शेतकऱ्यांचे मित्र (अशोक गव्हाणे)

ashok gavhane
ashok gavhane

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळं जगणं सोपं होत असताना शेतीलाही ते हात देत आहे. शेतीविषयक माहिती, सल्ले, बातम्या, बाजारभाव अशा गोष्टींसाठी अनेक ऍप्स आणि वेबसाइट्‌स उपलब्ध आहेत. त्यांच्यावर एक नजर...

शहरी भागाप्रमाणं आता मोबाईल आणि इंटरनेटचा वापर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोबाईल कंपन्यांनीही वेगवेगळ्या सुविधा देऊ केल्यानं प्रत्येकाच्या हातात आता स्मार्ट फोन दिसू लागला आहे. शेतकरी वर्गही आता स्मार्ट फोन थोड्याफार प्रामाणात हाताळू लागला आहे. संपूर्ण जग स्मार्ट होत असताना शेतकऱ्यांनीही स्मार्ट होणं गरजेचं आहे. अधुनिक गोष्टींचा वापर करून शेतकऱ्यांनी शेती करायला हवी. एकीकडं सगळ्याच गोष्टी स्मार्ट होत असताना शेतकऱ्यांनी तरी मागं का राहावं? शेतकऱ्यांनीही आता स्मार्ट होणं गरजेचं आहे. आता शेतीसंबधित वेगवेगळी माहिती देणारी अशीच ऍप्स आणि वेबसाइट्‌सही उपलब्ध आहेत. त्याद्वारे शेतकरी वेगवेगळी माहिती मिळवू शकतात; तसंच त्या माहितीचा वापर करून शेतीत वेगवेगळे प्रयोगदेखील करू शकतात. अशाच काही ऍप्स आणि वेबसाइटविषयी आपण माहिती घेऊ या.

कृषी मित्र (Krishi mitra) : हे ऍप शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या ऍपद्वारे शेतकऱ्यांना आपल्या तालुक्‍यातली खतं, बियाणी, औषधविक्रेत्यांची माहिती मिळू शकते. या माहितीच्या आधारे शेतकरी घरबसल्या विक्रेत्यांची, उपलब्ध खत आणि बियाणांची माहिती घेऊ शकतात. हे ऍप mahaagriiqc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एम-किसान भारत (mKisan India) : या ऍपद्वारे शेतीसाठी कृषी हवामानविषयक उपयुक्त सल्ले दिले जातात. हवामानात सातत्यानं होणाऱ्या बदलांमुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. त्यामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सल्ल्याची गरज असते. या ऍपद्वारे हवामानबदलामुळं होणाऱ्या नुकसानापासून शेतकऱ्यांना उपयुक्त सल्ले दिले जातात. हे ऍप गुगल प्ले-स्टोअर, फार्मर पोर्टल, एम-किसान पोर्टलवर उपलब्ध आहे.

किसान सुविधा (Kisan Suvidha) : हवामान, कृषी निविष्ठा, व्यापारी, बाजारभाव, पीकसंरक्षण आणि तज्ज्ञांचा सल्ला आदींबाबत माहितीसाठी शेतकरी या ऍपद्वारे मागणी करू शकतात. हे ऍप गुगल प्ले-स्टोअर, फार्मर पोर्टल, एम-किसान पोर्टलवर सध्या उपलब्ध आहे.

क्रॉप इन्शुरन्स (Crop Insurance) : सध्या शेतकरी सातत्यानं पीकविमा काढत आहेत. त्याविषयीच्या माहितीसाठी हे ऍप उपयुक्त आहे. पीकविमा कधी भरायचा, त्याची शेवटची तारीख काय, तो कसा भरायला हवा आदी माहिती या ऍपद्वारे शेतकऱ्यांना मिळू शकते. हे ऍप गुगल प्ले-स्टोअर, फार्मर पोर्टल, एम-किसान पोर्टलवर उपलब्ध आहे.

