मेट्रो छोट्या शहरांसाठीही !

केंद्र सरकारने शहरांच्या विकासासाठी मेट्रो रेल्वे हे साधन वापरण्याचा निर्णय घेतला आहे आणि देशातल्या काही प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वेच्या कामांना प्रारंभही झालेला आहे.
Metro
MetroSakal

केंद्र सरकारने शहरांच्या विकासासाठी मेट्रो रेल्वे हे साधन वापरण्याचा निर्णय घेतला आहे आणि देशातल्या काही प्रमुख शहरांमध्ये मेट्रो रेल्वेच्या कामांना प्रारंभही झालेला आहे. मात्र या योजनेतून सोलापूर, नांदेड, अमरावती अशा छोट्या शहरांना म्हणजेच ‘ बी ग्रेड’ शहरांना वगळलेले आहे. असे असले तरी अशा छोट्या शहरातसुद्धा मेट्रो रेल्वे चालवता येऊ शकते असा दावा करून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेषज्ज्ञ सुनीलकुमार शिंदे यांनी मेट्रो रेल्वेची आगळीवेगळी योजना तयार केली आहे. ते मूळचे सोलापूरचे राहणारे असल्यामुळे त्यांनी आपला हा नवा पॅटर्न सोलापूर शहराला डोळ्यासमोर ठेवून तयार केला असून तो नुकताच सादर केला आहे. त्यांची ही योजना सोलापूर मेट्रो या नावाने तयार केलेली असली तरी ती प्रामुख्याने बी ग्रेड शहरांसाठीची मेट्रो सेवा आहे.

सुनीलकुमार शिंदे यांनी गेली दोन ते तीन वर्षे या योजनेचा तपशीलवार अभ्यास केला आहे. त्यांचे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरात आणि अभियांत्रिकीचे शिक्षण सांगलीच्या वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीतून झालेले आहे. व्यवसायाच्या निमित्ताने जगभर फिरताना त्यांना अनेक शहरांचा विकास मेट्रो रेल्वेमुळे कसा झाला हे पहायला मिळाले. त्यामुळे आणि विशेषत: अमेरिकेतल्या शिकागो शहरातल्या मेट्रो सेवेमुळे ते प्रेरित झाले. सोलापूरचा विकास मेट्रोमुळे कसा होईल याचा विचार करताना त्यांना शहरासोबतच लगतचा ग्रामीण भागही मेट्रोला जोडण्याची कल्पना सुचली. त्यातूनच सोलापूर मेट्रो हा वेगळा पॅटर्न त्यांनी तयार केला आहे.

या सोलापूर मेट्रोने सोलापूर शहर पंढरपूर, अक्‍कलकोट, तुळजापूर, एनटीपीसी, बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिऱ्हे, सोरेगाव, ही सात केन्द्रे जोडली जातील. १०१ मेट्रो स्थानके आणि सोलापुरातला वर्तुळाकार मुख्य मार्ग अशी ही सोलापूर मेट्रो २२० किलो मीटर लांबीची असेल. या मेट्रोमुळे शहराचा आणि लगतच्या ग्रामीण भागाचाही विकास होईल. सोलापूर मेट्रो ही केवळ सोलापूर शहरासाठी नाही. तो एक पॅटर्न आहे आणि देशभरातल्या सोलापूरसारख्या कोणत्याही बी ग्रेड शहराच्या विकासाला चालना देणारा आहे.

पुणे आणि नागपुरात आता रस्ते तीन मजली झाले आहेत आणि तिसऱ्या मजल्यावरून मेट्रो रेल्वे चालवली जात आहे. सोलापूर मेट्रो तशीच असेल म्हणजे तिच्यासाठी वेगळी जमीन संपादन करावी लागणार नाही. सोलापुरात होणार असलेल्या दोन उड्डाण पुलांच्या रचनेत काही बदल मात्र करावे लागतील.

या योजनेत शिंदे यांनी, कार्गो मेट्रोची नवी संकल्पना मांडली आहे. म्हणजे या मार्गावर माल वाहतूकही करता येईल. त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातला शेतीमाल शहरात सहजतेने आणता येईल. आगामी काळात सूरत ते चेन्नई हा महामार्ग सोलापूरहून जाणार आहे. तसेच हैदराबाद ते मुंबई ही बुलेट ट्रेनही सोलापूर जिल्हतून जाणार आहे. सोलापूर मेट्रोच्या मार्गावरची सगळी गावे मेट्रोमुळे वेगवान वाहतुकीच्या या दोन साधनांशी जोडली जातील.

या मेट्रोची रचना आणि मार्ग असा वैशिष्ट्यपूर्ण आहे की, मार्गावर स्थानक असलेल्या प्रत्येक गावाहून या २२० किलो मीटर मार्गावरच्या कोणत्याही गावाला सहजतेने आणि वेगाने जाता येईल. शिवाय प्रत्येक स्थानकावर इलेक्‍ट्रिक वाहनाची सेवा बहाल केली जाईल ज्यामुळे स्थानकापासूनचे पाच किलो मीटर अंतरावरचे कोणतेही गाव मेट्रोच्या कॅचमेंट एरियात येईल. लास्ट माईल कनेक्‍टिव्हिटीच्या तत्त्वाने मोठा भाग मेट्रोशी जोडला जाईल.

या मार्गावर २२० किलोमीटर लांबीची समांतर जलवाहिनी टाकण्याचीही योजना शिंदे यांनी आखली आहे. मेट्रोचे चलनवलन प्रामुख्याने सौरऊर्जेवर होईल. मार्गावर २४ तास वाय फाय सेवा आणि विकसित स्थानके, त्यावरची अद्ययावत पार्किंग सेवा, शहराच्या मेट्रो मार्गावर अनेक विकास केन्द्रे अशी काही वैशिष्ट्ये त्यांनी स्पष्ट केली. सोलापूर मेट्रोच्या मार्गांना वैशिष्टपूर्ण नाव देण्याची कल्पनाही या योजनेत आहे.

सोलापूर मेट्रोची रचना आणि योजना केन्द्र सरकारच्या मेट्रोधोरणांशी सुसंगत असल्यामुळे या योजनेला केन्द्राची मंजुरी आणि मदत मिळण्याची खात्री आहे. ही योजना जगातल्या कोणत्याही बी ग्रेड शहराची मेट्रो योजना असेल. तिचे डबे, रूळ आणि अनेक प्रकारची यंत्रसामुग्री वेगळ्या प्रकारची असल्याने त्यांचे उत्पादन करण्याचा नवाच उद्योग भारतात उदयाला येईल. शिवाय अनेक शहरांना तिचा पुरवठा आपण करू शकू, त्यातून मोठी रोजगार निर्मिती होईल. या योजनेची पूर्तता करताना अनेक नवे विक्रम होणार आहेत. ही जगातली २२ व्या क्रमांकाची तसेच भारतातली तिसऱ्या क्रमांकाची लांब अंतराची मेट्रो रेल्वे असेल. ती वर्षातले ३६५ दिवस आणि २४ तास सेवा देणारी मेट्रो असेल.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून रेल्वे कारभाराचे व त्यातील तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com