महाराष्ट्राचा ज्ञानमहर्षी

आज १८ एप्रिल, महर्षी धोंडो केशव कर्वे यांची १६४ वी जयंती. कर्वेंनी वयाची शंभरी गाठली तेव्हा १९५८ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान नागरी सन्मान बहाल करण्यात आला होता.
Maharshi Dhonde Keshav Karve
Maharshi Dhonde Keshav KarveSaptrang

आज १८ एप्रिल, महर्षी धोंडो केशव कर्वे यांची १६४ वी जयंती. कर्वेंनी वयाची शंभरी गाठली तेव्हा १९५८ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान नागरी सन्मान बहाल करण्यात आला होता. सरकारनं कर्वेंच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट देखील जारी केलं होतं. पुढं मुंबईतील ‘क्वीन्स रोड’चं नाव बदलून तो महर्षी कर्वे रस्ता असं करण्यात आला.

महर्षी कर्वेंचा जन्म रत्नागिरीतील मुरूड येथील एका कोकणस्थ ब्राम्हण कुटुंबात झाला. स्वतःच्या विद्वत्तेच्या बळावर त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता. कर्व्यांच्या आयुष्यात नियतीनं सगळं काही एक सूत्रबद्धरितीने घडवून आणलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महर्षींचे सुरुवातीपासूनच गणितावर प्रभुत्व होतं, १८९१ मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम करायला सुरवात केली. महात्मा जोतिराव फुले यांचे १९८० मध्ये निधन झाले, पण त्याहीआधी त्यांनी परिश्रम घेत मराठी मुलुखाची बरीच मशागत केली होती. याच भूमीमध्ये पुढे महर्षी कर्व्यांनी परिवर्तनाचा वृक्ष लावला. महर्षी कर्वेंचं सगळं आयुष्य हे आदर्श उदाहरण आणि संदेश देणारं होतं. स्वतःच्या पत्नीचं १८९१ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांनी एका विधवेशी विवाह केला. या विवाहानंतर महर्षी कर्व्यांना खूप सामाजिक विरोध आणि टीका देखील सहन करावी लागली. एवढं होऊन देखील महर्षी कर्वे त्यांच्या निश्‍चयापासून तसूभर देखील ढळले नाही. ख्यातनाम लेखक वसंत कानेटकरांनी महर्षी कर्व्यांच्या जीवनावर आधारित ‘हिमालयाची सावली’ हे महानाट्य १९७२ मध्ये लिहिलं. यामध्ये महर्षींची तुलना ही हिमालयासोबत केली होती. ‘‘ तुम्ही जसजसे उंच शिखरावर जायला लागता तसतसे एकाकी होत जाता. अशावेळी तुम्हाला खडतर वाऱ्याचा देखील सामना करावा लागतो.’’ हे नाट्यवचन कर्वेंच्या आयुष्याला तंतोतंत लागू पडते.

महर्षी कर्व्यांमध्ये मला एक विरक्त सुधारक दिसतो, त्यांची तुलनाच करायची झाली तर ती रोमन विचारवंत सेनेकासोबत करावी लागेल. दोन हजार वर्षांपूर्वी त्यालाही अशाच स्थितीचा सामना करावा लागला होता. या विरक्तपणाला चार गोष्टींचा आधार आहे. यामध्ये धैर्य, न्याय, विवेक आणि स्वनियंत्रण आदी गोष्टींचा समावेश होतो. महर्षी कर्व्यांमध्ये या चारही गुणांचा समुच्चय दिसून येतो. त्याकाळी समाजाचा विरोध स्वीकारणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नव्हती. तुम्ही जेव्हा अशा सामर्थ्यशाली रचनेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करता तेव्हा मात्र संघर्ष आणखी धारदार बनतो.

भारताच्या गुलामगिरीची मुळं देखील याच सामाजिक दोषामध्ये दडलेली आहेत, येथे परकी आक्रमकांच्या सामर्थ्याला महत्त्व देण्याचे काही कारण नाही. सत्तेमध्ये बसलेली मंडळी ही लोकांप्रती अधिक क्रूर होत गेली. या अमानवीय आचरणाचा मोठा फटका महिलांना देखील बसला.

