सर्व(सा)मान्य डिझाईन (आश्विनी देशपांडे)

आश्विनी देशपांडे ashwini@elephantdesign.com
रविवार, 24 जून 2018

"आयकिया', "हेमा', "मुजी'... असामान्य लोकप्रियता आणि व्यावसायिक यश मिळवणाऱ्या या तिन्ही ब्रॅंड्‌समध्ये समान विचारसरणीचा एक धागा आहे. या कंपन्यांनी डिझाईनची मदत घेऊन, ग्राहकांच्या गरजा आणि सामान्य राहणीमानाला अनुसरून रोजच्या वापरातल्या अतिशय उपयुक्त; पण साध्या वस्तू सुबक पद्धतीनं आणि वाजवी दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. साधेपणाच्या तत्त्वांशी खंबीर राहून सर्वसामान्य ग्राहकांसाठी त्यांनी सातत्यानं काहीतरी खास असं सादर केलं आहे.

"आयकिया', "हेमा', "मुजी'... असामान्य लोकप्रियता आणि व्यावसायिक यश मिळवणाऱ्या या तिन्ही ब्रॅंड्‌समध्ये समान विचारसरणीचा एक धागा आहे. या कंपन्यांनी डिझाईनची मदत घेऊन, ग्राहकांच्या गरजा आणि सामान्य राहणीमानाला अनुसरून रोजच्या वापरातल्या अतिशय उपयुक्त; पण साध्या वस्तू सुबक पद्धतीनं आणि वाजवी दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. साधेपणाच्या तत्त्वांशी खंबीर राहून सर्वसामान्य ग्राहकांसाठी त्यांनी सातत्यानं काहीतरी खास असं सादर केलं आहे.

केवळ डिझाईनच्या बळावर वर्षानुवर्षं आपलं वेगळेपण टिकवून ठेवणारे, अफाट लोकप्रिय झालेले आणि आर्थिकदृष्ट्याही यशस्वी असे काही ब्रॅंड्‌स जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत; पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, डिझाईनच्या अनुषंगानं विकसित झालेली, व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी सिद्ध झालेली विचारसरणी. ज्या व्यवसायाच्या केंद्रभागी डिझाईन असतं, तिथं अर्थातच ग्राहकांचा- म्हणजेच सेवेचा आणि उत्पादनाचा वापर करणाऱ्या व्यक्तींचा - विचार केंद्रवर्ती असतो.

38 देशांत तीनशेंहून अधिक भल्यामोठ्या शोरूमचं जाळं असलेल्या आयकिया कंपनीची वार्षिक उलाढाल कित्येक हजार अब्ज रुपयांच्या घरात आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी त्यांनी एक ठाम विचारपद्धती वापरायला सुरवात केली. ती म्हणजे आयकियात उत्पादित झालेली प्रत्येक वस्तू सर्वसामान्यांना हवीशी वाटावी आणि आपलीशी करता यावी अशीच असायला हवी. मार्कस एंगमन या आयकियाच्या वरिष्ठ डिझायनरच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या प्रत्येक डिझाईनची, कल्पनेची सुरवात लोकांच्या गरजांपासून होते. सर्वसामान्य कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाईन योजण्यासाठी Democratic Design म्हणजेच सर्वमान्य डिझाईनची कल्पना मांडली गेली. पाच मुद्द्यांची काळजी घेतली तर आयकियात तयार होणारी प्रत्येक वस्तू, फर्निचर, गालिचे, साधनं ही लोकमान्य, सर्वमान्य होणारच अशी ही विचारसरणी होती. ते पाच मुद्दे होते ः 1) सुस्वरूप, 2) कार्यक्षम, 3) स्वस्त, 4) टिकाऊ, 5) दर्जेदार. या तत्त्वाला धरून राहत वाटचाल केल्यामुळंच नेदरलॅंडमधला सर्वात लोकप्रिय ब्रॅंड असण्याचा सन्मान सतत दहा वर्षं मिळवण्याचा विक्रम आयकियानं केला आहे. शिवाय, या ब्रॅंडला जगभर कमालीची स्वीकृती लाभलेली आहे ती सरळ, साधं, सुबक राहण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळंच.
***

