सदाबहार देव आनंद

अनेक भूमिकांमधून हिंदी चित्रपटसृष्टीत सदाबहार झालेला अभिनेता देव आनंद. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक कंगोरे होते; पण तो लबाड नव्हता, तो एक मोहक अपराधी होता.
Actor Dev Anand
Actor Dev Anandsakal

- बालाजी विट्टल

अनेक भूमिकांमधून हिंदी चित्रपटसृष्टीत सदाबहार झालेला अभिनेता देव आनंद. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक कंगोरे होते; पण तो लबाड नव्हता, तो एक मोहक अपराधी होता. तो कारागृहातही ‘किसका रस्ता देखे’ हे गाणे गाऊन नायिकेचे मन जिंकून घ्यायचा! त्याने साकारलेल्या सर्व भूमिकांनी त्या पात्रांचाच नाही तर देव आनंद या व्यक्तीचाही आत्मविश्वास दर्शविला. ३ डिसेंबरला त्यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त...

‘टॉप ३’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रिकुटाचा भाग असलेले देव आनंद. राज कपूर आणि दिलीप कुमार हे यातील इतर दोघे. प्रत्येकाची स्वतःची अशी ब्रँड व्हॅल्यू आणि व्यक्तिमत्त्व होते. राज हा ‘ट्रॅजिक ट्रॅम्प’ होता, तर दिलीप हा संयमी रोमॅंटिक होता. देव हा ‘डार्क हिरो’ होता.

१९५०-६० च्या दरम्यान देवने पडद्यावर साकारलेल्या पात्रांची मोहिनी, शैली, त्याचे शहरी स्वभाववैशिष्ट्य, त्याची चाल या सर्वांनी देवची पडद्यावर एक डार्क प्रतिमा निर्माण केली. लॉर्ड मेघनाद देसाई त्यांच्या पुस्तकात लिहितात की, दिलीप कुमार, देव आनंद हे हिरो म्हणजे पोलिस आणि गुन्हेगार यांच्या सीमारेषेवर उभे असलेले शहरी तरुण होते.

आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे दिवाळखोर अर्थव्यवस्थेसह आलेले आहे, या वास्तवाचा साक्षात्कार लोकांना १९५० च्या दशकाच्या सुरुवातीलाच झाला. मुंबईने छोट्या शहरातील तरुणांना रोजगाराच्या शोधात मोठ्या शहराकडे वळवले. पैशांची निकड ही सर्वात महत्त्वाची होती. रस्त्यावरील सतत पेटते राहणारे विजेचे दिवे हे शहराच्या निद्रानाशाचे प्रतीक होते.

ही अडगळ शहराच्या अंधाऱ्या कोठडीचे प्रतिनिधित्व करत होती, ज्या कोठडीत तरुणांना ढकलण्यात आले होते. ‘काला बाझार’ (१९६०) किंवा ‘हाऊस नं ४४’ (१९५५) हे सिनेमे या जॉनरची उदाहरणे होती. ‘काला बाझार’मधील रघूची बस कंटक्टरची नोकरी गेल्यानंतर चित्रपटाची ब्लॅकमध्ये तिकिटे विकणे हे त्याचे रोजीरोटीचे साधन आहे. खच्चून भरलेल्या बसमधून एका प्रवाशाला खाली उतरवायला लावल्यामुळे त्याची नोकरी गेली आहे.

नोकरी गेल्यामुळे त्याची लहान बहीण, भाऊ आणि विधवा आई घर चालवण्यासाठी हातभार लावत आहेत. मुंबई शहराच्या भोवऱ्यामध्ये जे दिसत आहे आणि ऐकू येत आहे यात रघूचे मन हेलकावे खात आहे. पैसे मागणारा भिकारी, निकेलसाठी जगणारा बूट पॉलीश करणारा मुलगा, हातात नोटांचा गठ्ठा घेतलेला श्रीमंत माणूस, सिनेमाची प्रीमियम तिकिटे विकणारा काळाबाजारवाला.

असे वाटते की, हे शहर ऑक्सिजनशिवाय जगू शकते, पण पैशांशिवाय अजिबात नाही. या पार्श्वभूमीवर ‘पैसा, पैसा, पैसा बाबू पैसा, पैसा बाबू पैसा...’ या तिडीक निर्माण करणाऱ्या आवाजाने त्याचे कान टवकारतात.

‘हाऊस नं ४४’ या सिनेमात मुसळधार पावसात मोठ्या पाईपच्या आत झोपणाऱ्या बेघर लोकांपैकी एक अशोक (देव आनंद) आहे. अस्वीकारार्ह असणारे हे अस्तित्व तो नाकारतो आणि भुरट्या चोरांसोबत जोडला जातो. देव आनंदने ‘बात एक रात की’मध्ये (१९६१) अँटी हिरोची दुसरी बाजू रंगवली. जेव्हा नीला (वहिदा रेहमान) आपले रंजनवर (चंद्रशेखर) प्रेम असल्याचे सांगते तेव्हा विद्वान वकील राजेश्वर (देव) यांचा मुखवटा गळून पडून त्यांचा मत्सरी चेहरा दिसतो. ‘बंबई का बाबू’ (१९६०) या चित्रपटात व्याभिचाराची बाजू दाखवण्यात आली आहे. यातील नायक (बाबू) एका मुलीच्या प्रेमात पडतो, जी त्याला भाऊ मानत असते.

