सुरक्षेचा वेढा (आश्‍विनी देशपांडे)

आश्‍विनी देशपांडे
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

डिझाईन म्हणजे कल्पकता, नवनिर्मिती असं असतं, तितकंच लोककल्याणाचंही ते साधन असू शकतं. सीटबेल्ट हे त्याचं उदाहरण. व्होल्वो या कंपनीत काम करणाऱ्या नील्स बोहलीन या डिझायनरनं सध्या वापरात असलेल्या सीटबेल्टचं डिझाईन विकसित केलं. हे डिझाईन व्होल्वोसाठी आणि मानवजातीसाठीही अमूल्य होतं. जगातल्या सगळ्या मोटारचालकांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करून व्होल्वोनं एक असामान्य निर्णय घेतला. त्यांनी आपल्या सीटबेल्टचं पेटंट खुलं केलं आणि स्पर्धेत असलेल्या, नसलेल्या सगळ्या मोटार कंपन्यांना ते विनामूल्य वापरण्याची मुभा दिली.

डिझाईन म्हणजे कल्पकता, नवनिर्मिती असं असतं, तितकंच लोककल्याणाचंही ते साधन असू शकतं. सीटबेल्ट हे त्याचं उदाहरण. व्होल्वो या कंपनीत काम करणाऱ्या नील्स बोहलीन या डिझायनरनं सध्या वापरात असलेल्या सीटबेल्टचं डिझाईन विकसित केलं. हे डिझाईन व्होल्वोसाठी आणि मानवजातीसाठीही अमूल्य होतं. जगातल्या सगळ्या मोटारचालकांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करून व्होल्वोनं एक असामान्य निर्णय घेतला. त्यांनी आपल्या सीटबेल्टचं पेटंट खुलं केलं आणि स्पर्धेत असलेल्या, नसलेल्या सगळ्या मोटार कंपन्यांना ते विनामूल्य वापरण्याची मुभा दिली. सुरक्षेच्या वेढ्याच्या आतली ही रंजक कहाणी.

डिझाईन म्हणजे कल्पकता. डिझाईन म्हणजे नवनिर्मिती. डिझाईन म्हणजे एखादा किचकट, अवघड प्रश्न सोडवण्याची सर्जनशीलता.

ज्ञान, कौशल्य, परिश्रम, अनुभव आणि अभिव्यक्ती वापरून, संशोधनात वेळ आणि साधनसंपत्ती खर्च करून जेव्हा एखाद्या डिझाईनची निर्मिती होते, तेव्हा ती वस्तू अथवा सेवा निर्माता आणि सादरकर्त्यासाठी मूल्यवान असते. सामान्यपणे असा प्रकल्प वापरणाऱ्या व्यक्तींची सोय आणि निर्मात्यांसाठी व्यावसायिक यश असं उद्देश ठेवून केलेला असतो. मेहनत आणि कल्पकतेचं चीज सकारात्मक बदल घडणं यापुरतं मर्यादित न ठेवता त्यातून पैसे आणि प्रसिद्धी मिळावी अशीही अपेक्षा असण्यात काहीच गैर नाही. दुर्दैवानं त्या कल्पनेची हुबेहूब नक्कल करून त्यावर तिसरंच कोणीतरी फायदा मिळवण्याच्या घटनाही सर्रास आढळून येतात.

यासाठीच कायद्यात डिझाईन रजिस्ट्रेशन आणि पेटंट अशा दोन महत्त्वाच्या आयपीआर सुविधा उपलब्ध आहेत. औद्योगिक उत्पादनांसाठी आकार, रंग, रचना, सुशोभन यांचं कायदेशीर डिझाईन रजिस्टर करून कल्पनेवरचा हक्क सिद्ध करता येतो आणि कल्पनेची नक्कल होण्यापासून संरक्षण मिळू शकतं. तसंच कंपनीचे ट्रेडमार्क, लोगो, सिम्बॉल अशा सांकेतिक चिन्हांचंही कायदेशीर रजिस्ट्रेशन करता येतं. या प्रक्रिया सोप्या आणि प्रभावी आहेत. यापुढचा टप्पा म्हणजे पेटंट. उत्पादनात, यंत्रणा, आकार, उपयुक्तता, मटेरियल, तंत्रज्ञानात अभूतपूर्व शोध आणि नवीन रचना असेल, तर त्यासाठी पेटंट मिळू शकतं. पेटंटच्या अर्जानंतरची कायदेशीर चौकशीची प्रक्रिया जरा लांबलचक आहे; पण एकदा पेटंट बहाल झालं, की त्या शोधाचा, डिझाईनचा संपूर्ण हक्क सुरक्षित होतो. नक्कल करणाऱ्यांवर मोठा दंड आणि इतरही कायदेशीर कारवाई करणं पेटंटमुळंच शक्‍य होतं.

कष्टपूर्वक विकसित केलेली अभिनव कल्पना, डिझाईन आपल्या नावानं रजिस्टर करून त्या उत्पादनाच्या विक्रीवरचा संपूर्ण फायदा आपल्याला मिळावा अशी योजना प्रत्येक व्यावसायिक संस्थेनं करणं योग्यच आहे. जागतिक पातळीवर चाललेल्या जीवघेण्या चढाओढीत प्रतिस्पर्धी उत्पादनाला मागं टाकायचं असेल, तर हे आवश्‍यकच आहे.

