दगडांच्या देशा : भूगर्भातील अदभूत जगामुळे बाळासाहेबही प्रभावित.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Thackeray

दगडांच्या देशा : भूगर्भातील अदभूत जगामुळे बाळासाहेबही प्रभावित....

लेखक - के. सी. पांडे

गारगोटीची महती देशात परदेशात पर्यंत पोहोचली होती. घरगुती संग्रहालयाचे उद्घाटन हेही एक भव्य दिव्य असावे, असा माझा मानस होता. यासाठी आधी पंतप्रधान वाजपेयी यांच्याशी संपर्क केला. नियोजित झालेला दौरा अपरिहार्य राष्ट्रीय कारणामुळे रद्द झाला. आपले प्रामाणिक प्रयत्न ईश्वराचा असलेला मला आशीर्वाद याची आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर मला कायमच साथ मिळाली आहे. अनेक संकटे आली. मात्र, माझ्या नशिबात ईश्वर भक्ती निरंतर असल्यामुळे मला त्यातून लगेच पर्यायी मार्ग उपलब्ध झाले. संघर्षाचे रूपांतर कार्यसिद्धीमध्ये झाले. (Balasaheb Thackeray visit to Gargoti museum nashik)

गारगोटी संग्रहालयाच्या भेटीप्रसंगी बाळासाहेब ठाकरेंनी केलेली स्वाक्षरी.

गारगोटी संग्रहालयाच्या भेटीप्रसंगी बाळासाहेब ठाकरेंनी केलेली स्वाक्षरी.

मी अत्यंत धार्मिक वृत्तीचा व ईश्वर भक्त आहे. माझ्या प्रत्येक वाटचालीत हिंदू परंपरेतील प्रत्येक सणांना तसेच मुहूर्त यास सर्वोच्च स्थान माझ्या आयुष्यात दिले आहे. उद्घाटनसाठी माझे परमस्नेही सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांची यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या प्रयत्नामुळे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची वेळ आम्हाला मिळाली आणि भेटीचा तो दिवस उजाडला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे फक्त हे नाव जरी मनात आले की हिंदुहृदयसम्राट, एक सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली कणखर भाषा, देशातील अग्रस्थानी असलेले ज्वलंत कट्टर हिंदुत्ववादी नेते, महाराष्ट्रातील शिवसेनेचे संस्थापक, राजकारणी, कुशल व्यंगचित्रकार, सामना दैनिकाचे संस्थापक संपादक आणि प्रभुत्वपूर्ण शैली असणारे व्यक्तिमत्त्व डोळ्यापुढे येतं. वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हे सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख वैशिष्ट्य होय. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे व आचार्य अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. याशिवाय व्यंगचित्रकाराची वेधक वेचक निरीक्षण दृष्टीही त्यांच्यामध्ये आहे. जिवंत हिंदुत्वाचा विचार त्यांच्या लेखणीतून जाणवत असे. अशा वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे पैलू असलेल्या नेतृत्वाची भेट म्हणजे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होय.

गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटनाचे आमंत्रण देण्यासाठी मी व सर्वश्री आमदार माणिकराव कोकाटे, मंदाकिनी कदम, कल्याणराव पाटील, पांडुरंग गांगड यांच्यासमवेत वांद्रे येथील कलानगर मातोश्री निवासस्थानी पोहोचलो. मनात त्यावेळी उत्कटता, आतुरता, काहीसे दडपण, उत्सुकता असे संमिश्र विचार माझ्या मनात घोंगावत होते. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तींना आपण विविध माध्यमांच्या मार्फतच ओळखत असतो. त्यांचे अंतर्मन त्यांचेशी होणारा प्रत्यक्ष संवाद खूप कमी लोकांच्या वाट्याला येतो. त्यामुळे माध्यमांत जो व्यक्ती जसा असतो, तसेच आपण त्याला समजत असतो. कदाचित तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा त्याला प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्या मनात त्याच्याबद्दल असलेली प्रतिमा प्रत्यक्ष भेटीनंतर कदाचित वेगळी असू शकते. कायम असे होत असते असेच मला वाटत आले होते. जेव्हा बाळासाहेबांसमोर आम्ही गेलो, तेव्हा त्यांनी अत्यंत आपुलकीने आमचे स्वागत केले. त्या स्वागतामध्ये मी बाळासाहेबांच्या प्रेमात पडलो. अत्यंत नम्र, समोरच्याचे बोलणे संपूर्ण ऐकून व समजून घेणे व त्यास सकारात्मक प्रतिसाद देणे, सखोल ज्ञान, अस्सलिखित इंग्रजी, हिंदी उत्कृष्ट संवाद कौशल्य, समोर असलेल्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, त्याचा स्वभाव हे काही क्षणात ओळखण्याचे कसब बाळासाहेबांमध्ये असल्याचे मला जाणवले. गारगोटीबद्दल माहिती सांगण्यास बाळासाहेबांना सुरुवात केली, तेव्हापासून ते अत्यंत कुतूहलाने सर्व काही शांतपणे ऐकून घेत होते. भूगर्भात अशीही काही दुनिया आहे, हे ऐकूनच त्यांना नवल वाटले.

गारगोटीचे प्रकार, विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये आढळणारी गारगोटी ही निसर्गाची किमया ऐकून ते अत्यंत प्रभावित झाले. कलासक्त दृष्टिकोन हे त्यामागे असावे, हा माझा अंदाज होता. तो अचूक ठरला. सगळं विश्लेषण ऐकून घेत, सिन्नरला येण्यासाठी बाळासाहेबांनी होकार तर दिलाच, त्यासोबतच अशी ही आगळीवेगळी दुनिया जगासमोर मी कशी काय प्रस्तुत केली, याबद्दल त्यांनी आश्चर्यही व्यक्त केलं. जेव्हा ते प्रत्यक्ष गारगोटीचे विश्व पाहतील, तेव्हा त्यांना या अदभूत जगाची ओळख पटेल, याबद्दल माझी मनोमन खात्री झाली होती.

(लेखक हे सिन्नर स्थित गारगोटी या आंतरराष्ट्रीय संग्रहालयाचे संस्थापक आहेत.)