बोलायची हिम्मत नाही...

अरविंद जगताप saptrang@esakal.com
Sunday, 7 February 2021

गोष्टी गाण्यांच्या
एकदा फिरत असताना एक मित्र म्हणाला, कितीतरी शेतकरी हातात काठी घेऊन नुसते बसलेले दिसतात माळावर. काही काम का करत नाहीतं ? त्याला बिचाऱ्याला ते शेतकरी गुरं सांभाळताहेत हेच लक्षात आलं नव्हतं. असा प्रत्येकाचा एक चष्मा आहे. त्या चष्म्यातून तो शेतकऱ्याकडे बघत असतो.

एकदा फिरत असताना एक मित्र म्हणाला, कितीतरी शेतकरी हातात काठी घेऊन नुसते बसलेले दिसतात माळावर. काही काम का करत नाहीतं ? त्याला बिचाऱ्याला ते शेतकरी गुरं सांभाळताहेत हेच लक्षात आलं नव्हतं. असा प्रत्येकाचा एक चष्मा आहे. त्या चष्म्यातून तो शेतकऱ्याकडे बघत असतो. त्यामध्ये खूपसं चित्रपट आणि कवितांमधून, खेड्यातल्या शेतीचं खूप रोमॅन्टिक वर्णन केलेलं असतं. हिरव्यागार पिकातून फिरणारे नायक नायिका, तुडुंब भरलेल्या विहिरी, तलाव, नद्या आणि भले मोठे वाडे. हे सगळं पडद्यावर बघणं वेगळी गोष्ट आहे. पण जरा दोनचार गावातून चक्कर मारली तरी खरं चित्र डोळ्यासमोर येतं. पण परिस्थिती माहीत असूनही किती लोक बोलतात ? मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण मधल्या शेतकऱ्याची व्यथा थोड्याफार फरकानं सारखीच आहे. त्यात आता शेतकरी आणि शेतकरीविरोधी असे दोन गट झालेत उघड उघड. आधी ज्याला आपण इंडिया आणि भारत म्हणायचो. 

शेतकरी कुठल्याही सरकारच्या काळात बोलू शकत नव्हता. आधी त्याला आपलं म्हणणं नीट मांडता येत नव्हतं. मग शेतकऱ्याला विरोधकांनी गोळा केलं. अन्याय समजवून सांगितला. बोलायला प्रवृत्त केलं. शेतकरी बोलायचं ठरवू लागला. आणि नेमके जे सत्तेत होते ते विरोधात गेले. जे विरोधात होते ते सत्तेत आले. आपल्याला एकेकाळी बोला बोला म्हणणारे शांत बसा म्हणताहेत हे बघून शेतकरी हैराण झाला. एकेकाळी आपल्याला आपण कसे सुखात आहोत हे सांगणारे आज आपल्याला आपल्यावर अन्याय होतोय हे सांगताहेत हे बघून तो चक्रावून गेला. विरोधक बोलतात किंवा सत्ताधारी बोलतात. खरा शेतकरी कुठे बोलताना दिसतोय? आणि कोण त्याचं ऐकताना दिसतयं? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेतकरी भोळा नसतो. असहाय नसतो. पण त्याची सगळी ताकद त्याच्या शेतात खर्च होत असते. त्यामुळे त्याला त्याचा माल विकण्याचं गणित सोडवता येत नाही. त्याला अंबानीच्या मोबाईल डाटासारखा वर्षभर माल मोफत देता येत नाही. कारण त्याला शेजारच्या शेतकऱ्याला संपवायचं नसतं. शेतकरी एकमेकांच्या शेतात जनावरं घुसले म्हणून भांडायचे. आता जनावरं राहिले नाहीत फार. पण म्हणून शेतात व्यापारी कसे शिरू द्यायचे ? आणि त्यानं फायदा होणार आहे का? 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जर फायदा होणार आहे तर हजारो शेतकरी दिल्लीला गेले काही महिने आंदोलन का करताहेत ? एवढ्या महिन्यात एवढे टीव्ही चॅनेल्स आणि एवढ्या लोकांच्या मुलाखती ऐकल्या. पण भल्या भल्या तज्ज्ञांना अजून ठरवता येत नाही की कायदा फायद्याचा आहे का तोट्याचा? आज हा अमुक बोलतोय. उद्या तो तमुक बोलतोय. विश्वास ठेवायचा कुणावर? जी गोष्ट भले भले लोक सोप्या भाषेत सांगू शकत नाहीत ती शेतकरी कसा समजून घेणार ? लोकांना आपला फायदा समजत नाही असं वाटत असेल तर आपली समजून सांगायची पद्धत चुकीची आहे हे मान्य केलं पाहिजे. 

