आयुर्वेदाची नॅनो टेक्नॉलॉजी

भारतीय मसाले किंवा त्यापासून बनवलेले तेलांचे युगानुयुगे ज्ञात असलेले वैद्यकीय फायदे कॅन्सरवरील उपचारासाठी वापरता यावेत, म्हणून मद्रास आयआयटीमध्ये संशोधकांनी प्राण्यांवर संशोधन करून त्याचे पेटंट मिळविले.
ayurveda nano technology
ayurveda nano technologysakal

- डॉ. दिलीप निकम

भारतीय मसाले किंवा त्यापासून बनवलेले तेलांचे युगानुयुगे ज्ञात असलेले वैद्यकीय फायदे कॅन्सरवरील उपचारासाठी वापरता यावेत, म्हणून मद्रास आयआयटीमध्ये संशोधकांनी प्राण्यांवर संशोधन करून त्याचे पेटंट मिळविले. संबंधित औषधासाठी वापरण्यात आलेली नॅनो टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे? तिचा वापर करून आयुर्वेदिक मेडिसिन कॅन्सर उपचारासाठी विकसित करता येईल का, याचा ऊहापोह...

इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आयएआरसी) यांच्या ‘२०२० ग्लोबोकॅन’ अहवालानुसार प्रसिद्ध झालेली आकडेवारी चिंताजनक असून त्यानुसार जगभरात दरवर्षी एक कोटी ९२ लाख नवीन कर्करुग्णांची नोंद होत आहे. साधारण एक कोटी रुग्ण कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात. २०४० मध्ये कर्करोगाचे प्रमाण तब्बल ४७ टक्क्यांनी वाढून २.७५ कोटी नवीन रुग्ण आढळतील, असा अंदाज आहे. एक कोटी सहा लाख रुग्ण मृत्यू पावतील.

१३५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात २०२२ मध्ये ११ लाखांपेक्षा जास्त नवीन कर्करुग्णांची नोंद झाली. सात लाखांपेक्षा जास्त कर्करुग्ण मृत्युमुखी पावले. मागील काही वर्षांत आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध असतानाही कर्करोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असून उशिरा होणारे निदान हे त्याचे प्रमुख कारण आहे.

कर्करोग पूर्णपणे बरा करण्यासाठी शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, हार्मोनल थेरपी, टार्गेटेड थेरपी व इमिनो थेरपी इत्यादींसारख्या उपचार पद्धती वापरल्या जातात. त्या १०० टक्के खात्रीलायकपणे कर्करोग ठीक करू शकतात, असे म्हणणे आज तरी धाडसाचे ठरेल; कारण वरील पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये नेमकेपणाचा अभाव आढळतो. दिलेली औषधे केवळ कॅन्सर पेशींना किंवा बाधित अवयवाला नष्ट करत नाहीत. सोबत शरीरातील चांगल्या पेशींनाही बाधित करत असल्याने साईड इफेक्ट होत असल्याने रुग्णांचा कल उपचार न घेण्याकडे असतो.

नॅनो टेक्नॉलॉजीच्या उदयानंतर जशी इतर उद्योगांत प्रगती झाली, तशीच कॅन्सर उपचारांतदेखील क्रांती घडत आहे. नॅनो ऑनकॉलॉजी नावाची नवीन उपचार पद्धती अस्तित्वात येत आहे. नॅनो पार्टिकल म्हणजे सूक्ष्म कण साधारण एक ते १०० नॅनो मीटर आकाराने लहान असल्यास त्यांची भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मे वेगळी असतात.

वरील गुणधर्माचा उपयोग करून कॅन्सरमध्ये वापरली जाणारी औषधे अधिक प्रभावीपणे, योग्य त्या मात्रेत, अगदी नेमकेपणाने हव्या त्या ठिकाणी पोहोचविता येतात. काही औषधांचा शरीरातील किंवा पेशीतील कार्यकाळ वाढवता येतो. नॅनो पार्टिकल वाहकाचेदेखील काम करू शकतात. अशा गुणधर्मांमुळे नॅनो पार्टिकल भविष्यात कर्करोगाचे प्रभावी आणि अचूक निदान करणे किंवा उपचारात मोठी भूमिका निभावतील.

कॅन्सर उपचारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नॅनो पार्टिकल्सचा उपयोग केला जातो.

१) लायपोजोम्स नॅनो पार्टिकल्स नॅचरल फॉसफो लिपिड व कोलेस्ट्रॉलपासून बनविले जातात. ते कर्करोगाच्या पेशीपर्यंत ड्रग घेऊन जाण्याचे काम करतात.

२) मेटॅलिक नॅनो पार्टिकल्समध्ये प्रामुख्याने गोल्ड व सिल्व्हर नॅनो पार्टिकल्सचा उपयोग करून कॅन्सरचे निदान करणे, ड्रग डिलिव्हरी किंवा फोटो थर्मल थेरपीसाठी उपयोग होतो.

