चीनबरोबरचं विसरलेलं युद्ध...

चीनबरोबरचं विसरलेलं युद्ध...

सिक्कीम सीमेवर भारत आणि चिनी सैन्यात मागील महिन्यात झटापट झाली. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील घुसखोरीच्या घटनेनंतर दोन्ही देशामधील संबंध ताणले गेले होते. या पार्श्वभूमीवर, असं म्हणणं समर्पक ठरेल की जेव्हा जेव्हा भारत-चीन सीमेवर तणाव वाढतो तेव्हा १९६२ मधील युद्धाचा मुद्दा पुढे येतो. भारत-चीन संबंधांचा इतिहास पाहिला, की आपल्याला फक्त १९६२चं युद्धचं आठवतं, हे दुर्दैव. आपण १९६७ हे वर्ष विसरलो आहोत. १९६७ मधील युद्धाचं पुन्हा स्मरण करणं आजच्या घडीला नितांत गरजेचं आहे. 

११ सप्टेंबर १९६७. याच दिवशी खरी सुरुवात झाली. जसा दिवस सुरू झाला तसे भारतीय सैनिक सिक्कीममधील नथू ला या जागी सीमा सुरक्षित करण्यासाठी काटेरी तार टाकण्यासाठी गेले. त्यावेळी सुमारे १०० चिनी सैनिक तेथे आले व त्यांनी भारतीय सैनिकांना धमकावण्यास सुरुवात केली पण भारतीय सैनिकांनी काम सुरूच ठेवले. चिनी सैनिक माघारी बंकरमध्ये गेले आणि पावणेआठच्या सुमारास गोळीबार करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने चिनी सैनिकांनी भारतीय बंकर व आउट पोस्टवर हल्ला केला. पण, तो काळ १९६२चा नव्हता. या वेळी भारतीयांकडे शस्त्रास्त्रांची कमतरता नव्हती. चीननं केलेल्या हल्ल्यात सुरवातीला काही भारतीय जवान हुतात्मा झाले. भारतीय सैन्यांने प्रत्युतरादाखल गोळीबार केला. पण चीन सैन्याचं जास्त नुकसान झाले नाही. युद्ध सुरू होऊन बराच कालावधी गेला. पण भारतीय तोफा शांत होत्या. लेफ्टनन जनरल जगत सिंग यांच्याकडे नेतृत्व होते. तोफखाना वापरण्यासाठी त्याकाळात दिल्लीतून केंद्र सरकारची परवानगी लागत होती.

जसा जसा दिवस पुढे जात होता, तसे तसे भारतीय सैनिक जखमी होण्याचे प्रमाण वाढत होते, आणि चिनी सैन्य आपल्या जागी भक्कम उभे होते. पण त्यावेळी जगतसिंग यांनी ठरविले होते की, १९६२ ची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही.  उलट एक नवीन इतिहास रचण्याचा निश्‍चय त्यांनी केला होता. ते स्वतः युद्धभूमीत उतरले आणि त्यांनी तोफखान्याला हल्ला करण्याचा आदेश दिला. काही तासांनीच, युद्धभूमीवरील चित्र पूर्ण बदलले. भारतीय तोफखाना ‘सेबू ला’ व ‘कॅमल्स बॅक’ या ठिकाणी होता, जो तांत्रिकदृष्ट्या अगदी योग्य जागी होता. चीनचे सैन्य जेथे होते ते ‘यातून खोऱ्या’ च्या टप्प्यात येत होते. भारतीय सैनिकांनी चीनचे तळ व संपर्क यंत्रणा जमीनदोस्त करून चिनी सैन्याच्या मुळावरच घाव घातला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनच्या बाजूने शिल्लक होते फक्त बंकरमधील सैन्यांचे मृतदेह. सुमारे ३५० चिनी सैनिक मारले गेले आणि सुमारे ४५० जखमी झाले. भारतीय सैन्याने १९६२ मधील पराभवाचा बदला घेतला होता. चिनी सैन्याचा अहंकार बेचिराख झाला होता. त्यामुळे त्यांनी परत सिक्कीममधील ‘चो ला’ या जागी हल्ला करून भारतीय सैन्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. नथू ला’ येथील युद्धानंतर १५ दिवसांनी त्याच क्षेत्रात ही घटना घडली. भारतीय व चिनी सैन्य पुन्हा समोरासमोर आले होते. यावेळी सुद्धा भारताचे नेतृत्व जगतसिंग यांच्याकडेच होते. चीनला यावेळीही भारी नुकसान सोसावे लागले. येथे सुद्धा चिनी सैनिकांनी कपटीपणे भारतीय सैन्यावर हल्ला केला. पण यानंतर भारतीय सैनिकांनी चीनला असे तडाखेबंद उत्तर दिले, की त्यांना माघार घ्यावी लागली आणि ‘चो ला’ ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांवर पाणी पडलं. या घटनेतून भारतीय सैन्याच्या शौर्याची प्रचिती आपल्याला येते. 