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यायचा नसला तर नका देऊ. पण शेतकरी देशद्रोही आहे अशी मांडणी करायची गरज नाही. चार दोन लोकांमुळे शेतकरी बदनाम करायची गरज नाही. हरभऱ्याच्या शेतात गेल्यावर कशी खाज सुटते, उसातून फिरताना कसे पात्याचे वार होतात, कापूस वेचताना काय हाल होतात किंवा आंबा उतरवताना काय कष्ट असतात हे आपल्याला माहीत नसेल तर त्या विषयावर शहाणपणा शिकवायची गरज नसते. शेतकरी कधी या देशात एवढे कमी लोक का कर भरतात म्हणून चर्चा करत नाही. मोठमोठे महामार्ग बनतात. प्रकल्प येतात. अचानक लक्षात येतं की त्या जमिनी एखादं दोन वर्षाआधी व्यापाऱ्यांनी, सत्तेतल्या लोकांच्या दलालांनी आधीच घेऊन ठेवल्यात. मोबदला त्यांना मिळतो. शेतकरी काही बोलू शकत नाही. 

एकेकाळी खुडूक म्हणून विकलेली कोंबडी सोन्याचं अंडे देणार होती याची जाणीव होते तेंव्हा आतल्या आत किती वेदना होत असतील त्याला. पण पिढ्या न पिढ्या हे सुरू आहे. या विषयावर सात आठ वर्षापूर्वी एक पत्र लिहिलं होतं. कवितेसारखं. त्याला अवधूत गुप्ते यांनी चाल लावली. आणि स्वतःच गायलं. आजही ती चाल, तो आवाज अस्वस्थ करतो. 

पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही
पावसाची वाट बघण्या आता काही गंमत नाही
माफ कर पारू मला, नाही केल्या पाटल्या
मोत्यावानी पीकाला ग नाही कवड्या भेटल्या
‘‘चार बुकं शिक’’ असं कसं सांगू पोरा
‘‘गहाण ठेवत्यात बापाला का?’’ विचार कोणा सावकारा
गुरांच्या बाजारी हिथं माणसा मोल नाही
मी नाही बोललो पण पोरा तू तरी बोल काही
पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही

ढवळ्या पवळ्या माफी द्यावी तुम्हा लय पिळून घेतलं
पण कोरड्या जमिनीनं सारं पीक गिळून घेतलं
नाही लेकरा भाकर, नाही गुरा चारा
टिपूस नाही आभाळात, गावंच्या डोळ्यात धारा
कर्जापायी भटकून शिरपा गेला लटकून
दारुपायी गेला असं लिवलं त्यांनी हटकून
गडी व्हता म्हराठी पन राजाला किंमत नाही

पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही
आई तुझ्या खोकल्याचा घुमतो आवाज कानी
नाही मला जमलं ग तुझं साधं औषध-पाणी
मैलोमैल हिथं कुठं दवाखाना न्हाई
रोगर मात्र सहजासहजी कुटं बी गावतंय्‌ आई
शेतात न्हाई कामाचं ते, जीव द्याया आलं कामी
माझ आन् सरकारचं वझं आता व्हईल कमी
मरता मरता कळलं हिथं शेतकर्‍या किंमत न्हाई
पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही....

बोलायची हिम्मत नाही हे सांगणारं हे गाणं. पण शेतकऱ्याला कायम स्वतःसाठी बोलायची हिंमत मिळो यासाठी बोललं पाहिजे. जातीसाठी बोलणारे खूप आहेत. शेतीसाठी बोललं पाहिजे.
(सदराचे लेखक गीतकार आणि पटकथाकार आहेत)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arvind Jagtap Writes about Farmer Agriculture