राणपणाने लढा'', कोंढाणा किल्ला सर करायला गेले असताना निर्णायक क्षणी शेलार मामांनी अशी मावळ्यांना साद घातली होती आणि मग काय घडले, कोंढाण्याचे नाव सिंहगड का झाले’ ही कहाणी सगळ्यांना तोंडपाठ आहे. अगदी तशीच वेळ आली आहे भारतीय क्रिकेट संघासाठी. पहिला कसोटी सामना रंग भरू लागला असताना तिसऱ्या दिवशी एका तासाच्या खेळात सगळेच विपरीत घडले. भारताचा दुसरा डाव निचांकी अशा ३६ धावांमध्ये संपला आणि ऑस्ट्रेलियाच्या हाती मालिकेत १-० आघाडी आली. दुसरा कसोटी सामना म्हणजे बॉक्सिंग डे टेस्ट. भव्य मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरू झाली असताना भारतीय संघाला आव्हानांनी चारही बाजूंनी घेरले असताना परत तोच संदेश आसमंतात घुमत आहे की प्राणपणाने लढा.

झाले गेले होऊन गेले 
दोन त्रिशतकांचा बादशहा वीरेंद्र सेहवागशी बोलताना तो म्हणाला, क्रिकेटमध्ये एक वाक्य नेहमी सांगितले जाते, ‘ रात गयी बात गयी''. खेळाडू कितीही महान असला तरी त्याची सुरवात या वाक्याने होते. कारण करंट अकाउंटला क्रिकेटमध्ये मोल जास्त असते . तुम्ही आधीच्या सामन्यात शतक ठोकले असले किंवा फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झालेला असला तरी पुढच्या डावाची सुरुवात शून्यानेच करावी लागले. क्रिकेटच्या खेळात बँक बॅलन्स नसतो हे मला लवकरच जाणवले होते. बचत खाते नसतेच जणू काही फलंदाजाकरता. तुम्ही अगोदर केलेल्या धावा तुम्हाला उभारी किंवा आत्मविश्वास देतात पण त्याचा उपयोग त्यापेक्षा जास्त नसतो. आधीच्या सामन्यात काय झाले यातून शिकून सतत पुढच्या सामन्याची तयारी नव्याने करण्यात हुशारी असते. तेव्हा सांगण्याचा अर्थ इतकाच आहे की आधीच्या सामन्यात जे काही घडले ते संघाकरिता झाले गेले होऊन गेले. आता दुसऱ्या सामन्यात ते स्टेशन मागे सोडून पुढचा प्रवास कसा करायचा याचा विचार करायला हवा. नवा गाडी नवं राज्य या विचारांनं दुसऱ्या कसोटीला धडक मारायला हवी, सेहवाग त्याच्या सडेतोड शैलीत सांगून गेला.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रानोमाळ भटकंती करणाऱ्या ट्रेकर्सचा हा विचार असतो, की जे नाहीत त्यांच्याविना मोहिम करायची जे आहेत त्यांच्यासोबत. कारण कोणी येणार किंवा नाही येणार म्हणून जातिवंत ट्रेकर थांबत नाही. तो मोहिमेला जातोच. दुसऱ्या सामन्यात विराट कोहली आणि महंमद शमी नसणार हे पक्के असताना भारतीय संघाकरिता आता त्यांच्या अनुपस्थितीचा विचार करून चालणार नाही. आता  विचार करावा लागणार की आहे त्यांच्या साथीनं मोहीम फत्ते कशी करायची. विराट कोहली संघात नसण्याचा परिणाम होणार हे सांगायला कोणा जाणकाराची गरज नाही. विचार हा व्हायला हवा की हाती काय शस्त्र आहेत आणि त्यांचा प्रभावी वापर कसा करायला हवा. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीला अशाच विचारांनी डावपेच आखावे लागणार आहेत आणि ते मैदानावर राबवून दाखवावे लागणार आहेत. 

