‘हलाल’चे जागतिक ‘अर्थ’कारण 

अरुण आनंद epatrakar@gmail.com
Sunday, 10 January 2021

परिघाबाहेरून
हलाल हा शब्द केवळ मांस या बाबीशी निगडीत नाही. हलाल म्हणजे कायदेशीर. मुस्लीम जगतात हलाल या शब्दांपेक्षा ही व्यापक संकल्पना म्हणूनच पाहिले जाते. एक समांतर अर्थव्यवस्था या शब्दांभोवती केंद्रित असून जगभर तिचा विस्तार झालेला आहे.

सध्या ‘हलाल'' हा शब्द सर्वत्र चर्चेत आहे. बऱ्याच जणांसाठी हा शब्द फक्त ‘मांस'' पुरताच मर्यादित आहे. पण या ‘हलाल''वरून होणारं जागतिक अर्थकारण मोठं आहे. इस्लामसाठी ‘हलाल'' म्हणजे ‘कायदेशीर'' आणि याच्याविरुद्ध ‘हराम’ म्हणजे बेकायदा, असा याचा सोपा अर्थ. या पार्श्‍वभूमीवर ‘हलाल''ची चर्चा सुरू झाली ती कोरोनाच्या लशीवरून. काही मुस्लीम तज्ज्ञांच्या मते मुस्लीम धर्मानं ज्यांना ‘हराम'' मानलंय असे घटक या लशीमध्ये आहेत. त्यामुळे ती घेणे योग्य होणार नाही, असा मतप्रवाह तयार झाला. सरकारी पातळीवर आणखी एक महत्त्वाची घटना घडली, त्यावरूनही ‘हलाल''च्या चर्चेला जोर आला. भारतातून निर्यात होणाऱ्या मांसाच्या पाकिटांवरील माहितीपत्रकातून ‘हलाल'' शब्द वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं या वर्षांच्या जानेवारीत म्हणजे याच महिन्यात घेतला आहे. म्हणून ‘हलाल’ या विषयावर योग्य दिशेने व परिणामकारक चर्चा करण्यासाठी ‘हलाल''मागची कल्पना काय आहे आणि ही संकल्पना कुठून आली, यासारखे मूलभूत मुद्दे समजून घेणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘हलाल'' हा अरबी शब्द असून इस्लाममध्ये त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘हलाल'' म्हणजे जे कायदेशीर आहे त्याला मान्यता आणि जे बेकायदा आहे ते ‘हराम’. त्याला मान्यता नाही. इस्लाममधील वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथांमध्ये याबाबतची मार्गदर्शक तत्त्वं दिलेली आहेत. मुस्लिमधर्मीयांनी फक्त ‘हलाल'' उत्पादने व सेवा वापरायची, हे त्यातलं मुख्य तत्त्व आहे. त्यामुळे जगभर अनेक गोष्टींवर ‘हलाल'' असा उल्लेख केला जातो. अर्थात, फक्त मांस किंवा अन्नपदार्थ व सेवांवर ‘हलाल'' असा उल्लेख नसतो, तर वेगवेगळ्या कृतींबाबत तसा उल्लेख केला जातो. त्यामुळे अनेक मुस्लीम मूलतत्त्ववादी व दहशतवादी संघटनांनीही जिहादी कारवाया करण्यासाठी ‘हलाल''चा गैरवापर केल्याचं उघड आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘हलाल'' हे फक्त मांस बनविणे व खाणे याच्याशी संबंधीच आहे, असं अनेकांना वाटतं. पण, तसं नाही. मुस्लिमधर्मीयांच्या दैनंदिन जीवनाशी त्याचा जवळचा संबंध आहे. जसे, ‘हलाल मांस'', ‘हलाल शिक्षण'', ‘हलाल नोकरी'', ‘हलाल व्यापार'', ‘हलाल पर्यटन'', ‘हलाल जाहिराती'', ‘हलाल सौंदर्य प्रसाधने'', ‘हलाल भाज्या, डाळी, धान्य, दूध उत्पादने, चहा, कॉफी'', ‘हलाल किराणा'' ‘हलाल बॅंकिंग'', ‘हलाल गुंतवणूक'', ‘हलाल औषधे'', ‘हलाल फॅशन'', ‘हलाल रुग्णालये’, ‘हलाल हॉटेल'' इत्यादी. 

