बदलापूरची 'विचारयात्रा' : साहित्य संमेलनाचा पूर्वरंग

गिरीश वसंत त्रिवेदी
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

बदलापूर या मुंबईचे 'टप्प्यापलीकडचे' उपनगर मानल्या गेलेल्या शहराने आपली स्वतंत्र संस्कृती जपली आहे. बदलापूरमध्ये साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीला गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास आहे. येत्या 25 आणि 26 डिसेंबरला येथे भरलेले 'विचारयात्रा साहित्य संमेलन' म्हणजे डोंबिवलीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचा पूर्वरंगच मानले जाते. 

'बदलापूर आमचा गाव' हे बदलापुरामधून प्रसिद्ध झालेले पहिले मराठी पुस्तक. याच पुस्तकाबरोबर बदलापूरच्या साहित्य चळवळीला प्रारंभ झाला. हे पहिले पुस्तक लिहिले होते न्या. नानासाहेब चापेकर यांनी. त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आज विस्तारलेल्या वृक्षात रूपांतर झाले आहे. म्हणूनच बदलापुरात झालेल्या विचारयात्रा संमेलनस्थळाला दिलेले 'नानासाहेब चापेकर साहित्य नगरी' असे नाव अत्यंत सयुक्तिक आहे. 

जुने-जाणते सांगतात त्यानुसार मराठी साहित्य क्षेत्रात न्या. नानासाहेब चापेकर यांचे फार मोठे योगदान मानले जाते. पुणे येथे न्या. नानासाहेब चापेकर यांच्याच पुढाकाराने भवानराव पंतप्रतिनिधी यांनी पुण्यातील टिळक रोडसारख्या मध्यवर्ती ठिकाणी साहित्य परिषदेसाठी जागा दिली. बदलापूर शहराचा इतिहास त्यांनी लिहिला असला तरी त्यांनी सांस्कृतिक चळवळीच्या इतिहासाच्या पाऊलखुणा त्यांच्यापासूनच सुरू होतात. 
बदलापूर शहरात व्याख्यानमालांचीही परंपरा आहे. व्याख्यानमालांच्या वा अन्य निमित्ताने अनेक मान्यवरांच्या व्याख्यानांचा आनंद साहित्यप्रेमींनी लुटला आहे. श्रीपाल सबनीस, सदानंद मोरे, वसंत आबाजी डहाके, नागनाथ कोतापल्ले, द. भि. कुलकर्णी, संजय भास्कर जोशी, गिरीश प्रभुणे, प. वि. वर्तक, अरुण टिकेकर, आनंद यादव, गं. ना. जोगळेकर, शेषराव मोरे, श्रीपाद भालचंद्र जोशी, अशोकराव मोडक, सुधीर मोघे, अनंत सामंत, प्रवीण दवणे, अक्षयकुमार काळे, कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे आदी अनेक मान्यवरांच्या कार्यक्रमाची मेजवानी साहित्य रसिकांना मिळाली आहे. 

बदलापूर शहरात वाचनाची चळवळ चांगली फोफावलेली पाहावयास मिळते. शहरात पंचवीसहून अधिक वाचनालये आहेत. एकट्या श्‍याम जोशी यांच्या ग्रंथसखा वाचनालयात दोन लाखांहून अधिक पुस्तके आणि अन्य ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. देशातील पहिले मराठीभाषेचे स्वायत्त विद्यापीठच ग्रंथसखाच्या रूपात बदलापूर शहरात असल्याचे मानले जाते. या वाचनालयात पाच हजार सदस्यांनी नावे नोंदवलेली आहेत, यावरून बदलापूर शहरात असलेल्या वाचनसंस्कृतीचा अंदाज येऊ शकतो. शहरातील व्याख्यानमाला असो की कीर्तन संमेलन, रसिक श्रोत्यांची हजेरी आणि प्रतिसाद चांगलाच असतो. शहरात विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शन असते. वर्षातून तीन ते चार वेळा असे प्रदर्शन भरविण्यात येत असले तरी त्याला प्रत्येक वेळी चांगला प्रतिसाद मिळत असतो. डोंबिवली येथे भरणाऱ्या 90व्या साहित्य संमेलनापूर्वीचे साहित्य संमेलन भरवण्याचा मान त्यामुळे बदलापूरला मिळाला आहे. येत्या 25 आणि 26 डिसेंबरला पार पडणाऱ्या या संमेलनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद कुळगाव बदलापूर शाखा, आगरी युथ फोरम, आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सुहृद एक कलांगण आणि ग्रंथसखा वाचनालय एकत्र आले. त्यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे विचारयात्रा साहित्य संमेलन काटदरे सभागृहात संपन्न झाले. त्याचबरोबर 25 डिसेंबरला आदर्श महाविद्यालयात दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत युवा आणि बाल साहित्य संमेलनही पार पडले. 

विचारयात्रा साहित्य संमेलनात औत्सुक्‍याचा विषय ठरणार आहे ती सदानंद मोरे यांच्या 'लोकमान्य ते महात्मा' या ग्रंथावर आधारित सटीप मुलाखत. हा संग्राह्य संदर्भग्रंथ निवडक संस्थांना निम्म्या किमतीत लेखकांच्या स्वाक्षरीसह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या विचारयात्रा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बदलापूर शहराची एक स्वतंत्र ग्रंथसूचीही तयार होत आहे. यानिमित्ताने उपलब्ध होणारे सर्व ग्रंथ अंबरनाथ तालुक्‍यातील लव्हाळी येथील गुरुवर्य नानासाहेब सबनीस संस्थेच्या शिव भक्त आदिवासी निवासी आश्रमशाळेला भेट देणेही उल्लेखनीय आहे. 

नागरीकरणामुळे बदलापूर बदलते आहेच; पण या व अशा सांस्कृतिक महवाच्या कार्यक्रमांमुळे बदलापूरची साहित्य सांस्कृतिक चळवळ अधिक समृद्ध होणार आहे. 

Web Title: badlapur prepares for vicharyatra marathi literary meet