महर्षी कर्वे यांनी १८९३ मध्ये विधवा विवाह संघटनेची स्थापना केली त्यानंतर १८९५ मध्ये त्यांनी त्यांच्यासाठी पुनर्वसन केंद्र देखील उभारलं. यामुळे सामाजिक अत्याचारांनी आधीच पिचलेल्या स्त्रियांना मोठा आधार मिळाला. सेनेकाचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, ‘‘ जी मंडळी भूतकाळ विसरतात, वर्तमानाकडे दुर्लक्ष करतात आणि भविष्याला घाबरतात त्यांच्यासाठी जीवन हे फार लहान आणि उद्विग्न करणारे असते.’’ महर्षी कर्वे यांनी त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा भूतकाळात जे घडलं ते सुधारण्यासाठी आणि महिलांसाठी एक चांगलं भविष्य घडविण्यासाठी खर्च केला.

महर्षी कर्वे १९१४ मध्ये मुंबईला आले. येथे येण्यापूर्वीच त्यांनी महिलांसाठी देशातील पहिले विद्यापीठ काढण्याचा संकल्प केला होता. आग्नेय आशियातील ही अशा प्रकारची पहिलीच संस्था होती. उद्योगपती विठ्ठलदास ठाकरसी यांनी या प्रकल्पासाठी पंधरा लाखांचे अर्थसाहाय्य केले. त्याकाळी ही खूप मोठी रक्कम होती. पुढे याच विद्यापीठाला त्यांच्या मातुःश्री श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ असे नाव देण्यात आले. या विद्यापीठाचं गाणंही बरंच काही सांगतं. ‘‘ जागृत महिला ही अमर्याद सामर्थ्याचा स्रोत असते. आम्ही हे जाहीर करतो की सगळं जग हे आमचं कुटुंब आहे. आम्ही हतबल अथवा सामर्थ्यहिन नाहीत.’’ अशा ओळी या गाण्यात आहेत. महर्षी कर्वेंचं ‘आत्मवृत्त’ मराठी आणि इंग्रजीमध्ये चांगलंच गाजलं.

अवघ्या दोनशे पानांमध्ये त्यांनी स्वतःला काय सांगायचंय हे अगदी स्पष्टपणे नोंदवलं आहे. त्याकाळी एखादा विद्यार्थी काट्याकुट्यांनी भरलेला डोंगरदऱ्यातील शंभर मैलांचा रस्ता तुडवत प्रवेश परीक्षा देण्यासाठी येतो याची आजचा विद्यार्थी कल्पनाच करू शकत नाही. भर पावसाळ्यामध्ये साताऱ्यातील डोंगररांगातून असा प्रवास करणे मोठे खडतर काम असते. एवढं करूनही त्याला ती परीक्षाच देता येत नाही कारण त्यानं वयाची सतरा वर्षे पूर्ण केलेली नसतात.

आइन्स्टाईन यांची भेट

महर्षी कर्वेंनी जेव्हा वयाची सत्तर वर्षे पूर्ण केली तेव्हा पुण्यातील रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले. याचवेळी त्यांना महर्षी ही उपाधी देखील मिळाली. कर्वेंनी अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि दक्षिण आशिया या खंडांचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेक महनीय व्यक्तींची भेट घेतली तसे स्त्री शिक्षणासाठी निधी देखील गोळा केला. बर्लिनमध्ये त्यांनी संशोधक अल्बर्ट आइन्स्टाईन यांची देखील भेट घेतली होती. या दोघांमध्ये त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील आज कोठेही सापडत नाही पण आइन्स्टाईन यांच्यासारख्या व्यक्तीला त्यांच्यामध्ये नक्कीच एका स्वयंसिद्ध पुरुषाची लक्षणे आढळून आली असतील. भारतामध्ये महिलांत जाणीव जागृती करण्यासाठी महर्षी कर्वे यांनी खूप मेहनत केली. विशेष म्हणजे त्यांनी हे सगळं न थकता केले. महर्षी कर्व्यांनी शंभर वर्षांपूर्वी ज्या महिला विद्यापीठाचं रोपटे लावलं होतं त्याचा आता वृक्ष झाला आहे. या विद्यापीठाचे चार कॅम्पस उभे राहिले आहेत. त्यात चर्चगेट, सांताक्रुझ- जुहू, पुणे आणि रायगडमधील श्रीवर्धन येथील संस्थांचा समावेश होता. यामध्ये ३९ विभाग, १३ संस्था आणि त्याच्याशी संलग्न १६६ महाविद्यालयांचा समावेश होतो. या विद्यीपाठानं प्रज्वलित केलेल्या ज्ञानरूपी ज्योतीचा प्रकाश सर्वत्र पसरला आहे.

(सदराचे लेखक वैज्ञानिक आणि विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत )

(अनुवाद : गोपाळ कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com