स्वरसंचित (अरुण काकतकर)

arun kakatkar
arun kakatkar

पं. जितेंद्र अभिषेकी यांनी महाराष्ट्राला संगीतसंचित दिलं. त्यांच्या गायनाची दोन दुर्मिळ ध्वनिमुद्रणं दूरदर्शनचे माजी निर्माते अरुण काकतकर यांच्याकडे आहेत. पुण्यात 26 तारखेपासून सुरू होणाऱ्या पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती महोत्सवाच्या निमित्तानं या दोन ठेव्यांमागची ही कहाणी.

गेल्या शतकाच्या उत्तरार्धात, संगीत क्षेत्रात- विशेषत: नाट्यसंगीत आणि भावसंगीत या दोन शाखांमध्ये आपला खास ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रामुख्यानं ज्यांचं नाव अनिवार्य आहे ते म्हणजे पं. जितेंद्र अभिषेकी. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचा नुसता परिचय झाला, तरी माझ्यासारख्या सर्वसामान्याला तो श्रीहरीच्या शंखाच्या स्पर्शाइतका स्वर्णानुभवी ठरतो; पणअशा शुभशकुनांचे संकेत ठरलेले असतांत.
मुंबईला दादरच्या चाळींतल्या माझ्या वडिलांनी भाड्यानं घेतलेल्या एका डबल रूममध्ये 1966-67मध्ये (म्हणजे 10 बाय 12 च्या खोलींत मध्ये भिंत घालून केलेल्या दोन खोल्या) मी मित्रांबरोबर राहायचो. तेव्हा शिवाजी पार्कचा आमचा ज्येष्ठ मित्र मधू आठलेच्या घरी प्रभाकर कारेकरची ओळख झाली. तो तेव्हा सुरेश हळदणकर यांच्याकडे एचएमव्हीत (कोहिनूर मिलच्या मागं, हरी महादेव वैद्य सभागृहाखाली) राहून संगीत साधना करत असे; पण समवयस्क असल्यामुळं, रात्री उशीर झाला, की माझ्याकडं यायचा.

त्या स्नेहातून मग मी त्याच्यामागं तानपुरा वाजवत फिरायला लागलो. गोव्याच्या दौऱ्यात, बोरीला त्याच्या गावी कार्यक्रम झाला आणि दुसऱ्याच संध्याकाळी तो मला घेऊन गेला मंगेशीला. तिथं एका बंगल्यात आत गेलो नि साक्षात माझ्या या स्वरदैवताचं दर्शन झालं. तो पंडितजींचा नि माझा पहिला परिचय. गोव्याच्या परंपरेनुसार गप्पांच्या ओघात काही नारळपाणी वगैरे झाल्यावर भोजन झालं. तेव्हा, माझ्या स्वप्नातसुद्धा आलं नव्हतं, की हा उत्तुंग बुद्धिमत्ता, अफाट स्वरसाधना आणि चतुरस्र प्रतिभेचा कलाकार, आपलं पुढचं जिणं किती स्वरसमृद्ध करून टाकणार आहे ते!

नंतर मुंबईत बऱ्याच वेळी भेट झाली बुवांची. स्नेह वाढत गेला. बुवांच्या लग्नात सायंकाळी पं. कुमारगंधर्व यांच्या मैफिलीला मी प्रभाकरची बाही धरून प्रवेशलो होतो.
पुढं 1978 मध्ये मी माझं कुटुंब पुण्यात हलवायचं ठरवलं आणि एक वास्तू सुनिश्‍चित केली. कुठंतरी वाटत होतं, की वास्तुशांत स्वराभिषेकानं व्हावी. त्यामुळं बुवांना विनंती केली. क्षणभर माझ्या डोळ्यांतली दुर्दम्य इच्छा न्याहाळल्यावर म्हणाले ः ""ठीक आहे.. गाऊ या एक तासभर!'' अचानक अंगावर आलेल्या अनपेक्षित होकारानं माझं नक्की काय झालं आता स्मरत नाही; पण सावरलं स्वत:ला. 30 डिसेंबर 1979ची संध्याकाळ ठरली. तेव्हा पुण्यात दूरदर्शनमधल्या कार्यक्रमांच्या निमित्तानं मला परिचित झालेले सुधीर मोघे, आनंद मोडक, अजित सोमण वगैरे सुहृदांना ही बातमी दिल्यावर सगळेच हरखून गेले.