‘हलालोनोमिक्‍स’ हा शब्द समांतर जागतिक अर्थकारणाशी संबंधित आहे. ‘हलाल'' प्रमाणित उद्योग व व्यापार यामध्ये येतो. कित्येक शतकांपासून मुस्लीम समुदायामध्ये ‘हलाल व्यापार'' ही संकल्पना रूढ आहे. पण १९४५ पर्यंत त्याची योग्य पद्धत निश्‍चित केली गेली नव्हती. दक्षिण आफ्रिकेची राजधानी असलेल्या केपटाउनमध्ये जेव्हा मुस्लीम ज्युडिशिअल कौन्सिल हलाल ट्रस्ट’ची स्थापना झाल्यानंतर त्याचा ढाचा तयार झाला. ही संस्था अजूनही कार्यरत असून ‘हलाल'' संकल्पनेचं जाळं विस्तारण्याची भूमिका बजावत आहे. या मंडळाच्या स्थापनेनंतर थायलंडमध्ये १९६९ मध्ये ‘हलाल'' नोंदणी सुरू झाली. मात्र, ते कुवेतमध्ये निर्यात होणाऱ्या पोल्ट्री उत्पादनापुरतेच मर्यादित होते. मलेशियातून खऱ्या अर्थाने इस्लामकेंद्रित उद्योग, व्यापार व अर्थकारणाला सुरुवात झाली. १९७४ मध्ये ‘डिपार्टमेन्ट ऑफ इस्लामिक डेव्हलपमेंट मलेशिया'' (जेएकेआयएम) याची स्थापना झाली. हलाल व्यापारासाठी कायदा बनविणारा तो पहिला देश ठरला. ही प्रक्रिया एवढी गतीनं झाली, की १९८० मध्ये मलेशियाला ‘ग्लोबल हलाल हब'' म्हणून ओळखले जाऊ लागले. 

दिल्लीतील ‘हलाल नियंत्रण मंडळ''ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ‘डिपार्टमेन्ट ऑफ इस्लामिक डेव्हलपमेंट मलेशिया'' याची व्याप्ती ४५ देशांपर्यंत वाढली आहे व एकूण ७८ हलाल नोंदणीकृत आस्थापने जोडलेली आहेत. यात ‘हलाल इंडिया'', ‘जमात उल्मा हलाल फाउंडेशन'', ‘जमात उल्मा ई-हिंद हलाल ट्रस्ट'' या भारतातल्या प्रमुख संस्था सदस्य आहेत. मलेशियाची राजधानी असलेल्या क्वालांलमपूर येथे २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अब्दुल्ला हाजी यांनी सुरू केलेल्या ‘मलेशिया इंटरनॅशनल हलाल शोकेस''ची सुरुवात केल्यानंतर खऱ्या अर्थाने मलेशियामध्ये ‘हलाल''विषयी उत्सुकता वाढली व प्रोत्साहन मिळाले. मलेशियाशिवाय थायलंड, फिलिपिन्स आणि सिंगापूरमध्ये हलाल व्यापाराने पाय रोवले. हलाल प्रमाणपत्र देण्यासाठी सिंगापूरमध्ये १९७८ मध्ये "दी इस्लामिक रिलिजिअस कौन्सिल ऑफ सिंगापूर''ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर, १९८९ मध्ये इंडोनेशियात अन्न, औषधे व सौंदर्यप्रसाधने यांच्या वापराबाबत "मजलिस उल्मा इंडोनेशिया'' (एमयूआय) व "दी इंडोनेशियन उल्मा कौन्सिल फॉर मुस्लिम''ची सुरुवात झाली. 

पश्‍चिम आशियातील मुस्लिमबहुल देशांपैकी सौदी अरेबियामध्ये पहिल्यांदा या दिशेनं पावले टाकण्यास सुरुवात झाली. मांस हलाल नोंदणीसाठी "ऑस्ट्रेलिया फेडरेशन ऑफ इस्लामिक कौंन्सिलची निर्मिती झाली. शियाबहुल देश असलेल्या इराणमध्येही हलालबाबत जागृती करण्यात आली व १९७९ पासून हलाल प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेच हलाल व्यापार आशियायी देशांबाहेर व इतर जगातील बिगर मुस्लिम देशांमध्येही पाय पसरू लागला.

अमेरिका (१९७५), ब्राझील (१९७९), ऑस्ट्रेलिया (१९८३), न्यूझीलंड (१९८४) आणि युके (१९९४) यांचा त्यात समावेश आहे. याशिवाय, ‘युनो''कडूनही ‘हलाल''ला पाठिंबा मिळाला. ‘युनो''शी संलग्न अन्न व कृषी संघटनेनं १९९७ मध्ये ‘कोडेक्‍स एलिमेंटरिअस कमिशन''ने ‘हलाल''ची व्यापारी व्याख्या स्पष्ट केली. सध्या या संस्थेशी १८९ देश संलग्न आहेत आणि भारत १९६४ पासून संलग्न आहे. दिनार स्टॅंडर्ड यांनी २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल इस्लामिक इकॉनॉमी''च्या अहवालानुसार जागतिक हलाल व्यापार २०२३ पर्यंत तीन ट्रिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत जाणार आहे. २०१७ मध्ये तो दोन ट्रिलियन अमेरिकी डॉलर एवढा होता. 
(अनुवाद : गणाधीश प्रभुदेसाई )
(लेखक दिल्लीतील विचार विनिमय केंद्राचे संशोधन संचालक आहेत)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arun Anand Writes about Halal Global Economics