आयकियाच्या उगमस्थानापासून म्हणजेच स्वीडनपासून केवळ 1500 किलोमीटर दूर असलेल्या नेदरलॅंडस्थित "हेमा' ब्रॅंडची कहाणी थोडी वेगळी; पण तत्त्वतः बरीचशी सारखी आहे. (इथं "हेमा' हे भारतीय नाव नसून, डच भाषेतल्या "स्वस्त उत्पादन भांडार' या नावाचं संक्षिप्त रूपांतर आहे). सन 1926 मध्ये सुरू झालेली ही संकल्पना जागतिक मंदी, जागतिक महायुद्ध अशा अनेक चढ-उतारांची साक्षीदार आहे. काळानुसार योग्य ते बदल करत "हेमा' स्टोअर्स गेली 15 वर्षं केवळ स्वतः डिझाईन केलेली उत्पादनंच विकतात. त्यांची सगळी उत्पादनं रोजच्या वापरातली, सर्वसामान्यांना उपयुक्त असणारी आणि परवडू शकणारी अशीच असतात. त्यांची डिझाईनबाबतची विचारसरणी ते अक्षरशः दोनच शब्दांत मांडतात. Super Normal अर्थात "अत्यंत सामान्य.' मात्र, रूप आणि गुण यांच्यात कुठल्याही प्रकारची तडजोड न करता वस्तू रास्त दरात उपलब्ध करून देता याव्यात अशी कल्पना केंद्रवर्ती ठेवूनच प्रत्येक गोष्ट योजली जाते, डिझाईन केली जाते, हे सांगायला नकोच. युरोपातल्या मोजक्‍या देशांमध्येच हजेरी लावलेला हा ब्रॅंड आठ हजार कोटींची उलाढाल करतो. ***
याच विचारसरणीचा तिसरा ब्रॅंड म्हणजे जपानमध्ये उगम पावलेला "मुजी.' "मुजी'चा अर्थ निनावी! मोठमोठ्या लक्‍झरी ब्रॅंड्‌सच्या भरमसाट किमती, विशाल प्रतिमा निर्माण करण्यासाठी केलेली अतिशयोक्ती आणि वायफळ फापटपसारा यांचा वीट येऊन "न-ब्रॅंड' या संकल्पनेवर आधारित "मुजी'ची सुरवात सन 1980 मध्ये झाली. "मुजी' विचारसणीनुसार काही तत्त्वं अपरिहार्य आहेत. 1) ग्राहकाचा समग्रपणे विचार करून अतिशय साध्या प्रकारचं डिझाईन योजलं जावं, 2) कोणत्याही अतिरिक्त किंवा अनावश्‍यक सुविधांना वाव नसावा, 3) अनावश्‍यक दिखाऊ डौलावर संपूर्ण काट मारावी, 4) "मुजी'च्या कोणत्याही उत्पादनावर लेबल नसावं आणि अनावश्‍यक पॅकेजिंगही नसावं. 5) प्रत्येक डिझाईन नुसतं पाहिल्यावर वस्तूची कार्यक्षमता स्पष्ट होईल असं असावं आणि 6) प्रत्येक वस्तू जास्तीत जास्त व्यापक गटाला आवडेल आणि वापरता येईल अशी असावी. ही तत्त्वं "मुजी'च्या शब्दकोशात "सामान्यतेचा असामान्य पाठपुरावा' या नावानं ओळखली जातात. जगभरात 28 देशांत 700 हून अधिक स्टोअर्स असलेल्या या कंपनीची उलाढाल 20 हजार कोटींहून जास्त आहे. एवढी असामान्य लोकप्रियता आणि व्यावसायिक यश मिळवणाऱ्या या तिन्ही ब्रॅंड्‌समध्ये एका सलग, सारख्या विचारसरणीचा धागा आहे. या कंपन्यांनी डिझाईनची मदत घेऊन, ग्राहकांच्या गरजा आणि सामान्य राहणीमानाला अनुसरून रोजच्या वापरातल्या अतिशय उपयुक्त; पण साध्या वस्तू सुबक पद्धतीनं आणि वाजवी दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. साधेपणाच्या तत्त्वांशी खंबीर राहून सर्वसामान्य ग्राहकांसाठी त्यांनी सातत्यानं काहीतरी खास असं सादर केलं आहे. यात त्यांचा नफा तर वाढलाच; पण सर्वसामान्यांना उत्तमरीत्या डिझाईन केलेल्या वस्तू वापरण्याची संधीही मिळाली. व्यवसायातल्या प्रत्येक घटकाचा फायदा व्हावा, हेच तर डिझाइनचं खरं उद्दिष्ट आहे.

(छायाचित्रं : निर्मात्याच्या मालकीची)

Web Title: ashwini deshpande write article in saptarang