ठरल्या दिवशी बुवा, राजा काळे, मंगेश मुळे यांना घेऊन, लॉ कॉलेज्‌ रोडवरच्या माझ्या फ्लॅटमधे दाखल झाले. अरुण आपटे पुण्यातच होता. वर उल्लेख केलेले आम्ही चौघं, शिवाय डॉ. वसंतराव पटवर्धन, तत्कालीन महानगरपालिका आयुक्त पुरुषोत्तम पाळंदे, तत्कालीन तुरुंग महानिरीक्षक वगैरे प्रतिष्ठितांसह अन्य निमंत्रितांच्या गर्दीमुळं बैठकीची खोली ओसंडून, स्वयंपाकघरातसुद्धा मंडळी बिनतक्रार बसली होती साध्या जाजमांवर. ""तासभर गाऊ,'' असं सांगितलं असल्यामुळं, आनंदनं आपल्या रेकॉर्डरसाठी सी-90 ची एक कॅसेट आणली होती- कोरी करकरीत. मैफल रंगायला लागली आणि गप्पा, गाणं, असं बुवांच अत्यंत प्रसन्न वृत्तीनं सादरीकरण सुरू झालं. "यमन'मधला तराणा.. "तदारे दानी दाssनि दिरदिर तोम तोम तना..' त्याला जोडबंदिश "किनारे किनारे किनारे दरिया', मग एक ठुमरी, मध्येच उर्दू शेर त्यांच्या अर्थासह, नंतर दुर्गा रागातली, स्वरचित विलंबित बंदिश तिच्या जन्मकथेसह, (गाण्यांच्या जन्मकथा आपण ऐकल्या आहेत.. ऐकतोय; पण बंदिशीची जन्मकथा प्रत्यक्ष रचनाकाराकडून ऐकणं म्हणजे त्यानं काळजाची कवाडं उघडून त्याच्या संवेदनशील मनात जणू प्रवेश देणंच होतं आम्हा उपस्थिताकरिता), स्वरचित रचना, अंतऱ्यातल्या सवतीमत्सरदर्शी पंक्तींवर खुसखुशीत भाष्य करत केलेली सांगता, नंतर "हे सुरांनो चंद्र व्हा' आणि अखेरीस "कैवल्याच्या चांदण्याला!'

अडीच-पावणेतीन तास कसे संपले कळलंच नाही. वास्तू सुखावून शांत झाली... बिचारा आनंद.. कॅसेट्‌च्या दोन्हीही बाजू भरल्यावर, नाइलाजानं त्याला पहिली बाजू परत लावून पुढचं मुद्रण करणं भाग पडलं, त्यामुळं पहिला अर्धा पाऊण तास आपोआप पुसला गेला; पण जो काही दीड तास हाती लागलाय तो केवळ अवर्णनीय आहे..
आज अरुण, अजित, सुधीर, मोडक आणि बुवासुद्धा.. कोणीच हयात नाहीत.. मीच का राहिलो ? माहीत नाही... छायादाते जातांत.. लव्हाळी राहतात.. तसं काहीसं? गाणं संपल्यावर बुवांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुणे स्टेशनमध्ये पॅसेंजरपर्यंत सोडून मी आणि माझी प्रिय पत्नी घरी परतलो.. एका उन्मनी अवस्थेत..
****

बॅंक ऑफ महाराष्ट्रनं तत्कालीन अध्यक्ष डॉ. वसंतराव पटवर्धन यांचं संस्कृत-साहित्याचं प्रेम आणि अभ्यास, यातूनच, मेघदूताचं मराठी रूपांतर "गीतमेघ' प्रसवलं. "गीतमेघ'चं स्वरांकन पं. जितेंद्र अभिषेकी यांनी करावं, अशी पटवर्धन यांची मनीषा होती. मी म्हटलं ः ""विचारतो! "वचने कीं दरिद्रता?'' मी आणि अजित पोचलो एका दुपारी लोणावळ्याला- अभिषेकी-गुरुकुलात.
प्राथमिक चर्चोत्तर, बुवांनी गीतांचे कागद हातात घेतले नि नीट निरखले. त्यांच्या चेहेऱ्यावरचे भाव पाहून मला लक्षात आलं. कारण बुवांचासुद्धा संस्कृतचा अभ्यास चांगला होता. ""चांगलं आहे.. करूया... पण थोडा वेळ हवा!'' पटवर्धन यांना दूरध्वनीवर बुवांचा होकार आणि अट सांगितली. ते हरखलेच. म्हणाले ः ""हवा तेवढा वेळ घ्या.. पण तुम्हीच करा म्हणावं!''
रचनांचा आराखडा तयार झाल्यावर, ""पाहा कशा वाटतात'' म्हणत बुवांनी मला ऐकवल्या. मी म्हटलं ः ""अहो, माझ्यासारख्या स्वर"मंद' माणसाला काय विचारता?'' ते म्हणाले ः ""निर्माते तुम्ही ना? प्रेक्षक श्रोत्यांची आवड-निवड तुम्ही जाणता...''