‘बनारसी बाबू’मध्ये (१९७३) देव आनंदने एका खोटारड्या व्यक्तीची नकारात्मक भूमिका साकारली आहे. देव आनंद हा पडद्यावर एकापेक्षा जास्त स्त्रियांसोबत सहज वावरू शकत होता, त्यामुळे त्याची अँटी हिरोची प्रतिमा अधिक सशक्त बनली.

‘ज्वेल थीफ’ (१९६७) या चित्रपटात देव आनंद जेम्स बॉंडसारख्या असणाऱ्या विनयची भूमिका करत होता. विनय अंजलीसोबत (तनुजा) फ्लर्टिंगचा अमर्याद आनंद उपभोगत होता, तर दुसऱ्या बाजूला व्यावसायिक कारणांसाठी हेलनसोबत वन नाईट स्टँड करत होता. ‘तीन देवीयाँ’ या सिनेमात देव तीन महिलांसोबत रोमान्स करत होता. इथे कुठलीही व्यावसायिक अपरिहार्यता नव्हती.

ग्राहकाला जसा निवडीचा अधिकार असतो तसा अधिकार भोगणारा तो एक तरुण होता. ‘असली नकली’मध्ये देव आनंद ऊर्फ प्लेबॉय प्रिन्स त्याची खरी ओळख लपवत होता. ‘जोशीला’मधील (१९७४) अमर त्याच्या बॉसच्या मादक पत्नीवर (बिंदू) मोहित व्हावे की नाही याबद्दल क्षणभरच संकोच करतो. खरे तर त्याने आपण मदनलाल डोगरा असल्याचे खोटे बोलूनच नोकरी मिळवलेली असते.

देव आनंदच्या महान कामांपैकी एक असलेल्या ‘गाईड’मधील राजू हा बोलण्यात चतुर आहे. त्याला असंख्य भाषांचा सहवास लाभल्यामुळे त्याच्यात एक सांस्कृतिक सहजता आली आहे. उदयपूरच्या जुन्या भव्य इमारतींना समजून घेतल्यामुळे तो त्याच्या ग्राहकांना प्रभावित करू शकतो. त्याला अडचणीत आणणाऱ्या संभाषणातून सुटण्यासाठी तो आपल्या हजरजबाबीपणाचा उपयोग करतो.

राजूने व्यवस्थापन केल्यामुळे रोझीची (वहिदा रेहमान) नर्तक म्हणून कारकीर्द सुरू होते. पैशांमुळे दोघांच्याही आयुष्यात समाधान येते. प्रसिद्धीने आनंद येतो. आणि त्यासोबतच नवश्रीमंत राजूच्या आयुष्यात जुगार आणि मद्यपानासारख्या उच्चभ्रू लोकांच्या सवयीही येतात. त्याचे आयुष्य पुढे जात असतानाच त्याचा समतोल ढासळतो.

रोझीचा तिच्या कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन एका विद्यार्थ्याचाच राहतो, पण राजू हा उत्सवमूर्ती बनलेला असतो. नेहमीच रोझीला गमावण्याच्या भीतीत अडकलेला राजू एकदा तिची खोटी सही करण्याच्या गुन्ह्यात अडकतो.

‘जाल’मधील (१९५२) टोनी फर्नांडिसने आपल्या पूर्वायुष्यात एका स्त्रीची फसवणूक केलेली आहे. तो कोणत्याही स्त्रीला भुरळ घालून चांदण्या रात्री तिच्या झोपडीतून समुद्रकिनारी घेऊन येऊ शकतो. राज कपूर हा नेहमी ट्रॅम्पच्या कपड्यात दिसला आणि दिलीप कुमार कधी शेरवानी तर कधी स्वच्छ पांढऱ्या शर्टमध्ये; तर देव आनंद कधी होम्सियन कॅपमध्ये, कधी पायजम्याच्या खोल खिशात हात घालून, कधी रुंद गळ्याच्या शर्टमध्ये, कधी क्रॅव्हेट, स्कार्फ, कधी जिन्समध्ये आणि सिगारेटचे झरझर झुरके ओढताना दिसायचा. राज आणि दिलीप त्यांच्या नायिकांसह समुद्रकिनारी कम्फर्टेबल वाटायचे. देव एखाद्या सुंदर मुलीसोबत बारमध्ये गाणे गाताना घराइतकाच सहज असायचा. जसे ‘बाजी’मध्ये (१९५१) दाखवले आहे.

देव आनंदकडे तिरकस चाल आणि केसांचा कोंबड्यासह त्याच्या दंतपक्ती न दिसणारे हास्य होते. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक कंगोरे होते, पण तो लबाड नव्हता. तो बदमाश नव्हता. तो एक मोहक अपराधी होता. एवढेच काय तो कारागृहातही ‘किसका रस्ता देखे’ हे गाणे गाऊन नायिकेचे मन जिंकून घेतो! (जोशीला). तो काहीही करू शकणारा ‘कॅम्पस स्टार बॉय’ होता.

तरी त्याच्या अपयशाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. या सर्व भूमिकांनी केवळ त्या पात्रांचाच नाही तर देव आनंद या व्यक्तीचाही आत्मविश्वास दर्शविला. १९७० च्या आधीचा सर्वार्थाने सर्वोत्कृष्ट अँटी हिरो कुणी असेल तर तो देव आनंद होता!

(लेखक प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट अभ्यासक असून, त्यांनी अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचे लेखन केले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com