गुरखा सैनिक देविप्रसाद लिंबू यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता हुतात्मा होण्यापूर्वी कुकरीच्या हल्ल्यात पाच चिनी सैनिकांची डोकी धडावेगळी केली. त्यांच्या या पराक्रमाने आश्‍चर्यचकित झालेल्या चिनी लष्करी अधिकाऱ्यांनी देविप्रसाद यांचा मृतदेह भारताकडे सुपूर्द केला. सैन्याच्या शौर्याच्या गाथा बऱ्याच वेळा ऐकल्या आहेत; पण पहिल्यांदाच शौर्य म्हणजे काय, हे प्रत्यक्ष पाहिलं, हे चिनी अधिकाऱ्यांनी मान्य केलं. देविप्रसाद लिंबू यांच्या या पराक्रमाची दखल घेऊन चीनने त्यांना ‘दी टायगर ऑफ चो ला’ ही पदवी बहाल केली. दोन मोठ्या संघर्षात, तेही महिनाभरात सपाटून हार खावी लागल्याने चीनला मोठा मानसिक धक्का बसला होता. १९६२ मधील पराभवाच्या धक्क्यातून बाहेर पडण्यास भारतालाही मदत झाली. जगतसिंग यांचे शौर्य आणि भारतीय सैन्याच्या पराक्रमामुळं भारतानं  ‘नाथु ला’ व ‘चो ला’ हे दोन भाग आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळाले, याची नोंद घेणे गरजेचे आहे.

‘नाथु ला’ येथे भारतीय सैन्य असल्याने १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी चीन उघडपणानं पाकिस्तानला मदत करण्यासाठी पुढं येऊ शकला नाही. जर त्यावेळी चीनने ‘नाथु ला’ ताब्यात घेतले असते तर त्यांना सिलिगुडी भागात जो ईशान्य भारताला इतर भारताशी जोडतो त्या भागात थेट प्रवेश मिळाला असता. जर चीनने ‘नाथु ला’ ताब्यात घेतले असते, तर १९७१ मधील युद्धाच्यावेळी चीनने सिलिगुडीचा वापर करून भारतावर दबाव आणला असता. त्यामुळे पूर्व पाकिस्तानमध्ये चिनी सैन्य सहजपणे पाकिस्तानी सैन्याच्या संपर्कात आले असते आणि कदाचित हा भाग भारतापासून तुटला असता. पण १९६७ मध्ये भारतीय सैन्याने चीनविरुद्धच्या संघर्षात जो विजय मिळविला त्यामुळे  सिलिगुडी कॉरिडॉरमध्ये कसल्याच प्रकारचा हस्तक्षेप करण्यापासून चीनला रोखले गेले. त्यामुळे भारताला रणनीतीच्या दृष्टीने ते फायद्याचं राहिलं. १९६७ मधील विजय भारतासाठी दूरगामी परिणाम करणारा ठरला. यानंतर, सुमारे सहा दशके चीनबरोबर मोठा संघर्ष झाला नाही. भारत १९६२ मधील चूक परत करणार नाही आणि योग्य रणनीती आखून उत्तर देणारच, हा धडा चीनला मिळाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, १९६२ मधील भारताच्या पराभवावर अनेक पुस्तके लिहिली गेली, चित्रपट निघाले, लेख लिहिले गेले; पण १९६७ मधील तेजस्वी विजयाचा इतिहास फक्त वृत्तपत्रातील काही लेखांपुरताच मर्यादित राहिला.

(सदराचे लेखक दिल्लीतील विचार विनिमय केंद्राचे संशोधन संचालक आहेत.)

( अनुवाद : गणाधीश प्रभुदेसाई ) 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com