"गीतमेघ' काव्यपंक्ती स्वरांकित होत असतानाच, बुवांची एकीकडं, सुयोग्य गायक मंडळींची निवडप्रक्रिया सुरू होती... स्वत: बुवा, सर्व मूळ संस्कृत श्‍लोक आणि दोन गीतं गाणार होते. शिवाय रामदास कामत, अजित कडकडे आणि आशा खाडिलकर अशी योजना झाली. या दरम्यान एक गमतीशीर घटना घडली.
एक दिवस, नवीन रचना ऐकायला पोर्तुगीज चर्चजवळच्या बुवांच्या घरी गेलो असताना, सुरवातीलाच, त्यांच्या चेहऱ्यावर एक भलं मोठं प्रश्‍नचिन्ह वाचलं मी. म्हटलं ः ""काही तरी गडबड आहे. पटवर्धन यांची स्वप्नपूर्ती होते की नाही..''
""अहो, तुम्ही मला गीतं कोणाची म्हणून सांगितलंत?'' बुवा.
""डॉ. पटवर्धन.. वसंतराव.'' माझं सचिंत चेहऱ्यानं उत्तर.
""मग काल माझ्याबरोबर कोण चर्चा करत होतं, गीतांच्या पार्श्वभूमीबद्दल?''
क्षणभर मी कोड्यांत. मग एकदम ट्यूब पेटली ः ""अहो बुवा, ते वसंतरावच बोलत होते. तुमच्या व्यक्तिमत्त्वानं भारावून खूप नम्रभावानं आणि अतीव कृतज्ञतेनं! गैरसमजूत झाली तुमची.''
उलगडा झाला. बुवांनी मंदस्मितानं करून तानपुरा छेडायला सुरुवात केली आणि मी हुश्‍श केलं. अप्रतिम झाला कार्यक्रम. होणारच होता. ध्वनिरूपांत उपलब्ध आहे अजून माझ्याकडे...

या कार्यक्रमात ऐकण्यासारखं विशेष म्हणजे मूळ संस्कृत श्‍लोकांचे बुवांचे उच्चार. शतवार दंडवत. बुवा त्यांच्या प्रत्येक स्वतंत्र मैफिलीची सुरवात "तं भव ललाट' या संस्कृत रचनेनं करत असत, ते मी अनेकवार ऐकलंय त्या काळात.
नवीन संगीतसाधकांनी ही दोन्ही मुद्रणं ऐकायलाच हवीत. मी वाट बघतोय गेली 38 वर्षं; पण व्यर्थ. त्याआधी की नंतर, बुवांची रागमालिका चित्रमुद्रित केली मी. पुण्यातल्या एफटीआयआयच्याच्या कलागारात. सुधीर मोघे यांनी प्रत्येक रागवर्णनपर अप्रतिम छंदबद्ध अल्पाक्षरी लिहून सादरही केल्या होत्या.
दोन महिन्यांपूर्वी हे चित्रमुद्रण एफटीआयआयच्या संग्रहात मिळालं. ते रसिकांपुढं यावं म्हणून मी खूप प्रयत्न केले; पण माझ्याशिवाय कुणालाच ते मिळवण्यात रस नाही, असं लक्षात आल्यावर मी थकून आता स्वस्थ बसलोय. वर वर्णन केलेली ही दोन्हीही ध्वनिमुद्रणं मात्र यंदाच्या पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती महोत्सवात, संग्रहित करण्यासाठी शौनक यांच्याकडं देण्याचं मी निश्‍चित केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com