अवतरणार्थ शून्य पूर्णांक एक

समाज- समाज म्हणून आपण ज्या समूह संकल्पनेच्या नावाने ठणाणा करतो, तो समाज मुळात आपल्यापासूनच सुरू झालेला असतो.
Family
FamilySakal
Summary

समाज- समाज म्हणून आपण ज्या समूह संकल्पनेच्या नावाने ठणाणा करतो, तो समाज मुळात आपल्यापासूनच सुरू झालेला असतो.

समाजमनाच्या अंतरंगावर पडलेले विषमतेचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू असतानाच अचानक कुठून तरी कोसळधार यावी आणि आपल्या मानसिक अंतरंगाची जुनी, बुरसटलेली, साचलेली खाचखळगी पुन्हा जखमेसारखी वर यावीत तसं काहीसं वाटतं हल्ली. अगदी काल-परवापर्यंत आपण आपल्यातल्या सद्‍भावनेच्या, जाणिवेच्या मानवी लयकारीतून एकमेकांना हात द्यायचा प्रयत्न करीत होतो. तेव्हाच कुणी तरी अचानक आपल्या हातावर वार करावा आणि वार करणाऱ्या हाताला कुठल्या तरी जातीचं, धर्माचं लेबल लावावं... आपणही खाली-वर न पाहता अगदी अलगदपणे त्या प्रवाहाच्या स्वाधीन व्हावं आणि सांगितलेल्या दिशेनं धावत सुटावं अगदी आपली शुद्ध हरपेपर्यंत... ही सुन्न अवस्था व्यक्तिपरत्वे बदलते, प्रवाही होते, ढगफुटी झालेल्या नदीच्या वेल्हाळ पाण्यासारखी धुमसत राहते आणि मार्गात येईल ते सर्व काही नेस्तनाबूत करून ठेवते. उद्या कधी तरी समाजमनाच्या अंतरंगाच्या पटलावरील हा कोलाहल थांबेलही; पण ते वेल्हाळ पाणी ओसरून जाईल तेव्हा आपल्या मनातलं हस्तिनापूर बेचिराख झालेलं असेल. मग अशा वेळी प्रश्न पडतो मनातल्या भिंतींवर वाढत चाललेल्या या भेगा अशाच वाढू द्यायच्या का? की त्या भेगा कस्तुरीच्या सुगंधाने भारलेल्या मातीच्या गाऱ्याने लिंपून काढायच्या आणि माणसामाणसातली नात्यांची वीण अधिक घट्ट गुंफून काढायची? यासाठीही कुणाचा सल्ला घ्यायचा, कुठला प्रवाह निवडायचा, की कुणी मुत्सद्दी सांगेल तसं वाहवत जायचं याचा विचार ज्याचा त्याने करायचा आहे.

समाज- समाज म्हणून आपण ज्या समूह संकल्पनेच्या नावाने ठणाणा करतो, तो समाज मुळात आपल्यापासूनच सुरू झालेला असतो. आपण म्हणजेच समाज असतो. खरं तर या समाज नावाच्या झाडाचे मूळ आपल्यातच, स्वतःमध्ये असते. आपण मात्र ते इतरांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. होणाऱ्या घटनांवर, उद्‍भवणाऱ्या परिस्थितीवर बोट ठेवताना दुसरा कुणी तरी व्हिलन शोधण्याचा आपण केविलवाणा प्रयत्न करीत असतो. हा प्रयत्न आपल्यातला समाजिक गुन्हेगार दडवून ठेवतो. आपण मात्र स्वतः न्यायदेवतेच्या खुर्चीवर बसून आपल्यासारख्याच अनेक चेहऱ्यांमध्ये गुन्हेगाराचा चेहरा शोधत असतो. तो आपल्याला कधीही सापडत नाही. कारण गुन्हेगाराचा आणि आपला चेहरा सारखाच आहे, हेच मुळात आपल्याला मान्य नसतं. ते मान्य करण्यासाठी आणि त्या विषयाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपल्याला प्रश्न पडायला हवे असतात. आपल्याला मात्र हल्ली प्रश्नच पडत नाहीत. ज्यांना पडतात किंवा जे प्रश्न विचारतात ते द्रोही ठरतात. समाजमनाचं असं एक एक अंग बधिर होत चाललेलं असताना कुणाला तरी ही भूल उतरवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कुणाला तरी जागल्याची भूमिका घ्यावी लागेल. खांब म्हणून पाय रोवून उभं राहावं लागेल. शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध यांनी गोचर होणारा, समूर्त नि सजीव, जगण्याची आणि लढण्याची दिव्यदाहक स्फूर्ती देणारा दिवा लावावा लागेल. अवतरण... हा तोच दिवा आहे; पण तो साधार आहे. नामूलं लिख्यते किंचित् हे ब्रीद पाळणारा आहे. समाजभावना जपणारा आहे आणि मानवकल्याणाचे मोल मानणारा आहे.

मानं त्वक्षजमेव हि- प्रत्यक्ष हे एकच प्रमाण आहे आणि जे आहे ते प्रमाणासह मांडण्याचा ‘अवतरण’ हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आज हे रोपटं बाळसं धरायला लागलं आहे. वर्षपूर्तीनंतर रांगायला लागलं आहे... पुढे दुडूदुडू चालायलाही लागेल; पण त्यासाठी लागणार आहेत ते तुमच्यासारखे सुजाण वाचक, ज्यांना प्रश्न पडतात आणि ज्यांना उत्तरं शोधण्याची आवड आहे. ‘अवतरण’ तुमच्यासमोर नुसता प्रश्नांचा पाढा वाचणार नाही, तर त्या प्रश्नांची सप्रमाण उत्तरंदेखील देईल. इथे प्रश्नांची उकलही होईल आणि सामनाही रंगेल. तुम्हीही या सामन्याचे भाग असाल यात शंका नाही... आजपासून ‘अवतरण’चा नवा सीझन सुरू होतोय शून्य पूर्णांक एक... वाचत राहा, विचारत राहा...

- संपादक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com