हवं ते द्या; नको ते टाळा ! (आश्विनी देशपांडे)

आश्विनी देशपांडे ashwini@elephantdesign.com
रविवार, 22 जानेवारी 2017

गरज नसलेली फीचर्स एखाद्या डिझाइनमध्ये असणं म्हणजे मूळ उद्देशांशी/उद्दिष्टांशी प्रामाणिकता न ठेवता केवळ ‘झोकदार’ दिसण्याचा प्रयत्न होय. ‘चांगलं’ डिझाइन ‘प्रामाणिक’ असलं पाहिजे, तसंच ते वापरण्याची कृती आपोआप आणि सहज-सुलभ व्हायला हवी. एखादी सामान्य गरजेची वस्तू वापरताना जर ‘यूजर मॅन्युअल’ काढून वाचावं लागत असेल, तर ते ‘चांगल्या’ डिझाइनचं उदाहरण नक्कीच नाही.

गरज नसलेली फीचर्स एखाद्या डिझाइनमध्ये असणं म्हणजे मूळ उद्देशांशी/उद्दिष्टांशी प्रामाणिकता न ठेवता केवळ ‘झोकदार’ दिसण्याचा प्रयत्न होय. ‘चांगलं’ डिझाइन ‘प्रामाणिक’ असलं पाहिजे, तसंच ते वापरण्याची कृती आपोआप आणि सहज-सुलभ व्हायला हवी. एखादी सामान्य गरजेची वस्तू वापरताना जर ‘यूजर मॅन्युअल’ काढून वाचावं लागत असेल, तर ते ‘चांगल्या’ डिझाइनचं उदाहरण नक्कीच नाही.

‘डि  झाइन’ या विषयावर लिहिण्याच्या माझ्या पहिल्याच प्रयत्नाला आलेला भरभरून प्रतिसाद पाहता, या विषयाबद्दल वाचकांच्या मनात विलक्षण कुतूहल आहे, हे तर नक्की झालं. मेलबॉक्‍स बरीच फुगलीय आणि तुमचे संदेश, विचार आणि शंका वाचून पुढं लिहीत राहण्याचा हुरूप आला आहे.
हा संवाद दुतर्फी राहावा अशी इच्छा आणि विनंती.

चित्र, शिल्प किंवा एखाद्या जागेतली रंगसंगती पाहून ती कलाकृती पाहणाऱ्याच्या तोंडून सहजच ‘वा’ असा उद्गार निघतो. मात्र, प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात; त्यामुळं ही दाद वैयक्तिक स्वरूपाची असते.
डिझाइनच्या बाबतीत हे स्वरूप ‘आवडण्यापुरतं’ मर्यादित ठेवता येत नाही. डिझाइनचा पहिला उद्देश हा विशिष्ट गरज किंवा त्रुटी योजनापूर्वक भरून काढणं हाच असतो. तो जेवढ्या व्यापक स्वरूपात जमवता येईल तेवढं चांगलं.

कोणतं डिझाइन ‘चांगलं’ किंवा ’अनुकूल’ आहे, हे कसं ठरवता येतं? डिझाइनचं यश कसं मोजलं जातं? यासाठी फूटपट्ट्या नसल्या तरी काही गोष्टी नक्कीच पडताळून पाहता येतात.
डिझाइन ज्या उद्दिष्टपूर्तीसाठी योजलं गेलं आहे, ते उद्दिष्ट सफल होतंय ना आणि नुसतं सफलच नव्हे, तर ते डिझाइन समजायला, वापरायला सहज आणि सोपं आहे ना, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची.

