डिझाइनचे पैलू (आश्‍विनी देशपांडे)

ashwini deshpande
ashwini deshpande

डिझाइन ही कला, तंत्र आणि शास्त्रही. एकीकडं डिझाइनवर कमी वाङ्‌मय उपलब्ध असताना या सदरातून या व्यवसायाचे अनेक पैलू मांडण्यात आले. डिझाइनबाबत सजगता निर्माण व्हावी या उद्देशानं सुरू केलेलं हे सदर तूर्त विराम घेत असताना आतापर्यंत त्यातून मांडलेल्या निवडक मुद्‌द्‌यांची उजळणी.

कोणत्याही भारतीय भाषेत डिझाइनवर अतिशय कमी वाङ्‌मय उपलब्ध आहे. मराठीही याला अपवाद नाही. त्यामुळे डिझाईन म्हणजे नेमकं काय, त्या क्रियेचा वरकरणी सौंदर्यापेक्षा राहणीमान सुधारण्यासाठी कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो, त्यातल्या खुबी, विचार याविषयी अज्ञान असणं साहजिकच.

सुमारे दोन वर्षांपूर्वी "डिझाइन पर्पज' हा स्तंभ सुरू केला, तेव्हा डिझाइन या व्यवसायाबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी अशी त्यामागची भूमिका होती. सर्वसामान्यतः डिझाइन म्हणजे चित्रकलेशी संबंधित काहीतरी अशी जी समजूत असते ती दूर करून त्याचा व्यापक अर्थ, रोजच्या आयुष्याशी असलेला अविभाज्य संबंध आणि योग्य प्रकारे नियोजन असलेल्या डिझाइनमागं असलेला तांत्रिक, तार्किक विचार वाचकांना कळावा अशी इच्छा होती.
अक्षर सुंदर आहे म्हणून उत्तम लेखक होणार हे जसं खरं नाही, तसंच चित्रकला चांगली आहे म्हणून यशस्वी डिझायनर होणार हेही खरं नाही. कारण डिझाइन ही स्वतःची अभिव्यक्ती मांडण्याची कला नाही.
गेल्या 46 लेखांमधून डिझाइनच्या अनुषंगानं काही विचार उदाहरणं देऊन मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातलेच मोजके मुद्दे या लेखात परत मांडते आहे.

"नेमक्‍या आणि पूर्वनिर्धारित समुदायाच्या आवडी, गरजा किंवा अडचणी मोठ्या प्रमाणावर सोडवण्यासाठी केलेली अभ्यासपूर्वक, हेतुपूर्ण आणि शक्‍यतो नावीन्यपूर्ण योजना' अशी डिझाइनची व्याख्या करता येईल. डिझायनर्स आपली कल्पना समजावून सांगण्याचं माध्यम म्हणून चित्रकला, रंगकला, डिजिटल रेखाटनं यांचा उपयोग जरून करतात; पण उत्तम डिझायनर होण्यासाठी ही कौशल्यं केवळ पूरक असतात. वेगवेगळ्या गटांची मानसिकता समजून घेण्याची इच्छा, प्रत्यक्ष समस्येची जाणीव, नव्या पद्धतींनी मार्ग शोधण्याचं कुतूहल आणि साहसी वृत्ती, सर्जनशीलता, ठरवलेला उपाय प्रत्यक्षात आणण्यासाठी चिकाटी आणि जिद्द हे गुण उत्तम डिझायनर असण्यासाठी अनिवार्य आहेत.

डिझाइनच्या प्रशिक्षणात तीन महत्त्वाचे भाग समाविष्ट असतात. पहिला भाग म्हणजे व्यक्ती आणि समस्यांविषयीची आस्था. ज्या व्यक्तिगटांसाठी डिझाइन प्रक्रिया वापरली जाणार आहे, त्यांच्या आयुष्यात खोलवर डोकावून समस्येचा गाभा समजून घेण्याची सकस क्षमता हा या शिक्षणाचा पाया म्हणता येईल. समजून घेतलेली समस्या कल्पकरित्या सोडवण्यासाठी लागणारी सर्जनशीलता हा दुसरा महत्त्वाचा भाग. कल्पनाशक्ती प्रत्येकाकडे उपजतच असते; पण कल्पनारंजनात न अडकता वेगळेपणा आणि व्यावहारिकता यांचा समतोल साधून कल्पना मांडण्याचं कौशल्य हे या शिक्षणाचे स्तंभ मानता येतील.

