भागवतपुराण

आधीच्या लेखात मी म्हटलं होतं की, भागवतपुराणाबद्दल लिहितो
भागवतपुराणाबद्दल
भागवतपुराणाबद्दल sakal

विवेक देबरॉय

आधीच्या लेखात मी म्हटलं होतं की, भागवतपुराणाबद्दल लिहितो. भागवतपुराण बहुतेक सर्वाधिक वाचलं गेलेलं आणि सर्वाधिक अनुवाद झालेलं पुराण असावं. या पुराणाचे १२ स्कंध आहेत. स्कंध म्हणजे झाडाचं खोड किंवा मोठी फांदी.

इथं त्याचा अर्थ विभाग किंवा छोटा खंड असा आहे. या बारांमधला दहावा स्कंध सर्वांत मोठा आहे आणि तो सर्वांत जास्त वाचला जातो. पुराणग्रंथांबद्दल मी तुम्हाला थोडं आधीच सांगतो की, महाभारत किंवा वाल्मीकी रामायण यांच्याप्रमाणे पुराणांची सटीक किंवा चिकित्सक आवृत्ती अद्यापपावेतो आलेली नाही. ते काम आता कुठं सुरू झालं आहे.

पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेनं महाभारताची अशी चिकित्सक आवृत्ती प्रकाशित केलेली आहे. त्याच मीमांसापद्धतीचं अनुकरण करून बडोद्याच्या प्राच्यविद्या संशोधन संस्थेनं वाल्मीकी रामायणावर ग्रंथ प्रकाशित केला. हे लक्षात घेऊन भागवतपुराणाच्या वेगवेगळ्या आवृत्त्या असतील, ही शक्यता गृहीत धरू. मोठ्या प्रमाणात वाचल्या जाणाऱ्या भागवतासारख्या पुराणात हे (वेगवेगळ्या आवृत्त्यांमधील) फरक अगदी किरकोळ असतील.

आधीच्या एका लेखात मी लिहिलं होतं की, भागवतपुराणामध्ये १८ हजार श्लोक आहेत. म्हणजे तसं मानलं जातं. सध्या आपल्याला उपलब्ध असलेल्या ग्रंथांमध्ये १४ हजार ते १५ हजार श्लोक दिसतील. वर उद्धृत केलेली १८ हजार श्लोक ही संख्या अचूक असेल तर, काही श्लोक गहाळ झाले, असं म्हणता येईल. आपल्याकडे लेखनकला खूप उशिरा आली. ज्ञानाचा वारसा पुढच्या पिढीकडे मौखिक रूपानं देण्याच्या आपल्या पद्धतीमुळं पारंपरिक ठेव्याचं झालेलं हे नुकसान म्हणता येईल.

पुराणांमधील पाच लक्षणांचा, अर्थात्, पाच वैशिष्ट्यांचा उल्लेख मी आधीच्या लेखात केला आहे. भागवतपुराण त्यावरच आधारित आहे; तथापि थोडा फरक आहे. दुसऱ्या स्कंधाच्या दहाव्या अध्यायात भागवतपुराणातील दहा वैशिष्ट्यं स्पष्ट केलेली दिसतात. ती वैशिष्ट्यं म्हणजे ‘सर्ग’, ‘विसर्ग’, ‘स्थान’, ‘पोषण’, ‘उती’, ‘मन्वंतर’,

‘ईशानुकथा’, ‘निरोध’, ‘मुक्ती’ आणि ‘आश्रय’ ही आहेत. त्यांचा अर्थ असा : १) स्थूल निर्मिती, २) सूक्ष्म निर्मिती, ३) जतन, ४) निर्वाह, ५) कर्माद्वारे बंधनात टाकणाऱ्या वासना, ६) भक्ती व प्रजेचं पालन यांद्वारे केलं जाणारं शुद्ध धर्माचं आचरण, ७) ईश्वराच्या अवताराच्या व आख्यानाच्या कथा, ८) ईश्वरचरणी लीन होणं म्हणजे निरोध, ९) कर्तृत्व, आत्मभोग आदी भावांचा त्याग आणि १०) परब्रह्म हेच अंतिम आश्रयस्थान. मजकुरात सामान्यतः उद्धृत केलेल्या पाच गुणधर्मांपेक्षा बरंच काही अधिक आहे आणि त्यामुळेच पंचलक्षणांपेक्षा थोडंसं वेगळंही आहे.

असं असलं तरी या ग्रंथाला ‘भगवतपुराण’ म्हणत नाहीत, तर हा ग्रंथ आहे ‘भागवतपुराण’. आता ‘भागवत’ म्हणजे काय; त्या शब्दाचा अर्थ काय नेमका? इथं ‘भागवत’ हा शब्द विशेषण आहे हे समजून घेतल्यावर लक्षात येतं की, त्याचा अर्थ आहे ‘पवित्र’ आणि भागवतपुराण हे अगदी निःसंशयपणे पवित्र पुराण आहे. हा अर्थ अगदी योग्य; सहज मान्य होण्यासारखा. तथापि, ‘भागवत’ शब्द नाम आहे, असं गृहीत धरलं तर त्याचा अर्थ होतो विष्णूचा भक्त किंवा विष्णोपासक. ‘भागवतधर्म’ म्हणजे विष्णूची भक्ती करण्याचा धर्म. म्हणूनच ‘भागवतपुराण’ म्हणजे विष्णूचे भक्त जो अनुसरतात, आचरणात आणतात, त्या भागवतधर्माचं वर्णन करणारा, त्याचं स्पष्टीकरण करणारा ग्रंथ होय.