टेकऑफ का लँडिंग
अजिंक्य रहाणेसाठी पुढचे तीन कसोटी सामने म्हणजे ‘जिंकू किंवा मरू’ या पद्धतीचे आहेत. गेल्या काही कसोटी सामन्यात फलंदाज म्हणून अपेक्षित कामगिरी करता न आल्याचे शल्य मनात साठवून भारतीय संघाला अत्यंत कठीण अवस्थेतून रहाणे कसे पुढे घेऊन जातो हे बघणे रंजक ठरणार आहे. मला २०१७ मधला काळ आठवतो. ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या दौऱ्यावर आला असताना पुण्यात झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला सपाटून मार खावा लागला होता. बेंगलोरला झालेल्या दुसऱ्या सामन्यात नाजूक क्षणी अजिंक्य राहणे आणि चेतेश्वर पुजाराने मोलाची भागीदारी रचून भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढले होते. भारताने तो सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली होती.  

रांचीच्या झालेला तिसरा कसोटी सामना  अनिर्णित राहिला होता. निर्णायक चौथ्या कसोटी सामन्याकरिता दोनही संघ निसर्गसुंदर धर्मशालाला पोहोचले असताना विराट कोहलीला दुखापत झाली आणि तो चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही हे पक्के झाले. नेतृत्वाची जबाबदारी अजिंक्य रहाणेवर आली असताना रहाणेने सामन्यात ५ गोलंदाजांसह उतरण्याचा मानस कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेला बोलून दाखवला. कुलदीप यादवला खेळवण्याचा राहणेचा निर्णय मोठा परिणाम साधून गेला. चौथ्या डावात विजयाकरिता १०० पेक्षा थोड्या जास्त धावा भारताला करायच्या होत्या. अजिंक्य रहाणेने अत्यंत विश्वासाने कडक बॅटिंग करून सामना जिंकून दिला होता. त्या संपूर्ण सामन्यात अजिंक्यने ज्या ठामपणे सगळे निर्णय घेतले आणि संघाला गरज असताना कडक बॅटिंग करून ऑस्ट्रेलियन संघाला जागेवर ठेवले ते विसरता येत नाहीये.

अजिंक्य रहाणेकडे खंबीरपणे नेतृत्व करायची आणि आक्रमक बॅटिंग करायची क्षमता आहे की नाही याबाबत कोणाला शंका नाही, फक्त त्याने गेल्या काही दिवसात त्याच्या क्षमतेला अजिबात न्याय दिलेला नाही हे मान्य करावेच लागेल. या सगळ्यांचा विचार करता पुढचे तीन कसोटी सामने अजिंक्य रहाणेचे भावी कारकीर्द ठरवणारे असतील हे शंभर टक्के नक्की आहे. अजिंक्य रहाणेचे करिअर सध्याच्या मालिकेनंतर टेकऑफ करणार किंवा लँडिंग करणार आपल्याला स्पष्ट दिसणार आहे. अर्धवट कामगिरी ना संघाला करून चालणार आहे ना फलंदाज म्हणून अजिंक्य रहाणेला.      

नवीन खेळाडूंना संधी 
सचिन तेंडुलकरला आत्ताच काळ बघून २००७ -०८ ऑस्ट्रेलियन दौऱ्याची आठवण होते. सचिन म्हणाला, पहिल्या कसोटी सामन्यात मेलबर्नला पराभव झाल्यावर सिडनीच्या दुसऱ्या कसोटीत महानाट्य घडले. जोरदार लढत देणाऱ्या भारतीय संघाला पंच स्टीव्ह बॅकनरने खराब निर्णय देऊन रोखले होते. त्याच सामन्यात ‘मन्कीगेट’ प्रकरण घडले होते. भारतीय संघाचे प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतीने त्रस्त झाल्यावर नाजूक क्षणी पर्थ कसोटी सामन्यात आर पी सिंग , इरफान पठाण आणि एकदम तरुण इशांत शर्मासह उतरावे लागले होते. बलाढ्य ऑस्ट्रेलियन फलंदाजीला तीन तरुण गोलंदाज कसे रोखणार शंका वाटत असताना ह्या तीन गोलंदाजांनी कमाल कामगिरी करून दाखवली होती. भारताने तो कसोटी सामना जिंकून अविश्वसनीय पुनरागमन करून दाखवले होते. 

