विश्ववाङ्मयाला घातलेली प्रदक्षिणा

आपण नेहमी वाचनसंस्कृतीविषयी बोलत असतो. वाचकांची संख्या वाढायला हवी, असं म्हणत असतो; पण त्यादृष्टीनं होणारे प्रयत्न आणि उपक्रम मात्र मर्यादित आणि तोकडे असतात.
Vachanvata Book
Vachanvata BookSakal

- अविनाश सप्रे, saptrang@esakal.com

‘सकाळ ॲग्रोवन’ या शेतीशी संबंधित दैनिकातून संपादक आदिनाथ चव्हाण यांनी रविवार आवृत्तीमध्ये ‘मला भावलेलं पुस्तक’ या सदरात, मराठीत अनुवादित झालेल्या जागतिक वाङ्मयकृतींची परिचयपर आणि आस्वादपर लेखमाला लिहिली. अशा ३८ अभिजात साहित्यकृतींचा समावेश असलेलं ‘वाचनवाटा’ हे पुस्तक आता सकाळ प्रकाशनामार्फत प्रकाशित झालं आहे.

आपण नेहमी वाचनसंस्कृतीविषयी बोलत असतो. वाचकांची संख्या वाढायला हवी, असं म्हणत असतो; पण त्यादृष्टीनं होणारे प्रयत्न आणि उपक्रम मात्र मर्यादित आणि तोकडे असतात. जीवनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्यांना वाचनाशी जोडून घेतलं तर वाचक संख्या वाढू शकते. तसं पाहता ‘ॲग्रोवन’ शेतीशी संबधित. त्याचा वाचकवर्गही मोठा.

अशा वाचकांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी, प्रेरणा निर्माण व्हावी, त्यांची अभिरुची समृद्ध व्हावी, त्यांना संवेदनशील, विचारी आणि विवेकी व्हायला प्रवृत्त करावं या भूमिकेतून संपादक आणि या लेखमालेचे लेखक म्हणून आदिनाथ चव्हाण यांनी हे लेखन केलं आहे, म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन.

या ३८ साहित्यकृतींमध्ये विषयवैविध्य आहे. प्रेमाचे आविष्कार, जगण्यातला संघर्ष, आत्मशोध, माणसाला ऊर्जा, आनंद आणि समानता देणारे निसर्गसान्निध्य, वंशश्रेष्ठत्वातून निर्माण झालेली अमानुषता आणि निर्घृण नरसंहार, प्रतिकूल परिस्थितीत केलेला संघर्ष आणि त्यातून प्रकट झाली दुर्दम्य इच्छाशक्ती, जीवनाबद्दलचं तत्त्वचिंतन आणि विचारधन, प्रतिकूल परिस्थितीत करावा लागलेला संघर्ष, त्यावर मात करणारा आशावाद, मनाचा शोध आणि बोध, स्त्रीमुक्तीचा उद्घोष, दमनकारी सत्तेचं स्वरूप, कोवळं भावविश्व आणि निर्व्याज मैत्री, माणुसकीचा गहिवर, भूमिपुत्रांचं स्थलांतर, आधुनिक जगण्यातली अर्थशून्यता, साध्या-सरळ लोकांचं आनंदी आयुष्य, व्यवहारी जगातील निर्व्याज प्रेम अशा विषयांवरचं अक्षरधन चव्हाण या लेखनातून वाचकांना भरभरून देतात. असं अक्षरधन निर्माण करणाऱ्या लिओ टॉलस्टाय, हेन्री डेव्हिड थोरो, खलील जिब्रान, ऑस्कर वाइल्ड, अर्नेस्ट हेमिंग्वे, जॉर्ज ऑर्वेल, बर्ट्रांड रसेल, गॅब्रिअल गार्सिया मार्केझ, सिग्मंड फ्रॉइड, आल्बेर काम्यू, सिमॉन द बोव्हुआ आदी ३८ जणांचा परिचयही यातून वाचकांना होतो.

‘वाचनवाटा’ वाचताना चव्हाण यांची बहुश्रुतता, रसिकता, दर्जेदार अभिरुची आणि वाचनाचा आवाकाही लक्षात येतो. इथं निवडलेल्या साहित्यकृतींपैकी १६ कृतींवर अजरामर चित्रपट निर्माण झाले आहेत. मूळ साहित्यकृतीवर लिहिता लिहिता त्या चित्रपटांचंही सचित्र रसग्रहण चव्हाण करतात. ओघामध्ये विषयाला उठाव देणाऱ्या हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय गाण्यांच्या ओळीही उद्घृत करतात.

त्यामुळे लेखनाची खुमारी अधिकच वाढते. प्रत्येक साहित्यकृतीच्या गाभ्याला भिडून तिचं मर्म विशद करणं आणि ते वाचकाच्या व्यक्तिगत अनुभवापर्यंत आणून भिडवणं हे चव्हाण यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. म्हणून ते वाचनीय आणि संस्मरणीय झालं आहे. मूळ पुस्तक साररूपात वाचल्याचा आनंदही त्यातून मिळतो. चव्हाण यांची भाषाशैली सहजसुलभ आणि वाचकांशी स्नेहभावानं संवाद साधणारी आहे.

हे लेखन म्हणजे विश्ववाङ्मयाला घातलेली प्रदक्षिणा आहे. इंग्लिशमध्ये ‘बुक्स ऑन बुक्स’ प्रकारच्या पुस्तकांचं आणि आस्वादक समीक्षेचं दालन समृद्ध आहे. मराठीमध्ये हा प्रवाह अलीकडे सुरू झाला आहे. त्यातील रसाग्राही आस्वाद देणारं ‘वाचनवाटा’ हे पुस्तक महत्त्वाचा ऐवज ठरावा.

जगातील वाङ्मयाप्रमाणे भारतीय घटनेनं मान्य केलेल्या भारतीय भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीमध्ये अनुवादित झालं आहे, होतही आहे. अशा श्रेष्ठ आंतरभारतीय साहित्यकृतींचा परिचय करून देणारं आणखी लेखनही चव्हाण यांनी करावं अशी सूचना करावीशी वाटते.

पुस्तक : वाचनवाटा

लेखक : आदिनाथ चव्हाण

प्रकाशन : सकाळ प्रकाशन, पुणे

पाने : २७०

मूल्य : ३९९ रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com