

Nepal youth political revolution 2025
esakal
राजेश खरात - saptrang@esakal.com
नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांत लोकप्रिय रॅपर बलेन शहा यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचा निर्विवाद विजय झाला. सत्तापालटात जनतेने कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसान्य व्यक्तीला निवडून दिले. एकूण लोकसंख्येच्या ७० टक्के असणाऱ्या ‘जेन झी’ या तरुण पिढीने जुन्या पिढीतील नेत्यांना सरकारमधून पदच्युत केले. त्याचबरोबर लोकशाहीची कास न सोडता याच ‘जेन झी’ने
लोकशाहीला अभिप्रेत असणारा निवडणुकांचा सनदशीर मार्ग अवलंबून सत्ता मिळविली. हे कसे झाले, याचा मागोवा...
नेपाळमध्ये १९९६ पासून राजकीयदृष्ट्या अनेक बदल होत गेले, तेथील राजकीय व्यवस्था मुळची राजेशाही असली, तरी नेपाळी कॉंग्रेसच्या प्रभावामुळे राजेशाही नाममात्र अस्तित्वात होती. १९९६ ते २००६ या काळात माओवाद्यांनी राजकीय हिंसाचार हेच सत्तेचे साधन स्वीकारून शेकडो निरपराध नागरिकांचा बळी जाऊ दिला. कालांतराने तेथील राजेशाही तर उलथवूनच टाकली, पण २००८ मध्ये आपली सत्ता आणली. तेव्हापासून माओवाद्यांनी सत्ता टिकविण्यासाठी राजकीय स्वार्थाचे सामायिक हित जोपासणाऱ्या नेपाळी कॉंग्रेस तसेच इतर राजकीय पक्षांशी गरजेनुसार हातमिळवणी करण्यास सुरुवात केली आणि ती सप्टेंबर २०२५पर्यंत. माओवादी आणि नेपाळी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी कधी स्वतंत्रपणे, तर कधी संगनमताने नेपाळमध्ये केवळ आपलेच आधिपत्य कसे राहील, असाच प्रयत्न केला. या प्रक्रियेत, त्यांनी सर्वसामान्य जनता म्हणजे ‘मुकी जनावरे कुणीही हाका’ हे धोरण स्वीकारून शासन व्यवस्था राबविली. त्यातच सत्तेसाठी काहीही, हेच ब्रीदवाक्य अंगीकारून, त्याच्या जोडीला पराकोटीचा भ्रष्टाचार, भाऊबंदकी, स्व:हिताला प्राधान्य दिले. परिणामी, गेली ३० वर्षे नेपाळमध्ये राजकीय निवडणुका म्हणजे फार्सच झाला होता. दारिद्र्यात खितपत पडलेल्या सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात ही निव्वळ धूळफेक होती.