३) पॉलिमर नॅनो पार्टिकल्समध्ये औषधांसोबत पॉलिमर नॅनो पार्टिकल्सचा उपयोग करून शरीरात किंवा कॅन्सर पेशीमध्ये मोजूनमापून ड्रग रिलीज केला जातो. त्यामुळे ड्रगची मात्रा शरीरात खूप वेळ ठेवता येऊ शकते.

४) डेन्द्रीमर नॅनो पार्टिकल्स यांचा उपयोग करून जिन थेरपीसारखी आधुनिक उपचार पद्धती विकसित करता येते. पूर्वी एखाद्या अवयवाच्या कॅन्सरसाठी एकच प्रकारची थेरपी सर्व रुग्णांना दिली जात होती. त्यामुळे उपचाराचे दुष्परिणाम जरी सर्वांना होत असले तरी असर मात्र काहीच रुग्णांमध्ये होत असे. त्याची कारणमीमांसा केल्यानंतर असे लक्षात आले की, प्रत्येक रुग्णाचा कॅन्सर वेगळा असून वेगवेगळी जनुकीय बदल घडत असतात. अशा जनुकीय बदलाचा अभ्यास करून केवळ त्यांनाच टार्गेट करणे शक्य असते आणि अशा उपचार पद्धतीला प्रिसिजन थेरपी किंवा पेर्सोनालिज्ड थेरपी असे म्हटले जाते आणि त्यामध्ये नॅनो पार्टिकल्सचा खूप मोठा रोल आहे.

आयुर्वेदिक उपचार पद्धती जवळपास पाच हजार वर्षांपेक्षा जास्त काळापासून भारतात अस्तित्वात आहे. महर्षी पतंजली यांनी पतंजली तंत्र (Physical Health), महा भाष्यम (Social Health) आणि योग सूत्र (Spiritual Health) असे तीन महान ग्रंथ लिहिले. ते आजही मानवाला मार्गदर्शक मानले जातात. त्यामध्ये पतंजली तंत्र, ज्यामध्ये आयुर्वेद, रोग निदान आणि उपचार पद्धती याविषयी त्या काळी लिहिले.

त्या ग्रंथांमधून मानवी जीवनात आवश्यक असणारे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अन् वैचारिक देवाणघेवाणीसाठी लागणारी भाषा म्हणजेच सामाजिक स्वास्थ्याबद्दल मार्गदर्शन केले आहे. इतकी उच्च व जुनी परंपरा असूनही इतर उपचार पद्धतींपेक्षा आयुर्वेद मागे राहून गेले. त्याची बरीच सामाजिक, राजकीय किंवा इतर कारणे असू शकतात.

एक विज्ञानाचा विध्यार्थी म्हणून मला असे वाटते की, आयुर्वेदिक उपचारपद्धती मागे पडण्यामध्ये पुढीलप्रमाणे कारणे असू शकतात... एक म्हणजे, पारंपरिक आयुर्वेदिक औषधी बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये ॲक्टिव्ह कम्पाऊंड वेगळे करता न येणे किंवा वेगळे करीत असताना त्याची प्रत ढासळणे. दुसरे म्हणजे शरीरात किंवा रक्तामध्ये कमी प्रमाणात शोषण होणे आणि तिसरे कारण कॅन्सर पेशींसोबत साधारण पेशींनाही मारणे.

त्यामुळेच एफडीएसारख्या संस्थांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे न पाळता आल्यामुळे किंवा जडीबुटीमधून नेमके रासायनिक पदार्थ वेगळे करून त्यावर पुरेसे संशोधन न झाल्यामुळे त्याच्या वापरासाठी परवानग्या मिळाल्या नाहीत. आजच्या मॉडर्न युगात कुठल्याही रोगाचे उपचार नियंत्रक संस्थांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करावे लागतात.

कुठलीही नवीन उपचार पद्धती किंवा औषधे रुग्णांमध्ये प्रायोगिक चाचण्यांशिवाय करता येत नाहीत. मला वाटते, आयुर्वेदिक उपचार पद्धती अशा संशोधनात कमी पडल्या. नॅनो टेक्नॉलॉजीच्या उदयानंतर वनस्पतीपासून गरजेची रसायने वेगळी करणे, त्यांना स्थिरावू देणे, गरजेनुसार त्यांच्या भौतिक, रासायनिक किंवा जैविक गुणधर्मांत बदल करणे, इतर कुठल्याही पेशींना इजा न करता केवळ कॅन्सर पेशींनाच नष्ट करणे इत्यादींसारख्या गोष्टी करता येतील.

त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात आयआयटी मद्राससारख्या संशोधन संस्था नव्या जोमाने काम करून कर्करोगावर आयुर्वेदिक उपचार पद्धती अधिक शक्तिशाली आणि प्रभावशाली करून रुग्णांसाठी आणतील, अशी अपेक्षा करूया...

docnik128@yahoo.com

(लेखक बॉम्बे हॉस्पिटलचे कर्करोगतज्ज्ञ आणि विभागप्रमुख आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com