डिझाइन या शब्दाचा संबंध "सजावट', "सुशोभन' अशा वरकरणी गुणधर्मांबरोबर लावला जातो. डिझाइनच्या उद्देश आणि परिणामांबाबतचा हा सर्वांत मोठा गैरसमज आहे. एखादी वस्तू अथवा सेवा ती वापरणाऱ्या व्यक्तीसाठी जास्तीत जास्त सोपी कशी करता येईल, इतकंच नाही, तर उत्पादन, वितरण आणि दुरुस्तीही सोपी आणि सरळ कशा प्रकारे होईल हा डिझाइनचा प्राथमिक उद्देश असतो.
कोणतं डिझाइन "चांगलं' किंवा "अनुकूल' आहे हे कसं ठरवता येतं, डिझाइनचं यश कसं मोजलं जातं, यासाठी वजनं-मापं नसली तरी काही गोष्टी नक्कीच पडताळून पाहता येतात.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिझाइन ज्या उद्देशपूर्तीसाठी योजलं आहे तो सफल होतोय ना आणि नुसता सफलच नाही तर समजायला, वापरायला ते सहज आणि सोपं आहे का. "चांगल्या' डिझाइनच्या व्याख्येत उपयुक्त, नावीन्यपूर्ण, कार्यक्षम, कमीत कमी देखभाल करावी लागेल असं, वापरायला आणि पाहायला सुखकर अशा गोष्टी येतातच; पण एक महत्त्वाचा घटक म्हणजे व्यावसायिक तारतम्यही बाळगणं आवश्‍यक असतं. ही व्यावसायिकता म्हणजे केवळ जास्त किंमत यावी अशी नाही. "चांगल्या' डिझाइनला तोलण्याचा अजून एक मुद्दा म्हणजे व्यापक किंवा सार्वत्रिक स्वीकृती होऊ शकेल, जास्तीत जास्त संस्कृती जे आपलंसं करू शकतील तेही "चांगलं'. "सार्वत्रिक' डिझाइन, म्हणजे वय, आर्थिक स्थिती, स्त्री-पुरुष, देश, भाषा, जात, शारीरिक सक्षमता अथवा अक्षमता असा कोणताही भेदभाव आड न येत प्रत्येकाला सहज समजतील, उपलब्ध होतील आणि वापरता येतील अशी उत्पादनं. सार्वत्रिक, सर्वसमावेशक डिझाइन हा एक सामाजिक जबाबदारी पेलणारा, विश्वासार्ह आणि व्यापक उपयुक्ततेची बांधिलकी मानणारा स्वागतार्ह प्रयत्न आहे. अर्थात "चांगल्या' डिझाइनची जबाबदारी लोकप्रिय होणं किंवा व्यावसायिक यश मिळणं इथं संपत नाही. "चांगलं' डिझाइन प्रामाणिक असलं पाहिजे. तसंच ते वापरण्याची कृती आपोआप आणि ओघवती व्हायला हवी.

सार्वत्रिक डिझाइनचा पुढचा टप्पा म्हणजे बहुउद्देशीय किंवा मल्टिपर्पज डिझाइन. या संकल्पनेत वस्तूची उपयुक्तता वाढवण्याचा प्रयत्न तर असतोच, शिवाय ती वस्तू टिकाऊ असावी यावरही भर दिला जातो. यामुळे ती वस्तू दीर्घायुषीही ठरते.
कोणत्याही वस्तूची पुढची आवृत्ती जास्त आकर्षक, आगळीवेगळी आणि तरीही उपयुक्त व्हावी यासाठी डिझायनर्सना समाजाचा कल कोणत्या दिशेनं जाऊ शकेल यावर तर्क लढवावे लागतात. कोणती आवड बराच काळ लोकप्रिय ठरेल आणि कोणत्या प्रवृत्ती अल्पावधीत मागं पडतील याचा मागोवा घेत राहावं लागतं.
जागतिकीकरण आणि औद्योगिकरणामुळे कालबाह्य होणाऱ्या हस्तकलांना पुनरुज्जीवित करण्यातही डिझाइनच्या हस्तक्षेपाची मदत होऊ शकते.
सगळ्या तर्कांपलीकडं जाऊन डिझायनरना सौंदर्याचाही विचार करायला लागतोच. डिझाइनद्वारे होणाऱ्या निष्पत्तीला दोन ठळक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. उपयुक्तता सौंदर्य. या दोन्ही प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असेल तरच ते यशस्वी मानलं जातं.