काही वर्षांपूर्वी आमची टीम एका प्रथितयश कंपनीसाठी सूटकेस डिझाइन करत होती. आपण सगळेच जरी कित्येक वेळा प्रवास करत असलो, तरी जेव्हा हे काम सुरू झालं, तेव्हा आम्ही बस स्टॅंड, रेल्वे स्टेशन आणि विमानतळं यांच्या आत आणि बाहेर अनेक तास निरीक्षणात घालवले. बॅग रिक्षात किंवा गाडीच्या मागच्या कप्प्यात कशी ठेवली जाते किंवा तिथून काढली जाते, चाकाचा वापर कशा पद्धतीच्या पृष्ठभागावर होतो, ट्रॉलीवर बॅगा एकावर एक कशा रचल्या जातात, स्त्रिया आणि पुरुषांच्या सरासरी उंचीला कितपत वजन आणि आकार सहजपणे ओढता येतो अशा कित्येक गोष्टी आम्ही पाहिल्या आणि नोंदल्या. आपल्याकडं लिफ्ट किंवा एस्केलेटर्स सगळीकडं उपलब्ध नाहीत. त्यामुळं जिना चढताना बॅग कशी धरली जाते; इतकच नव्हे तर, बॅग कशी भरली जाते आणि बंद करताना आणि उघडताना काय कसरती होतात, हे सगळंच अत्यंत बारकाईनं पाहिलं गेलं. निरीक्षणातून जेवढं समजू शकतं तेवढं मुलाखतींमधून किंवा गप्पांमधून बाहेर येत नाही. तेव्हा या सगळ्या अभ्यासातून अनेक समस्यांची यादीच तयार झाली. डिझाइन टीमनं या सगळ्याच समस्यांना प्राधान्य द्यायचं ठरवलं असतं, तर कदाचित ते व्यवहार्य झालं नसतं. त्यामुळं त्यांनी एक साधं कोष्टक केलं. नेमक्‍या कोणत्या वैशिष्ट्यांसाठी लोक कदाचित थोडे जास्त पैसे मोजूनही हेच डिझाइन पसंत करतील?
त्या वेळी मुंबईला २६ जुलै २००५ चा जलप्रलय नुकताच होऊन गेलेला होता. तेव्हा लोकांना वॉटरप्रूफ बॅग हवीशी वाटणं स्वाभाविकच होतं. हे एक आव्हान आमच्या टीमनं स्वीकारलं.

दुसरं आव्हान म्हणजे, कसरत न करता उघडता येईल असं कुलूप. भरलेली बॅग जमिनीवर ठेवून कधी हॅंडलला समांतर असलेलं नंबर-लॉक तुम्ही उघडलं असेल, तर मी ‘कसरत’ हा शब्द का वापरला ते सांगायला नकोच! हे आव्हान यशस्वीपणे पेलताना डिझायनर्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स यांनी मिळून, बॅग तिरपी न करताही आकडे व्यवस्थित दिसतील अशा कोनात या कुलपाची रचना करण्यात यश मिळवलं. केवळ ही दोनच नव्हे तर अशी तब्बल नऊ आव्हानं डिझाइन टीमनं यशस्वीरीत्या पेलली. त्यात अतिशय नावीन्यपूर्ण कल्पना होत्या आणि विशेष म्हणजे, या सगळ्या कल्पना प्रत्यक्षात उतरवल्या गेल्या.

‘चांगल्या’ डिझाइनच्या व्याख्येत उपयुक्त, नावीन्यपूर्ण, कार्यक्षम, कमीत कमी देखभाल करावी लागेल असं, वापरायला आणि पाहायला सुखकर अशा गोष्टी येतातच; पण एक महत्त्वाचा घटक म्हणजे, व्यावसायिक तारतम्यही बाळगणं आवश्‍यक असतं. ही व्यावसायिकता म्हणजे केवळ ‘जास्त किंमत यावी’ अशी नव्हे.

