बदलत्या सुजाण पालकत्वाचं गाईड (अरविंद जोशी)

book review
book review

मुलांचे आई-बाबा होणं आणि त्यांचं सुजाण पालक होणं यात बराच फरक आहे, ही कल्पना आता समाजात चांगलीच स्वीकारली गेली आहे. मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. त्यामुळे ते मोठं होत जातं तेव्हा त्याच्यावर आपल्या कल्पना लादता कामा नयेत, तर त्याच्या भावना विचारात घेत त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हीही कल्पना आता पालकांना मान्य झाली आहे. मात्र, या कल्पना स्वीकारताना त्या पुरेशा परिपक्वतेनं आपल्याशा केल्या गेल्या आहेत का, असा प्रश्‍न पडतो. कारण पालकत्व हे एक कौशल्य आहे, हे मान्य करतानाच त्याचा अतिरेक होताना दिसत आहे.

मुलांना फारच जपलं जात आहे. त्यांना सतत आपल्या नजरेखाली ठेवणं, त्यांना लहानसहान कामात मदत करणं, त्यांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून मर्यादेपेक्षा अधिक काळजी घेणं असे प्रकार घडायला लागले आहेत. मुलगा किंवा मुलगी दहावीच्या परीक्षेला जाते तेव्हा त्यांचा नंबर शोधायला जाणारे पालक हे अशा "फाजील पालकत्वा'चं उदाहरण होय. पालकत्वाच्या नावाखाली आपण मुलांना परावलंबी करीत आहोत, हे या लोकांना कळतच नाही. सुजाण झालेल्या पालकांना आता पालकत्वाच्या पुढच्या "यत्ते'त जाण्याची आणि पालकत्व अधिक खोलात जाऊन शिकण्याची गरज आहे. पालकांच्या प्रबोधनाचं सुमारे चार दशकं काम केलेल्या सोलापूरच्या मानसशास्त्रज्ञ अलका काकडे यांनी ही गरज ओळखून,- "मुलांच्या अडचणी सोडवताना' हे पुस्तक लिहिलं आहे.

अलका काकडे यांनी हे पुस्तक उमलत्या मुलांच्या उमलत्या पालकांना अर्पण केलं आहे. ही अर्पणपत्रिका या पुस्तकाच्या वेगळ्या स्वरूपावर प्रकाश टाकणारी आहे. मुलं तर उमलतच असतात; पण त्यांना वाढवताना पालकांनाही नवनव्या कल्पना समजून घ्याव्या लागतात कारण, मुलांची दुनिया बदलली आहे. आपण लहान असताना ज्या वातावरणात राहत होतो, ते वातावरण आता राहिलेलं नाही. नवी माध्यमं, नवं तंत्रज्ञान, स्पर्धेची तीव्र भावना, लहान वयातच मोठं होणं, करिअरबाबतची अतिदक्षता, बदलतं शिक्षण, मुलांचं स्मार्ट होणं अशा कितीतरी नव्या गोष्टींनी मुलांचं भावविश्व व्यापलं गेलं आहे. अशा या मुलांचे पालक होताना पालकांनाही जाणीवपूर्वक उमलावं लागत आहे. तेव्हा आता पालकत्वाचा अभ्यासक्रमही बदलला आहे. तो आत्मसात करताना पालकांच्याही मनात अनेक प्रकारचे गोंधळ निर्माण होत आहेत. या साऱ्या समस्यांना कसं तोंड द्यावं याचं मार्गदर्शन काकडे यांनी या पुस्तकातून केलं आहे.
हे मार्गदर्शन करताना काकडे यांनी मुलाच्या जन्मापासून ते यौवनात पदार्पण करेपर्यंतच्या सगळ्या अवस्थांतल्या वर्तनाचा मागोवा घेतला आहे आणि त्या त्या अवस्थेत पालक म्हणून काय केलं पाहिजे, याचे मार्गदर्शन केलं आहे. मूल असंच का वागतं, असा प्रश्‍न पालकांना पडतो आणि त्यामागचं कारण समजत नाही; पण काही वेळा त्याच्या वागण्याचा संबंध त्याला जन्म घेताना झालेल्या त्रासाशी असतो, हेही लक्षात ठेवलं पाहिजे, हा नवा विचार या पुस्तकात मांडला आहे. म्हणजे अपत्यसंभवापासून ते तारुण्यात पदार्पण करण्यापर्यंत मुलं आणि मुली कोणत्या ताण-तणावांतून मार्ग काढत वाढत असतात, याचं छान वर्णन काकडे यांनी केलं आहे.
या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणात विषयाचं प्रतिपादन केल्यानंतर लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या सूचना ठळकपणे आणि थोडक्‍यात चौकटीत दिल्या असल्यानं पुस्तक फार उद्बोधक झालं आहे. एकदा पुस्तक वाचून झाल्यानंतर ते समोर ठेवून अधूनमधून या चौकटींवर नजर टाकली तरीही पालकांना चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं. या विषयावर काकडे यांनी दैनिक "सकाळ'मध्ये वर्षभर सदर चालवलं होतं. त्या सदरातल्या लेखांचा हा संग्रह आहे. पुस्तकाची वाचनीयता मुखपृष्ठानं आणि आतल्या रेखाचित्रांनी वाढली आहे. हेमंत कपुरे यांना त्याचं श्रेय जातं.

पुस्तकाचं नाव : मुलांच्या अडचणी सोडवताना
लेखिका : अलका काकडे
प्रकाशक : सुविद्या प्रकाशन, सोलापूर (0217- 2722510)
पृष्ठं : 104
मूल्य : 120 रुपये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com