डिझाईनची मदत घेऊन, ग्राहकांच्या गरजा आणि सामान्य राहणीमानाला अनुसरून रोजच्या वापरातल्या अतिशय उपयुक्त; पण साध्या वस्तू, सुबक वाजवी दरात उपलब्ध करून देणाऱ्या द्रष्ट्या व्यवसायांना नफा तर होतोच; पण त्यांच्या या उपक्रमामुळे सर्वसामान्यांना उत्तमरित्या डिझाईन केलेल्या वस्तू वापरण्याची संधीही सहजरित्या प्राप्त होऊ शकते.

प्रत्येकानंच जोरजोरात आवाज केला, तर तो गोंगाट वाटायला लागतो आणि त्यातून कोणाचाही संदेश कोणालाही पोचत नाही. जेवढं आवश्‍यक आणि अनिवार्य आहे तेवढंच बाळगणारी, मितभाषी, मितव्ययी डिझाइन म्हणजे नेमकं काय ठेवायचं आणि कशाला काट मारायची हे ठरवण्याची कसोटीच. "एखाद्या गोष्टीत कोणतीही अधिक भर घालणं शक्‍य नसेल, तर ती परिपूर्ण असं म्हणता येणार नाही. याउलट त्या गोष्टीतून काहीही वजा करता येणार नाही अशी जी स्थिती असते, तिला परिपूर्ण म्हणावं' ही फ्रेंच म्हण मितव्ययी डिझाईनला अगदी चपखल बसते. डिझाईन क्षेत्रात "तपशिलात सर्वोच्च शक्ती सामावली आहे,' असं मानलं जातं.

व्यवसाय, उत्पादनं, सेवा यांच्यापुढे जाऊन परिसर, गाव, शहर, प्रदेश अथवा देश यांनाही ब्रॅंडिंग, तसंच उत्कृष्टपणे योजलेल्या सार्वजनिक सुविधा यांच्यासाठी डिझाइनची साथ महत्त्वाची ठरू शकते. कायद्यात डिझाइन रजिस्ट्रेशन आणि पेटंट अशा दोन महत्त्वाच्या आयपीआर सुविधा उपलब्ध आहेत. औद्योगिक उत्पादनांसाठी आकार, रंग, रचना, सुशोभन यांचं कायदेशीर डिझाइन रजिस्ट्रेशन करून कल्पनेवरचा हक्क सिद्ध करता येतो आणि कल्पनेची नक्कल होण्यापासून संरक्षण मिळू शकतं. तसंच कंपनीचे ट्रेडमार्क, लोगो, सिम्बॉल अशा सांकेतिक चिन्हांचंही कायदेशीर रजिस्ट्रेशन करता येतं. या प्रक्रिया सोप्या आणि प्रभावी आहेत. यापुढचा टप्पा म्हणजे पेटंट. उत्पादनात, यंत्रणा, आकार, उपयुक्तता, मटेरियल, तंत्रज्ञानात अभूतपूर्व शोध आणि नवीन रचना असेल, तर त्यासाठी पेटंट मिळू शकतं.

प्रत्येक वस्तू, उपकरण किंवा सेवा ही उत्तम प्रकारे "डिझाइन' करण्यामागं प्रशिक्षित "डिझायनर' असेलच असं नाही; पण डिझाइनची विचारप्रणाली वापरून म्हणजेच वापरणाऱ्या व्यक्तीचा सर्वांगानी विचार करून तयार झालेला, व्यापक प्रमाणावर उपलब्ध होऊ शकणारा उपाय असेल तर त्यालाही उत्तम डिझाइनच म्हणता येईल. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता यांची देणगी थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाला बहाल झालेली असते.

गरजेतून उगम झालेल्या ज्या ज्या कल्पना जगण्याची पद्धत बदलून टाकण्याइतक्‍या प्रभावी असतात, त्यांचं एक पाऊल तांत्रिक प्रगती आणि दुसरं डिझाइन अभिव्यक्तीनुसार पुढं जात असतं. समाजातल्या प्रत्येक घटकाचा फायदा व्हावा हेच डिझाइनचं व्यापक उद्दिष्ट आहे.
डिझाइनबाबत सजगता निर्माण व्हावी या उद्देशानं सुरू केलेल्या या लेखमालेला सध्या इथंच विराम देत आहोत. तुमच्या इमेल्सद्वारे आलेल्या अभिप्रायांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com