डिझायनर्स ज्याप्रमाणे लोकांच्या गरजांचं निरीक्षण करतात, त्याचप्रमाणे निर्मितिप्रक्रिया, वेगवेगळे सुटे भाग कारखान्यात कशा पद्धतीनं जुळवले जातात, नेमका कोणता आणि किती कच्चा माल प्रत्येक भागासाठी वापरला जातो, एखाद्या उत्पन्नाचं पॅकेजिंग आणि वाहतूक कशी होते, त्या प्रवासादरम्यान हानी होण्याच्या शक्‍यता या सगळ्या घटकांचा बारकाईनं अभ्यास करतात.
सूटकेसचंच उदाहरण घेतलं, तर आमच्या टीमच्या लक्षात असं आलं, की वेगवेगळ्या आकाराच्या बॅगा जेव्हा ट्रान्स्पोर्ट होतात, तेव्हा मोजक्‍याच बॅगा टेम्पो किंवा ट्रकमध्ये मावतात. मग टीमनं अगदी थोडा फेरफार करून जमेल अशी एक युक्ती केली. तीन वेगवेगळ्या आकाराच्या बॅग्ज्‌ एकात एक सहज बसू शकतील, अशी अंतर्गत रचना करण्यात आली. यामुळं कुठल्याही प्रकारची इतर तडजोड होणार नाही, याचीही खात्री करून घेतली गेली. आता याचा परिणाम आणि फायदा दुहेरी झाला. एक म्हणजे, ट्रान्सपोर्टचा खर्च एक तृतीयांश झाला. एवढंच नव्हे तर, जे वितरक आणि विक्रेते जागा नसण्याच्या सबबीमुळं संख्येच्या दृष्टिकोनातून कमी ऑर्डर्स द्यायचे, ते आता जास्त साठा ठेवायला राजी झाले.

तर अशा या अतिशय काळजीपूर्वक डिझाइन केलेल्या सूटकेसचा भारतात तर भरपूर खप झालाच; पण त्या कंपनीशी सहयोग असलेल्या एका जागतिक स्तरावरच्या ब्रॅंडअंतर्गतही नंतरच्या काळात या सूटकेसची इंग्लंडमध्ये विक्री झाली.
तर ‘चांगलं’ डिझाइन म्हणजे काय, हे कळण्यासाठी आणखी एक मुद्दा जोडता येईल व हा मुद्दा म्हणजे, ज्याची व्यापक किंवा सार्वत्रिक स्वीकृती होऊ शकेल, जास्तीत जास्त संस्कृती जे आपलंसं करू शकेल तेही ‘चांगलं’.

‘चांगल्या’ डिझाइनची जबाबदारी लोकप्रिय होणं किंवा व्यायसायिक यश मिळणं एवढ्यावरच संपत नाही.
केवळ शक्‍य आहे म्हणून एखादं आकर्षक वैशिष्ट्य गरज नसतानाही लादणं हे काही ‘चांगलं’ लक्षण नव्हे. तुम्ही कधीतरी टीव्हीचा रिमोट हातात धरून नीट पाहा. त्यात कित्येक बटणं अशी असतील, की जी तुम्ही कधीही वापरली नसतील. मग हे बटणांचं जंजाळ कशासाठी?
अशी गरज नसलेली फीचर्स एखाद्या डिझाइनमध्ये असणं म्हणजे मूळ उद्देशांशी/उद्दिष्टांशी प्रामाणिकता न ठेवता केवळ ‘झोकदार’ दिसण्याचा प्रयत्न होय. ‘चांगलं’ डिझाइन ‘प्रामाणिक’ असलं पाहिजे, तसंच ते वापरण्याची कृती आपोआप आणि सहज-सुलभ व्हायला हवी. एखादी सामान्य गरजेची वस्तू वापरताना जर ‘यूजर मॅन्युअल’ काढून वाचावं लागत असेल, तर ते ‘चांगल्या’ डिझाइनचं उदाहरण नक्कीच नाही.

विख्यात जर्मन डिझाइनर डीटर रॅम्स यांनी चांगल्या डिझाइनची १० मूल्यं १९७० च्या दशकातच मांडून ठेवली आहेत. त्या काळातल्या कित्येक कल्पना आता कालबाह्य झाल्या आहेत; पण ही मूल्यं आजही अगदी खणखणीत वाजतात! या मूल्यांचं किंवा तत्त्वांचं आचरण आणि प्रसार जगातल्या प्रत्येक डिझायनरनं केला, तर तुमचं-माझं आयुष्य बरंच सुखकर होईल.

या लेखात मी डीटर रॅम्स यांच्या काही तत्त्वांचा आधार घेतच सूटकेस डिझाइनचं उदाहरण सांगितलं आहे.
पुढच्या लेखात ‘चांगल्या’ डिझाइनवर अजून थोडी चर्चा करू या...!

Web Title: ashwini deshpande's article in saptarang