दुसऱ्या कसोटीबद्दल आणि भारतीय संघासमोर उभ्या असलेल्या आव्हानांबद्दल बोलताना सचिन म्हणाला, ‘‘ कोणाला शंका बाळगायचे कारण नाही की अजिंक्य रहाणे कर्णधार आणि फलंदाज म्हणून अपेक्षित खेळ करू शकतो का नाही. फरक इतकाच असेल की आता क्षमता आणि कामगिरीत अत्यल्प अंतर ठेवायचे काम अजिंक्यला करावे लागेल. अजिंक्य प्रचंड मेहनती खेळाडू आहे. हा असा काळ आहे की अजिंक्य मोठी भरारी मारू शकतो खेळाडू म्हणून. जेव्हा अडचणी वाढतात तेव्हा खेळाडूंना  वेगळी प्रेरणा साद घालू लागते आणि मग वेगळी कामगिरी करायची ईर्षा जागी होते. मला खरंच वाटत आहे की भारतीय संघ पेटून उठेल आणि काहीतरी वेगळी कामगिरी करून दाखवेल,’’ सचिन तेंडुलकरने मनातील विचार बोलून दाखवले.  

आत्तापासून पुढचा एक महिना भारतीय क्रिकेट संघाकरिता संक्रमणाचा काळ असेल. अग्निदिव्यातून पार पडल्याशिवाय सोन्याला झळाळी येत नाही त्याप्रमाणे भारतीय संघाला तीन कसोटी सामन्यात आक्रमक ऑस्ट्रेलियन संघाच्या आव्हानाच्या अग्निदिव्यातून सुखरुप बाहेर पडावे लागणार आहे.

शास्त्री समोरचं आव्हान
रवी शास्त्रीला गेली ४० वर्ष मी जवळून ओळखत आहे. त्याचा आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार करण्याचा स्वभाव मला नेहमीच आवडत आला आहे. भारतीय संघाला मार्गदर्शन करताना रवीनं याच दोन शस्त्रांचा वापर केला आहे. यावेळी फरक असा आहे की आत्मविश्वास आणि सकारात्मक विचाराच्या जोडीला विचारपूर्वक आखलेल्या योजनेची साथ लागणार आहे. शास्त्री संघाला मार्गदर्शन करताना किती सखोल विचार करतो याबाबत जाणकारांच्या मनात नेहमीच शंका राहिलेली आहे. शास्त्री त्याच्या खास शैलीत गुरकावतो आणि मैदानावर काहीही घडलं तरी सकारात्मक विचार करतो हे त्याचे मोठे गुण असले तरी आत्ताच्या परिस्थितीत फक्त त्यावर भागणार नाही केवळ तेवढेच धोकादायक ठरेल. आत्ता संघाला त्यापेक्षा जास्त सखोल मार्गदर्शनाची गरज आहे. जर असे मार्गदर्शन करण्यात रवी शास्त्री कमी पडला तर त्याच्यावर उथळपणाचा शिक्का बसेल. शास्त्रीला विराटच्या खेळाचे प्रचंड कौतुक आहे हे जगजाहीर आहे. विराट नसताना बाकीच्या खेळाडूंना रवी शास्त्री कसे प्रोत्साहित करतो आणि सरावात पूर्ण तयारी करून घेऊन अपेक्षित कामगिरी करण्याच्या मार्गावर कसे घेऊन जातो याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com