इतःपर भागवतपुराण म्हणजे केवळ कथा किंवा गोष्टी नाहीत. या पुराणातील सर्वांत मोठा, दीर्घ स्कंध दहावा आहे आणि तो सर्वांना फार आवडतो. तोच सर्वाधिक वाचला जातो. याच स्कंधामध्ये कृष्णाच्या लीलांचं, त्याच्या पराक्रमांचं वर्णन आहे. त्यामध्ये रासलीलेचा उल्लेख आहे आणि विलक्षण सुंदर असं काव्य आहे. गोपिकांची गाणी हे त्याचंच उदाहरण म्हणावं लागेल. या स्कंधामध्ये लक्षणीय प्रमाणात कथा आहेत हे यावरून स्पष्ट व्हावं.

तथापि, भागवतपुराणाच्या अन्य स्कंधांमध्ये, धर्म आणि मोक्ष यांवर अधिक भर दिलेला आहे. त्याचबरोबर त्यामध्ये विष्णूच्या अवताराच्या संकल्पनेच्या आधारे भक्ती, अद्वैत, द्वैत, सांख्य आणि योग यांचंही दर्शन घडतं. ‘पंचरात्र-सिद्धान्त’ आणि ग्रंथांचा प्रभाव यावर जाणवतो. ‘पंचरात्र’ म्हणजे शब्दशः पाच रात्रीं. या शब्दाचा संदर्भ आहे तो पाच रात्रीं केल्या जाणाऱ्या यज्ञांचा. तथापि, यात पंचरात्र-सिद्धान्तही आहे. त्यातून एक अतींद्रिय तत्त्वज्ञान तयार झालं. आपापल्या धारणेनुसार, त्याला ‘धर्मशास्त्र’ असंही म्हणता येईल. ‘वैष्णव धर्मा’नं या

पंचरात्र-प्रथेला अन्य पंथांशी जोडलं. थोडक्यात, हे म्हणजे अनेकविध पंथांच्या सरमिसळीनं तयार झालेलं तत्त्वज्ञान असून, त्यात अनेक बारकावे आणि विभिन्न विचारसरणी असणं अगदी अपरिहार्य आहे. भागवतपुराण काय शिकवतं? त्याचं नेमकं तत्त्वज्ञान काय आहे?

विष्णूची आराधना आणि भक्तियोग, हे तर सहज समजण्यासारखं आहे; पण त्याच्या पलीकडे जाऊन उत्तर देणं खरोखर कठीण आहे. धर्मशास्त्राची रचना करणारं लेखन असल्यामुळे भागवतपुराण तसं भगवद्गीतेपक्षा अधिक गुंतागुंतीचं, जटिल आहे. भगवद्गीतेच्या पायावर उभं राहिलेलं हे व्यापक रूपातलं धर्मशास्त्र आहे, असं कुणी म्हटलं तर ते खरंच होय.

पुरंजन नावाच्या राजाची सुंदर रूपककथा भागवतपुराणात आहे. ही गोष्ट सांगतात नारदमुनी. पुरंजन नावाचा एक प्रसिद्ध राजा होता. त्याचा असतो एक मित्र - अविज्ञात नाव त्याचं. आश्रयाच्या शोधात असलेल्या राजा पुरंजन यानं सारी पृथ्वी धुंडाळली; पण मनाला भावेल असं काही कुठं त्याला या पृथ्वीतलावर आढळलंच नाही आणि त्यामुळे तो व्याकुळ झाला. त्याला आपल्या साऱ्या मनोकामना पूर्ण करवून घ्यायच्या होत्या आणि त्या पूर्ण होतील,

असं एकही नगर या अफाट पृथ्वीवर नाही, अशी त्याची धारणा झाली. असा शोध सुरू असताना एकदा त्याला हिमालयाच्या दक्षिणेकडील उतारावर नऊ प्रवेशद्वारांचं शहर दिसलं. तिथं सर्व शुभचिन्हं दृष्टिपथात येत होती. नगराभोवती भक्कम तटबंदी होती. आत बागा, महाल-हवेल्या, खंदक, गवाक्ष आणि कमानी होत्या. आतमध्ये जिकडं तिकडं घरंच घरं दिसत होती. या घरांची छतं सोन्यानं, चांदीनं आणि लोहानं मढवलेली होती. नगरात सभागृहं दिसत होती, प्रशस्त चौक, गुळगुळीत महामार्ग, द्यूतगृहं,

बाजारपेठा, व्यापारी-निवासी संकुलं, गुढ्या-तोरणांनी केलेली सजावट, उद्यानं आणि रंगमंच होते. शहराच्या बाहेर एक उपवन होतं. आकाशाला चुंबणाऱ्या वृक्षांनी आणि वेलींनी ते उपवन छान नटलेलं. तिथंच तलाव होता. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि मधमाश्यांची गुणगुण सुरू होती. डेरेदार वृक्षांमुळे तलावाचा काठ कसा सुंदर दिसत होता.

अवखळ वारा धबधब्यातून करत असलेल्या तुषारसिंचनानं झाडांच्या फांद्या डुलत होत्या. सोबत होता फुलांचा दरवळणारा गंध. जंगलात अनेकविध प्राणी होते. कोकीळ कुहूकुहू साद घालत जणू अगत्याचं आमंत्रणच देत आहेत, असं या प्रवाशांना वाटलं. अशा रम्य, मोहक वातावरणात राजा पुरंजन यानं काय केलं? ती कहाणी पाहू पुढच्या लेखात...

(अनुवाद : सतीश स. कुलकर्णी) shabdkul@outlook.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com