डिजिटल मंडी भारत (Digital Mandi India) : सध्या शेतकऱ्यांना आपल्या मालाला काय बाजारभाव मिळायला हवा, याचा अंदाज नसतो. परंतु या ऍपद्वारे शेतकरी घरबसल्या तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय बाजार समित्यांचे शेतमालाचे दर काय चालू आहेत याचा अंदाज घेऊ शकतो. हे ऍप गुगल प्ले-स्टोअर, फार्मर पोर्टल, एम-किसान पोर्टलवर उपलब्ध आहे.

पशुपोषण (Pashu Poshan) : शेतीला पूरक आणि जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडं पाहिलं जातं. प्रत्येक शेतकऱ्याचं दुग्धव्यवसायाकडं लक्ष असतं. त्यामुळं दुग्धव्यवसायही स्मार्ट पद्धतीनं करता येऊ शकतो. "पशुपोषण' हे ऍप घेऊन शेतकरी जनावरांच्या आहाराविषयी; तसंच त्यांच्या आजाराविषयी योग्य मार्गदर्शन घेऊ शकतो. हे ऍप गुगल प्ले-स्टोअर, फार्मर पोर्टल, एम-किसान पोर्टलवर उपलब्ध आहे.

कॉटन (कापूस) (cotton (Kapus) : या ऍपद्वारे शेतकऱ्यांना कापूसलागवड तंत्रज्ञानाची योग्य माहिती मिळवता येते. शेतकरी या ऍपच्या मदतीनं सुधारित पद्धतीनं कापूस लागवड करू शकतो; तसंच अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. हे ऍप गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे.
एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) : पिकांवरची कीड हा विषय शेतकऱ्यांसाठी चिंतेचा आहे. त्यामुळं या ऍपद्वारे शेतकरी मुख्य पिकावरच्या कीडव्यवस्थापनाची माहिती मिळवून पिकावरच्या किडीचं योग्य व्यवस्थापन करू शकतो. हे ऍप गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहे.

पीक पोषण (Plant nutrition) : या ऍपद्वारे शेतकरी पिकांसाठी अन्नद्रव्याची गरज, आवश्‍यकता, कमतरतेची लक्षणं, अन्नद्रव्यं, संवेदनशील पिकं, सूक्ष्म अन्नद्रव्यं इत्यादींबाबत योग्य ती माहिती मिळवून उत्पादन घेऊ शकतो. हे ऍप गुगल प्ले-स्टोअरवरून डाऊनलोड करता येतं.

इफ्को किसान (IFFCO Kisan) : या ऍपद्वारे हवामानाचा अंदाज, वेगवेगळ्या बाजार समित्यांतल्या धान्यांचे भाव, तज्ज्ञांचा सल्ला, शेतीविषयक बातम्या आदी माहिती उपलब्ध होऊ शकते. हे ऍप गुगल प्ले-स्टोअरवरून डाऊनलोड करता येतं.

ऍग्रोवन (agrowon) : हे "सकाळ माध्यमसमूहा'च्या "ऍग्रोवन' वृत्तपत्राचं ऍप आहे. या ऍपद्वारे शेतकऱ्यांना विविध भागातील शेतीविषयक बातम्या वाचायला मिळतात. शेतकऱ्यांना विविध भागांतल्या शेतीविषयक ताज्या घडामोडींचा अंदाज घेता येतो. हे ऍप गुगल प्ले-स्टोअरवरून डाऊनलोड करता येतं.

शेकरू (Shekaru) : या ऍपद्वारे शेतकऱ्यांना विविध भागांतल्या शेतीविषयक प्रदर्शनाची माहिती मिळवता येऊ शकते; तसंच विविध भागांत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाविषयीही माहिती मिळवता येऊ शकते. हे ऍप गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहे.

या ऍपव्यतिरिक्त अनेक खासगी ऍप्स आणि संकेतस्थळावर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती उपलब्ध आहे. त्या माहितीच्या आधारे शेतकरी शेतीला स्मार्ट बनवू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com