मात्र, आज मी एक वेगळं उदाहरण मांडणार आहे. वैयक्तिक सुरक्षेसाठी दुचाकी चालवताना हेल्मेट आणि चारचाकी चालवताना सीटबेल्टचा वापर करणं किती आवश्‍यक आहे, ते जगजाहीर आहे. मोठ्या धक्‍क्‍यामुळं चालक किंवा सहप्रवासी जागेवरून फेकले जाऊ नयेत आणि स्टिअरिंगमधून एयर बॅग बाहेर आली, तर तिचा चेहऱ्यावर मोठा फटका बसू नये यासाठी भक्कम सीटबेल्टचा वापर महत्त्वाचा आहे. अशा जीवरक्षक सीटबेल्टचं डिझाईन कोणी आणि कधी केलं?
1885 मध्ये पहिल्यावहिल्या सेफ्टी बेल्टचं पेटंट एडवर्ड क्‍लॉगहॉर्न यांच्या नावे आहे. त्यांनी त्या डिझाईनचं वर्णन "एखाद्या व्यक्तीला कोणत्याही खुर्ची, वस्तू अथवा वाहनाला हूक आणि इतर साधनांनी घट्ट जुंपून ठेवण्याजोगा पट्टा' असं केलं होतं. त्यावर सुमारे पन्नास वर्ष अनेक डिझायनर्स आणि इंजिनिअर्सनी काम केलं. सुधारित आवृत्तीत पट्टा सहजपणे ओढून आत बाहेर करता येण्यासारखा झाला, चापाची मजबुती वाढली आणि शेवटी 1959 मध्ये एरोनॉटिक्‍स इंजिनिअरिंगमध्ये अनुभव असलेल्या, व्होल्वो या स्वीडिश मोटर कंपनीत काम करणाऱ्या नील्स बोहलीन या डिझाइनरनं सध्या वापरात असलेल्या खांदा आणि कमरेच्या आजूबाजूनी आवळल्या जाणाऱ्या तीन टोकं असलेल्या सीटबेल्टचं डिझाईन विकसित केलं. शरीराला बळकटपणे जागच्या जागी धरून ठेवेल आणि तरीही अगदी लहान मुलांनाही तो लावता आणि उघडता येईल, असा तिरका V आकाराचा पट्टा व्होल्वो कंपनीनं पेटंटही केला.

"सर्वांत सुरक्षित गाड्या बनवणारी कंपनी' या आपल्या वचनावर सगळ्या गाड्यांच्या श्रेणीत हा पट्टा लावून वोल्वोनं शिक्कामोर्तब केलं. 1959 मध्ये हा शोध, हे डिझाईन मानवजातीसाठी आणि व्होल्वोसाठी अमूल्य होतं. या एका शोधाच्या जोरावर व्होल्वो कंपनी अग्रगण्य ठरत होती. हे पेटंट अमेरिकेतही वैध असल्यामुळं सगळ्याच मोटर कंपन्या पेचात पडल्या होत्या. स्पर्धेत असलेल्या इतर मोटार कंपन्यांना इतक्‍या महत्त्वाच्या वैशिष्ट्यासाठी, उत्तम डिझाईनसाठी कित्येक वर्षं संशोधन करावं लागणार होतं किंवा त्या डिझाईनच्या वापरासाठी व्होल्वोला प्रचंड किंमत द्यावी लागणार होती. विशेष म्हणजे सीटबेल्टची उपयुक्तता फारशी माहीत नसल्यामुळं ग्राहक या सोयीसाठी जास्त पैसेही मोजायला तयार नव्हते.

मात्र, जगातल्या सगळ्या मोटारचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करून व्होल्वो कंपनीनं त्यावेळी एक असामान्य निर्णय घेतला. त्यांनी त्याच्या सीटबेल्टचं पेटंट खुलं केलं आणि त्यांच्या स्पर्धेत असल्या नसलेल्या सगळ्या मोटार कंपन्यांना ते विनामूल्य वापरण्याची मुभा दिली. हा शोध इतके प्राण वाचवू शकतो, की तो बंदिस्त ठेवणं योग्य नाही, असं त्यांचं मानणं होतं. यामुळं प्रत्येक गाडीला तसे सीटबेल्ट उपलब्ध झाले. एका अंदाजानुसार, गेल्या पन्नास वर्षात या निर्णयामुळे दहा लाखापेक्षा जास्त जीव वाचवले गेले.

भारतात 1994 नंतर तयार झालेल्या प्रत्येक गाडीच्या पुढच्या सीटसाठी सीटबेल्ट सक्तीचे आहेत. 2002 नंतर तयार झालेल्या गाड्यांमध्ये मागच्याही सीटसाठी सीटबेल्ट अनिवार्य केलेले आहेत. युरोपमध्ये तब्बल 98 टक्के चारचाकी ड्रायव्हर्स सुरक्षा बेल्टचा नियमितपणे वापर करतात. अमेरिकेत हा आकडा 85 टक्के आहे; पण दुर्दैवानं भारतात जेमतेम 25 टक्के वाहनचालक सीटबेल्ट लावून गाडी चालवतात. सहप्रवाशांत हा आकडा त्याहूनही कमी आहे. भारतात दर वर्षी पाच ते सहा हजार लोकांचा अपघाती मृत्यू केवळ सीटबेल्ट न लावल्यामुळं होतो.

पुढच्या वेळी गाडीत बसाल, तर सीटबेल्ट जरूर लावा आणि नील्स बोहलीनचा हा शोध आपल्यापर्यंत पोचवणाऱ्या असामान्य निर्णयाचीही कदर करा.
(छायाचित्र: क्रिएटिव कॉमन्स तत्वानुसार.)

Web Title: ashwini deshpande write article in saptarang